Nighttime frequent urination : तुमच्यासोबतही असे होते का, की तुम्ही गाढ झोपेत असता आणि लघवीला जाण्याची गरज वाटल्यामुळे अचानक जागे होता? रात्रीतून एकदा किंवा दोनदा, असे होणे सामान्य आहे; परंतु जर हे वारंवार होत राहिले, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. वैद्यकीय भाषेत या स्थितीला नॉक्चुरिया (nocturia), असे म्हणतात. त्यामुळे केवळ तुमच्या झोपेतच व्यत्यय येत नाही, तर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक थकवादेखील येतो.

रात्री वारंवार लघवी येण्याच्या समस्येला नॉक्चुरिया म्हणतात, ‘नॉक्चुरिया’चा त्रास अनेक प्रकारच्या कारणांमुळे उदभवतो. योग तज्ज्ञांच्या मते, सुमारे ९० टक्के प्रकरणांमध्ये ही समस्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमधील बदलांमुळे उदभवते. तज्ज्ञांनी सांगितले की, या समस्येसाठी काही कारणे जबाबदार आहेत, ज्यात बदल केल्यास रात्री शांत झोप मिळू शकते. चला तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, रात्री लघवीसाठी वारंवार उठावे लागण्याचा त्रास होण्यास कोणती कारणे जबाबदार आहेत, ज्यात बदल केल्यास शांत झोप मिळू शकते.

चुकीच्या वेळी जास्त पाणी पिणे

बरेच लोक दिवसभरात कमी पाणी पितात आणि झोपण्यापूर्वी जास्त पाणी, चहा किंवा इतर पेये पितात. त्यामुळे मूत्रपिंडे रात्रभर सक्रिय राहतात आणि मग त्यांची लघवीमुळे वारंवार झोपमोड होऊ शकते. हे टाळण्यासाठी, तज्ज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत जास्त पाणी पिण्याचा आणि रात्रीच्या जेवणानंतर द्रवपदार्थांचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. त्याव्यतिरिक्त संध्याकाळी चहा, कॉफी, शीतपेये किंवा जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने लघवीचे प्रमाण वाढू शकते.

रात्रीचे जेवणदेखील जबाबदार असू शकते

रात्री उशिरा जेवणे, जास्त मीठ असलेले पदार्थ, लोणची, पापड, चिप्स आणि तळलेले पदार्थ खाणे या सर्वांमुळे शरीरात पाणी साठू शकते. जेव्हा एखादी व्यक्ती रात्री झोपते, तेव्हा हे अतिरिक्त पाणी मूत्रपिंडांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. ही समस्या टाळण्यासाठी रात्रीच्या जेवणात खिचडी, डाळ, व्हेजिटेबल सूप, वाफवलेल्या भाज्या आणि अख्ख्या धान्याची रोटी यांसारखे हलके पदार्थ खाणे चांगले मानले जाते. जेवणानंतर काही मिनिटे वज्रासन केल्याने पचनक्रियेसदेखील मदत होऊ शकते.

दीर्घकाळ बसणे

कामावर बसून राहणे, जास्त वेळ गाडी चालवणे किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने पायांमध्ये आणि घोट्यांमध्ये पाणी साचू शकते. रात्री झोपल्यावर हे पाणी पुन्हा रक्तप्रवाहात मिसळून मूत्रपिंडांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज वाढू शकते. तज्ज्ञ दर तासाला काही मिनिटे चालण्याचा आणि संध्याकाळी ‘लेग्ज अप द वॉल पोझ’ (भिंतीला टेकून उभे राहणे) करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त पाणी संतुलित होते.

मूत्राशय आणि श्रोणीच्या तळाच्या स्नायूंचे कमजोर होणे

वाढते वय, लठ्ठपणा, प्रसूतीनंतरची स्थिती, दीर्घकाळ बसणे आणि शारीरिक हालचालींचा अभाव यांमुळे श्रोणीच्या तळाचे स्नायू (पेल्विक फ्लोअर मसल्स) कमकुवत होऊ शकतात. हे स्नायू मूत्राशयाला आधार देतात. हे स्नायू बळकट करण्यासाठी अश्विनी मुद्रा उपयुक्त मानली जाते. या आसनामध्ये गुदद्वार आणि श्रोणीच्या भागातील स्नायू काही सेकंदांसाठी आकुंचित केले जातात आणि नंतर शिथिल केले जातात. नियमित सरावाने मूत्राशयावरील नियंत्रणात सुधारणा होऊ शकते.

मधुमेह हेदेखील कारण असू शकते

तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते, तेव्हा शरीर लघवीद्वारे अतिरिक्त साखर बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते, विशेषतः रात्रीच्या वेळी. जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच, साखरयुक्त पेये, रिफाईंड पीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यांचे सेवन कमी करा. तंतुमय पदार्थांनी युक्त आहार आणि नियमित चालणे या बाबींना तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा.

डॉक्टरांना भेटणे केव्हा आवश्यक?

जर रात्री वारंवार लघवी येण्यासोबतच लघवी करताना जळजळ होणे, ताप, वेदना, लघवीतून रक्त येणे, लघवी करण्यास त्रास होणे, मोठ्याने घोरणे किंवा तीव्र थकवा यांसारख्या समस्या जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तज्ज्ञांच्या मते, ही समस्या स्लीप ॲप्निया, मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI), प्रोस्टेट ग्रंथीची वाढ, मूत्रपिंडाचा आजार किंवा इतर गंभीर आरोग्य समस्यांशीदेखील संबंधित असू शकते. अशा परिस्थितीत वैद्यकीय सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीराचे संकेत समजून घेणे आणि वेळेवर जीवनशैलीत छोटे बदल करणे हे चांगल्या झोपेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

हे आजार असू शकतात

मधुमेह

रात्री वारंवार लघवीला जाणे हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण आहे. शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढल्यामुळे किडनीवर ताण येतो आणि त्यामुळे वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेहामुळे शरीरातील इन्सुलिनची निर्मिती कमी होते किंवा शरीर इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे जर तुम्हाला वारंवार लघवीला जावे लागत असेल, तर त्वरित रक्तातील साखरेची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

मूतखडा

मूत्रपिंडांच्या आजारांमुळेही रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते. मूत्रपिंडातील खडा किंवा खडे अथवा मूत्रपिंडांचे इतर कोणतेही आजार असतील, तर मूत्र तयार होण्याची प्रक्रिया बाधित होते. अशा परिस्थितीत रात्री वारंवार लघवीला उठावे लागते आणि कधी कधी लघवीत रक्तही येऊ शकते.

हृदयविकार किंवा उच्च रक्तदाब

हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबामुळेही रात्री वारंवार लघवीला जाण्याची समस्या उद्भवू शकते. हृदयविकारांमुळे शरीरातील द्रव पदार्थाचे प्रमाण कमी-जास्त होते, ज्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येतो आणि लघवीला जाण्याची इच्छा होते. उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडांवर ताण येऊन मूत्रनिर्मिती वाढते. अशा परिस्थितीत रक्तदाब नियंत्रणात ठेवणे आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखणे आवश्यक आहे.

मूत्राशय मार्गातील संक्रमण

मूत्राशयाच्या संसर्गामुळेही वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते. महिलांमध्ये मूत्राशय संक्रमणाची समस्या जास्त आढळते; परंतु पुरुषांनाही याचा त्रास होऊ शकतो. संसर्गामुळे मूत्राशयात जळजळ, वेदना आणि वारंवार लघवीची इच्छा होऊ शकते. मूत्राशय संक्रमणाचे निदान झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँटीबायोटिक्स घेणे गरजेचे असते.

प्रोस्टेट ग्रंथीची वाढ

पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढ झाल्यास मूत्रमार्गावर दबाव येतो, ज्यामुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो आणि वारंवार लघवीला जाण्याची गरज भासते. ही समस्या विशेषतः वयोमानानुसार जास्त आढळते. प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीमुळे मूत्राशय पूर्णपणे रिकामे होत नाही, ज्यामुळे लघवीची इच्छा वारंवार होते.