Night Cough Relief 4 Home Remedies: सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे. ऋतू बदलत असताना वातावरणातील तापमान आणि आर्द्रतेतही बदल जाणवतो. अशा वेळी सर्दी, नाक वाहणे, कफ आणि खोकल्याचा त्रास अनेकांना जाणवू शकतो. दिवसभर खोकला सहन करता येतो; पण रात्री झोपताना तो अचानक वाढला की, त्रास अधिक जाणवतो. सततच्या खोकल्यामुळे घसा दुखतो, झोप मोडते आणि दुसऱ्या दिवशी थकवाही जाणवतो.

अशा वेळी प्रत्येक वेळी औषध घेणे आवश्यक असेलच, असे नाही. खोकल्याचे कारण आणि प्रकृती लक्षात घेऊन केले गेलेले काही साधे उपायही घशाला तात्पुरता आराम देण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. रात्री खोकला वाढत असेल, तर घरच्या घरी कोणते उपाय करून पाहता येतील, जाणून घेऊया…

१. आल्याचा काढा किंवा गरम पाणी

आल्याचा वापर पारंपरिक पद्धतीने सर्दी आणि घशाच्या त्रासासाठी केला जातो. आल्यामध्ये दाह कमी करण्यास मदत करणारे काही घटक असतात. रात्री खोकला आणि घशात खवखव जाणवत असेल, तर कोमट पाण्यात आले घालून, ते पाणी प्यायल्याने घशाला उब मिळू शकते.

हवे असल्यास त्यात थोडा मधही घालता येईल. मात्र, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला मध देऊ नये. तसेच आले जास्त प्रमाणात घेतल्यास काही लोकांना पोटाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आल्याचे प्रमाणातच सेवन करणे योग्य.

२. ज्येष्ठमध

घसा बसणे किंवा खवखव जाणवत असताना ज्येष्ठमधाचा वापर अनेक घरांमध्ये केला जातो. त्याचा सौम्य गोडसर स्वाद असल्याने त्याचे चहा किंवा कोमट पाण्यातून सेवन केले जाते.

त्यामुळे घशाला काही प्रमाणात आराम मिळू शकतो. मात्र, ज्येष्ठमध प्रत्येकासाठी योग्य असेलच, असे नाही. उच्च रक्तदाब, हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असणाऱ्या व्यक्तींनी त्याचे नियमित किंवा जास्त प्रमाणात सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

३. कोमट पाण्याने गुळण्या करा

रात्री कोरडा खोकला येत असेल आणि घशात खवखव जाणवत असेल, तर कोमट पाण्याने गुळण्या करणे हा सोपा उपाय आहे. त्यामुळे घशातील चिकटपणा कमी होण्यास आणि घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते.

एका ग्लास कोमट पाण्यात थोडे मीठ घालून गुळण्या करता येतात. पाणी खूप गरम नसावे. कारण- त्यामुळे घशाला इजा होऊ शकते. झोपण्यापूर्वी गुळण्या केल्यास घशातील अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते.

४. निलगिरीच्या तेलाबाबत काळजी घ्या

खोकला किंवा नाक बंद झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर वाफ घेतल्याने काही लोकांना तात्पुरता आराम मिळू शकतो. मात्र, गरम पाण्यात निलगिरीचे तेल टाकून वाफ घेण्याची पद्धत सर्वांसाठी सुरक्षित आहे, असे मानता येत नाही.

विशेषतः लहान मुलांना गरम पाण्याची वाफ देताना भाजण्याचा धोका असतो. निलगिरीचे तेल तोंडावाटे घेणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्याचा वापर करताना उत्पादनावरील सूचना पाळणे आणि विशेषतः मुलांच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

रात्री खोकला वाढू नये यासाठी काय कराल?

झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या आणि खोलीतील हवा खूप कोरडी असल्यास योग्य आर्द्रता राखण्याचा प्रयत्न करा. धूर, धूळ, अगरबत्तीचा धूर, तीव्र सुगंध किंवा इतर त्रासदायक घटकांपासून शक्यतो दूर राहा. सर्दीमुळे नाक बंद असेल, तर त्यावर योग्य तो उपचार घेणेही महत्त्वाचे आहे.

मधामुळे एक वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये आणि प्रौढांमध्ये खोकल्यापासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो; मात्र हा उपचार खोकल्याचे मूळ कारण दूर करतोच, असे नाही.

कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

प्रत्येक खोकला साध्या सर्दीमुळे होतोच, असे नाही. खोकला अनेक दिवस टिकत असेल, वारंवार होत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, छातीत दुखत असेल, रक्तमिश्रित कफ येत असेल किंवा तापासह प्रकृती बिघडत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहता, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

रात्रीचा खोकला वारंवार होत असेल किंवा झोप आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असेल, तर त्यामागे सर्दीव्यतिरिक्त अॅलर्जी, दमा, आम्लपित्त किंवा इतर कारणेही असू शकतात. त्यामुळे योग्य कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.

(टीप : हा लेख सामान्य माहितीसाठी आहे. घरगुती उपायांनी प्रत्येक व्यक्तीला समान फायदा होईलच, असे नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपली प्रकृती, वय आणि सुरू असलेली औषधे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्रास तीव्र स्वरूपाच किंवा तो सतत होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)