हॅलो अ‍ॅस्टर..

एमजी मोटर इंडियाने हॅलो एमजी..अशी घोषणा करीत भारताताील पहिली इंटरनेट कार हेक्टरची घोषणा केली होती. त्यानंतर ग्लोस्टर, एमजी झेडक्स या ‘इ कार’चा पर्यायही दिला होता. त्यानंतर आता हॅलो अ‍ॅस्टर.. ची घोषणा करीत पहिल्या पर्सनल एआय असिस्टंट आणि फर्स्ट इन सेगमेंट ऑटोनॉमस लेव्हल २ तंत्रज्ञानाचे अनावरण केले. अ‍ॅस्टर लवकरच भारतील बाजारात येईल असा दावाही कंपनीने केला आहे.

पर्सनल एआय असिस्टंट हे प्रसिद्ध अमेरिकन फर्म ‘स्टार डिझाइन’ने तयार केले आहे. यात मानवासारख्या भावना आणि आवाज काढले जातात. तसेच विकिपीडियाद्वारे प्रत्येक विषयावर तपशीलवार माहिती मिळते. हे तंत्रज्ञान कारमधील लोकांशी जोडले जाईल. त्यात आय-स्मार्ट हबची सुविधाही आहे.

अ‍ॅस्टर ही मध्यम आकारातील एसयूव्ही मिड रेंज रडार आणि मल्टी पर्पज कॅमेऱ्यांची सुविधेने युक्त असल्याने, यात (एडीएएस) अर्थात अ‍ॅडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीमच्या मालिकेचा अनुभव घेता येऊ  शकतो. यात अ‍ॅडाप्टिव्ह क्रुझ कंट्रोल, फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन कीपिंग असिस्ट, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन डिपार्चर प्रिव्हेन्शन, इंटेलिजंट हँडलँप कंट्रोल, रिअर ड्राइव्ह असिस्ट आणि स्पीड असिस्ट सिस्टीम आदींचा समावेश आहे. या सुविधांद्वारे वाहनचालविण्याचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होऊ  शकतो असेही कंपनीचे म्हणणे आहे.

मॅप माय इंडियासोबत नकाशे व नेव्हिगेशन, जिओ कनेक्टिव्हिटी, कोईनअर्थद्वारे ब्लॉकचेन संरक्षित वाहन, डिजिटल पासपोर्ट आणि इतर बऱ्याच सुविधा दिल्या आहेत. एमजीच्या कारमालकांना जिओसावन अ‍ॅपवर म्युझिक ऐकता येईल आणि कारमध्ये बसल्या बसल्या पार्किंगची जागाही आरक्षित करता येईल.

‘ऑटो-टेक ब्रँड म्हणून आम्ही नेहमीच यशस्वी तंत्रज्ञान आधी सादर केले आहे. आता कृत्रिम बुद्धिमत्तेतही आम्ही पुढे जात आहोत. अ‍ॅस्टर ही एक पाऊल पुढे असून प्रथम आणि सर्वोत्तम श्रेणीतील वैशिष्टय़ांसह एक क्रांती घडवून आणेल. उत्पादनांच्या केंद्रस्थानी असलेल्या नूतनाविष्कार आणि सॉफ्टवेअरच्या अखंड पाठपुराव्यामुळे, आमची वाहने ‘एआय’चा लाभ घेत अधिक स्मार्ट आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देत राहतील,’ असा दावा एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष आणि एमडी राजीव छाबा यांनी यावळी केला आहे.

नवीन होंडा अमेझ

होंडा कार्स इंडिया लि. ने नवीन अमेझ बाजारात आणली,  ‘जिते है शासन से’ अशी घोषणा करीत अमेज ग्राहकांना आकर्षित करेल असा दावा कंपनीने केला आहे.

ही सेदान कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजीनमध्ये मॅन्युअल तसेच सीव्हीटी ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध असणार आहे. नवीन अमेझमध्ये कंपनीने तिच्या दिसण्यावर अधिक भर दिला आहे. ती अधिक आकर्षक व मोठी करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील व मागील लूक बदलण्यात आला आहे. तसेच दिव्यांची रचनाही बदलली असून एलईडी दिवे देण्यात आले आहेत. आतापर्यंत पदार्पणापासून साडेचार लाख अमेझ कारची विक्री झाल्याचा दावा करीत नवीन अमेझ तिच्या सुधारित लूक आणि स्टाइलसह आमच्या ग्राहकांना सेदानचा उत्कृष्ट अनुभव आणि आनंद देईल असा दावा होंडा कार्स इंडिया लि.चे अध्यक्ष आणि सीईओ गाकु नाकानिशी यांनी यावेळी केला आहे.

’ मायलेज १८.६ व २७.७ प्रतिलिटर : नवीन अमेझ मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असून होंडाच्या प्रसिद्ध १.२ लिटर आय-व्हीटीईसी पेट्रोल इंजीन आणि १.५ लिटर डीटीईसी डिझेल इंजीन देण्यात आले आहे. ती ६००० आरपीएमवर ९० पीएसची शक्ती देते. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींमध्ये सीव्हीटीचा पर्याय आहे. भरपूर जागा, ड्रायव्हिंगचा अनुभव आणि उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता देते. पेट्रोलवर १८.८ तर डिझलेवर २४.७ प्रतिलिटर किलोमीटरचा एव्हरेज देईल असा दावाही कंपनीने यावेळी केला आहे.

’ सुरक्षेची काळजी : नवीन अमेझमध्ये अपघातपूर्व व अपघात पश्चात दोन्ही सुरक्षा पुरविण्यात आल्या आहेत. दोन एयरबॅग, ईबीडी व एबीएस प्रणाली देण्यात आली आहे. रियर मल्टी-व्हीव कॅमेरा, लाइट सेंसरसह नवीन ऑटोमेटिक हेडलाइट कंट्रोल, रियर पार्किंग सेंसर दिले आहे. तर चालक व प्रवाशांसाठी हेड रेस्ट आणि पादचाऱ्यांना दुखापत कमी करण्याचे तंत्रज्ञान या सुरक्षा साधनांचा वापर करण्यात आला आहे.

’ किंमत : नवीन होडा अमेझ पेट्रोलमध्ये ६ लाख ३२ हजारांपासून सुरुवात होते तर टॉप मॉडेल ९ लाख ५ हजारांपर्यंत जाते. तर डिझलेमध्ये ८ लाख ६६ हजार ५०० पासून सुरुवात होते तर टॉप सीव्हीटी मॉडेल ११ लाख १५ हजारापर्यंत जाते.

टाटाची दुसऱ्या ‘ईव्ही’ची घोषणा

बुधवारी टाटाने आपल्या नेक्सॉन ईव्हीनंतर दुसऱ्या ‘इ कार’ची घोषणा केली. टाटाची टिगोर ही कार आता ई कार स्वरूपात बाजारात लवकरच येणार असून यासाठी कंपनीने आजपासून नोंदणी सुरू केली आहे.

सध्या बाजारात विद्युत वाहनांना मागणी वाढत आहे. दुचाकी, स्कूटरमध्ये अनेक पर्याय आले आहेत. मात्र कार निर्मात्या कंपन्यांनी अद्याप सावध पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत पाच सहा ‘ई कार’बाजारात आल्या आहेत. त्यात टाटाची नेक्सॉन ‘ई कार’ला चांगली पसंती आहे. आतापर्यंतच्या ‘ई कार’ विक्रीत नेक्सॉनची विक्री ७० टक्के असल्याचा कंपनीचा दावा असून त्यांनी आपला दुसरा पर्याय बाजारात आणण्याची बुधवारी घोषणा केली. टाटाने टिगोर ही ‘ई कार’ लवकरच बाजारात येणार असल्याचे सांगत आजपासून तिची नोंदणीही सुरू केली आहे.