Early Symptoms of Cancer: आपल्या शरीरात काही गंभीर आजार शांतपणे वाढत असतात आणि सुरुवातीला त्यांची लक्षणं अगदी सामान्य वाटतात. त्यामुळे अनेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात; मात्र काही वेळा शरीर आधीच धोक्याची घंटा वाजवत असतं. रात्री झोपताना अचानक अंगातून प्रचंड घाम येणं हेही असंच एक लक्षण मानलं जात आहे, ज्याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर पुढे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

अनेकांना रात्री घाम येणं ही साधी गोष्ट वाटते. उकाडा, जाड ब्लँकेट, ताणतणाव किंवा सौम्य ताप यांमुळे घाम येतो, असं समजून लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. पण, जर वारंवार रात्री झोपेत कपडे आणि पलंग पूर्ण भिजेपर्यंत घाम येत असेल, तर ते शरीरातील गंभीर बिघाडाचं संकेत असू शकतं, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. विशेष म्हणजे काही संशोधनांमध्ये रात्री सतत घाम येणं हे लक्षण कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित असू शकतं, असंही नमूद करण्यात आलं आहे.

रात्री घाम येणं म्हणजे नेमकं काय?

रात्री झोपेत असताना अचानक शरीरातून मोठ्या प्रमाणात घाम येऊन कपडे आणि अंथरूण ओलं होणं याला ‘नाईट स्वेट्स’ म्हटलं जातं. जर खोली थंड असतानाही किंवा एसी सुरू असतानाही असा त्रास होत असेल, तर तो सामान्य मानला जाऊ शकत नाही.

तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणाच नीट काम करत नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे शरीर सतत घामाद्वारे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करतं.

कर्करोगाशी काय आहे संबंध?

डॉक्टरांच्या माहितीनुसार, काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये शरीरात संसर्ग किंवा सूज वाढल्यामुळे तापमान वाढू शकतं. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शरीरातून जास्त प्रमाणात घाम बाहेर पडतो. त्यामुळे रात्री वारंवार घाम येणं हे काही गंभीर आजारांचं सुरुवातीचं संकेत असू शकतं.

विशेषतः खालील प्रकारच्या कर्करोगांमध्ये हे लक्षण अधिक दिसून येऊ शकतं:

  • नॉन-हॉजकिन लिम्फोमा
  • हॉजकिन लिम्फोमा
  • ल्युकेमिया
  • हाडांचा कर्करोग
  • मूत्रपिंडाचा कर्करोग
  • पुरुषस्थ ग्रंथीचा कर्करोग
  • मेसोथेलिओमा
  • जर्म सेल ट्यूमर
  • प्रगत थायरॉईड कर्करोग
    संशोधनात काय समोर आलं?

‘The Journal of the American Board of Family Medicine’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात सांगण्यात आलं आहे की, रात्री घाम येणं अनेक वेळा सामान्य असू शकतं. मात्र, जर हा त्रास सातत्यानं होत असेल आणि त्यासोबत इतर काही लक्षणंही दिसत असतील, तर तो गंभीर आजाराचा संकेत ठरू शकतो.

संशोधनानुसार, रात्री घाम येण्यासोबत अचानक वजन कमी होणं, सतत थकवा जाणवणं, भूक कमी होणं किंवा ताप येणं अशी लक्षणं दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

इतर धोक्याची ‘ही’ लक्षणंही ओळखा

तज्ज्ञांच्या मते, शरीरात पुढील बदल दिसत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये :

  • कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं
  • सतत थकवा किंवा अशक्तपणा जाणवणं
  • शरीरावर गाठ किंवा सूज दिसणं
  • विनाकारण रक्तस्राव होणं
  • पोट सतत फुगलेलं वाटणं
  • त्वचेवर नवीन तीळ किंवा रंग बदल दिसणं

अशा प्रकारचे बदल दीर्घकाळ जाणवत असतील, तर त्वरित वैद्यकीय तपासणी करून घेणं आवश्यक आहे.

प्रत्येक वेळी कर्करोगच असेल असं नाही

महत्त्वाची बाब म्हणजे रात्री घाम येणं म्हणजे प्रत्येक वेळी कर्करोगच झाला आहे, असं नाही. काही वेळा हार्मोन्समधील बदल, संसर्ग, औषधांचे दुष्परिणाम किंवा मानसिक तणावामुळेही असा त्रास होऊ शकतो. मात्र, शरीर वारंवार संकेत देत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

स्वतःची काळजी कशी घ्याल?

आरोग्य तज्ज्ञ काही महत्त्वाच्या गोष्टी पाळण्याचा सल्ला देतात:

  • रात्री घाम कधी आणि किती येतो याची नोंद ठेवा
  • संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या
  • नियमित व्यायाम करा
  • ताणतणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करा
  • पुरेसं पाणी प्या
  • वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घ्या
    डॉक्टरांचा सल्ला घेणं का गरजेचं?

अनेक लोक सुरुवातीची लक्षणं किरकोळ समजून त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे आजार गंभीर अवस्थेत पोहोचतो. त्यामुळे शरीरात कोणताही असामान्य बदल जाणवत असेल, तर स्वतः अंदाज बांधण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरतं.

(सूचना : ही माहिती केवळ सामान्य जनजागृतीसाठी आहे. कोणताही उपचार, औषधं किंवा जीवनशैलीत बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)