Nick Jonas on Diabetes : गायक व अभिनेता निक जोनासला वयाच्या १३ व्या वर्षी टाईप १ मधुमेह झाल्याचे निदान झाले होते. कोणीतरी त्याच्या स्वप्नांचे दरवाजे बंद करीत असल्यासारखे त्याला त्यावेळी वाटले. त्याविषयी निक जोनास उघडपणे बोलला. त्याने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली. त्या पोस्टमध्ये त्याने डेक्सकॉम G7 ब्रॅण्डचे मधुमेह पॅचेस वापरण्याविषयी आणि त्याच्या या प्रवासात ते कसे उपयुक्त ठरले याविषयी सांगितले.

निकने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो सोफ्यावर बसला आहे आणि त्याच्या बायसेप्सवर मधुमेह मॉनिटर पॅच लावलेला दिसत आहे. या फोटोसह त्याने त्याच्या आयुष्याचे वर्णन करणारे काही अॅनिमिटेड फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमध्ये तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बसलेला एक तरुण निक, इव्हेंटमध्ये भावांबरोबर गाणारा निक व त्याच्या भविष्याकडे पाहत असलेला वृद्ध निक दिसेल.

निकने कॅप्शनमध्ये म्हटलेय, “१३ व्या वर्षी मला टाईप १ मधुमेहाचे निदान झाल्यानंतर असे वाटले की, कोणीतरी माझ्या स्वप्नांचे दार बंद करीत आहे. आता ब्रॉडवे स्टेजवर परत येताना, मला असे वाटते की, मी परत माझ्यातील तरुणाला सांगू शकेन की, मी कधी कल्पना केली नव्हती, त्यापेक्षा सर्व काही चांगले होते. मला माझ्या मधुमेहावर नियंत्रण ठेवायचे आहे आणि १३ वर्षांच्या तरुणाने जे स्वप्न पाहिले, त्यापेक्षा जास्त यशस्वी व्हायचे आहे.”

निकच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव केला आहे. या पोस्टवर त्याची पत्नी प्रियांका चोप्रानेसुद्धा कमेंट केली आहे. तिने कमेंटमध्ये इमोजी शेअर करीत प्रेम व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिलेय, “तुमच्यातला तो तरुण मुलगा तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देत आहे. तर एका युजरने लिहिलेय, “तुमचा खूप अभिमान आहे सर! तुम्ही नेहमीच आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहात.”

यापूर्वीसुद्धा निक जोनासने त्याच्या मधुमेहाच्या निदानाविषयी सांगितले होते. २०२३ च्या एका पोस्टमध्ये त्याने टाईप १ मधुमेहाच्या लक्षणांविषयी सांगितले होते. वारंवार लघवीची भावना होणे, जास्त तहान लागणे, थकवा व अचानक वजन कमी होणे, अशी ती लक्षणे होती.
निकने त्यावेळी लिहिले होते, “मी नशीबवान आहे की, माझ्या आजूबाजूला खूप चांगली सपोर्ट सिस्टीम आहे, ज्यामुळे मला याची लक्षणे जाणवली. त्यामुळे मला तपासणी करण्याचा निर्णय घेण्यास मदत झाली आणि माझे आयुष्य वाचवले. माझी मुलगी मोठी होत असताना, एक वडील म्हणून या लक्षणांविषयी सतर्क राहणे किती महत्त्वाचे आहे, हे मला समजते.”