Night Leg Cramps Causes and Relief Tips: रात्री शांत झोप लागलेली असते आणि अचानक पोटरीत तीव्र वेदना सुरू होतात. पायाचे स्नायू इतके घट्ट होतात की काही क्षण पाय हलवणेदेखील कठीण जाते. वेदनेमुळे झोपमोड होते आणि गोळा सुटल्यानंतरही काही वेळ पाय दुखत राहतो. अनेक जण या त्रासाला ‘नस चढणे’ असे म्हणतात. तुम्हालाही रात्री वारंवार असा त्रास होतो का? मग त्यामागील संभाव्य कारणे आणि आराम मिळवण्यासाठी करता येणारे उपाय जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

रात्री झोपेत पायाला गोळा का येतो?

पायाच्या स्नायूंना अचानक आकुंचन येऊन ते घट्ट होतात, तेव्हा तीव्र वेदना जाणवू शकतात. या स्थितीला स्नायूंना गोळा येणे किंवा स्नायूंचे आकुंचन असे म्हणतात. हा त्रास प्रामुख्याने पोटरीच्या स्नायूंमध्ये जाणवतो. काही वेळा पायाच्या पंजात किंवा मांडीमध्येही गोळा येऊ शकतो. साधारणपणे काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत हा त्रास राहू शकतो.

रात्री पायाला गोळा येण्यामागे नेहमीच एक ठराविक कारण असते असे नाही. दिवसभर जास्त वेळ उभे राहणे, अधिक शारीरिक श्रम करणे, स्नायूंवर ताण येणे, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे किंवा शरीरात पाण्याची कमतरता असणे यांमुळे हा त्रास होऊ शकतो. काही औषधांचा वापर, गर्भावस्था आणि वाढते वय यांचाही याच्याशी संबंध असू शकतो. मधुमेहामुळे मज्जातंतूंवर होणारा परिणाम, मूत्रपिंडांचे विकार किंवा रक्तप्रवाहाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनाही काही वेळा हा त्रास जाणवू शकतो.

त्यामुळे वारंवार पायाला गोळा येत असेल तर त्याकडे केवळ थकवा म्हणून दुर्लक्ष करू नका.

जीवा आयुर्वेदचे संचालक आणि आयुर्वेदाचार्य डॉ. प्रताप चौहान यांच्या मते, आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून या त्रासाचा संबंध शरीरातील वातदोषाच्या असंतुलनाशी जोडला जातो. अपुरी झोप, अनियमित दिनचर्या आणि आहारातील निष्काळजीपणा यांकडेही लक्ष देणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.

आयुर्वेदात अश्वगंधा, शतावरी आणि मिश्री यांसारख्या घटकांचा विविध कारणांसाठी वापर केला जातो. हे तिन्ही घटक समान प्रमाणात घेऊन त्यांची पूड तयार करावी आणि सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत एक चमचा घ्यावा, असा उपाय काही आयुर्वेदिक सल्ल्यांमध्ये सांगितला जातो. डॉक्टरांचा किंवा पात्र आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हे मिश्रण नियमितपणे घेऊ नये. विशेषतः गर्भवती महिला, दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्ती आणि नियमित औषधे घेणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी.

पायाला गोळा आल्यास लगेच काय करावे?

रात्री झोपेत अचानक पायाला गोळा आल्यास घाबरू नका. काही सोपे उपाय वेदना कमी करण्यास मदत करू शकतात.

१. पाय हळूहळू सरळ करा : पोटरीला गोळा आल्यास गुडघा शक्य तितका सरळ ठेवा आणि पायाची बोटे हळुवारपणे शरीराच्या दिशेने वाकवा, स्नायूवर जोर देऊ नका.

२. हलक्या हाताने मालिश करा : गोळा आलेल्या भागाला हळुवारपणे चोळल्याने स्नायूंचा ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.

३. कोमट पाण्याचा वापर करा : कोमट पाण्याने अंघोळ करणे किंवा कोमट शेक घेणे काही व्यक्तींना आरामदायी वाटू शकते.

४. दिवसभर पुरेसे पाणी प्या : विशेषतः उन्हात काम करत असल्यास किंवा व्यायामामुळे भरपूर घाम येत असल्यास शरीरातील द्रवपदार्थांची कमतरता होऊ देऊ नका.

५. झोपण्यापूर्वी हलका व्यायाम करा : पोटरीचे स्नायू हळुवार ताणण्याचे व्यायाम केल्याने काही व्यक्तींमध्ये रात्री गोळा येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.

कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

पायाला अधूनमधून गोळा येणे सामान्य असू शकते. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल, झोपेमध्ये सतत व्यत्यय येत असेल, वेदना दीर्घकाळ टिकत असतील किंवा पायाला सूज, लालसरपणा, बधिरपणा अथवा स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तीव्र वेदना कमी होत नसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या.

लक्षात ठेवा, रात्री पायाला गोळा येण्यामागे प्रत्येक वेळी पाण्याची कमतरता किंवा वातदोष हेच कारण असेल असे नाही, त्यामुळे स्वतःहून औषधे किंवा पूड घेण्याऐवजी त्रासाचे कारण समजून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.

(महत्त्वाची सूचना : ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी आहे, ती वैद्यकीय निदान किंवा उपचारांचा पर्याय नाही.)