Diabetes Symptoms at Night: मधुमेह म्हणजेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची समस्या. गेल्या काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. बदललेली जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव, वाढते वजन आणि सततचा ताण यांमुळे अनेकांना कमी वयातच मधुमेहाचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे शरीरातील रक्तशर्करेचे प्रमाण वाढल्यानंतर त्याचे काही संकेत सुरुवातीला अगदी साध्या स्वरूपात जाणवतात.
अनेकदा दिवसभराच्या धावपळीत या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, रात्री झोपताना किंवा झोपेतून उठल्यानंतर जाणवणारी काही लक्षणे शरीरातील वाढलेल्या रक्तशर्करेचा इशारा देऊ शकतात. त्यामुळे अशी लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.
मधुमेह का होतो?
आपण खात असलेल्या अन्नातून शरीराला ऊर्जा मिळते. त्यासाठी अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लुकोज शरीरातील पेशींमध्ये पोहोचवण्याचे काम इन्सुलिन या संप्रेरकाच्या मदतीने होते. मात्र, शरीरात इन्सुलिनचे उत्पादन कमी होणे किंवा शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू न शकणे यांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते.
अयोग्य आहार, गोड पदार्थांचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, ताणतणाव आणि अनियमित जीवनशैली यांमुळे मधुमेहाचा धोका वाढू शकतो. रक्तातील साखर दीर्घकाळ नियंत्रणात राहिली नाही, तर डोळे, मूत्रपिंड, हृदय, मज्जातंतू यांसारख्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
रात्री जाणवणारी मधुमेहाची लक्षणे कोणती?
१ . रात्री अचानक घाम येणे
रात्री झोपताना किंवा झोपेतून उठताना विनाकारण खूप घाम येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः थंडीच्या दिवसांतही रात्री वारंवार घाम येत असेल, तर त्यामागे विविध कारणे असू शकतात. रक्तातील साखरेच्या पातळीत होणारे चढ-उतार हे त्यापैकी एक कारण असू शकते. त्यामुळे अशी समस्या वारंवार जाणवत असल्यास रक्तातील साखरेची तपासणी करून घेणे योग्य ठरते.
२. वारंवार लघवीला होणे
रात्री वारंवार लघवीला जाण्यासाठी उठावे लागणे हे मधुमेहाचे एक महत्त्वाचे लक्षण असू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मूत्रपिंड अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढू शकते आणि रात्री वारंवार लघवीला जाण्याची गरज भासू शकते.
मात्र, वारंवार लघवी होण्यामागे इतरही अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे ही समस्या सातत्याने जाणवत असल्यास स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
३. हात-पायांना मुंग्या येणे
रात्री झोपताना हात-पायांना मुंग्या येणे, झिणझिण्या जाणवणे किंवा बधिरपणा जाणवणे यांकडेही दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास शरीरातील मज्जातंतूंवर परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे अशा प्रकारची लक्षणे जाणवू शकतात.
मात्र, हात-पायांना मुंग्या येण्यामागे जीवनसत्त्व बी-१२ ची कमतरता, मज्जातंतूंवरील ताण किंवा इतर आरोग्यविषयक कारणेही असू शकतात. त्यामुळे हे लक्षण वारंवार जाणवत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
मधुमेहाची लक्षणे सुरुवातीला सौम्य वाटू शकतात. त्यामुळे रात्री वारंवार घाम येणे, लघवीला उठणे किंवा हात-पायांना मुंग्या येणे यांसारख्या त्रासांकडे सातत्याने दुर्लक्ष करणे टाळा. वेळेवर याबाबतची तपासणी केल्यास रक्तातील साखरेची स्थिती समजू शकते आणि आवश्यक उपचार व जीवनशैलीतील बदलांच्या मदतीने ती नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
(टीप : वरील माहिती केवळ जनजागृतीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. रात्री घाम येणे, वारंवार लघवी होणे किंवा हात-पायांना मुंग्या येणे ही लक्षणे केवळ मधुमेहामुळेच उद्भवतात, असे नाही. कोणतीही लक्षणे वारंवार जाणवत असल्यास स्वतःहून त्यावर औषधोपचार न करता, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार आवश्यक त्या वैद्यकीय तपासण्या करून घ्या.)
