Nighttime Symptoms That May Signal Heart, Liver and Kidney Problems: दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री शांत झोप मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, रात्री वारंवार झोपमोड होऊन लघवीला जावे लागत असेल, झोपताना अचानक श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा सकाळी उठल्यावर पाय सुजल्यासारखे वाटत असतील तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. अनेकदा आपण ही लक्षणे वाढते वय, थकवा किंवा रात्री जास्त पाणी प्यायल्यामुळे होत असावीत असे समजून दुर्लक्ष करतो. पण, काही वेळा ही शरीरातील महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यात बिघाड झाल्याची पूर्वसूचना असू शकते. विशेषतः हृदय, यकृत आणि मूत्रपिंडांच्या आरोग्याशी त्यांचा संबंध असू शकतो. मग रात्री दिसणारी कोणती लक्षणे धोक्याची घंटा ठरू शकतात?
१. रात्री वारंवार लघवीला जाणे
तुम्हाला रात्री झोपेतून वारंवार उठून लघवीला जावे लागते का? असे अधूनमधून होणे सामान्य असू शकते. मात्र, नियमितपणे रात्री एकापेक्षा जास्त वेळा लघवीसाठी उठावे लागत असेल तर त्यामागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘नॉक्ट्युरिया’ म्हणतात.
मूत्रपिंडे शरीरातील अतिरिक्त पाणी आणि टाकाऊ पदार्थ गाळून लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकण्याचे काम करतात. त्यांच्या कार्यात बिघाड झाल्यास लघवीच्या प्रमाणात किंवा वारंवारतेत बदल होऊ शकतो. मधुमेहामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानेही वारंवार लघवीला जावे लागू शकते. याशिवाय रात्री जास्त पाणी पिणे, चहा-कॉफीचे सेवन, काही औषधे किंवा मूत्राशयाशी संबंधित समस्याही यामागे असू शकतात.
२. झोपण्यासाठी आडवे होताच श्वास घेण्यास त्रास होतो?
रात्री झोपण्यासाठी आडवे झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणे किंवा झोपेत अचानक धाप लागून जाग येणे, हे लक्षण दुर्लक्षित करू नये. काही वेळा हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास फुप्फुसांमध्ये द्रव साचू शकतो, त्यामुळे आडवे झाल्यावर श्वास घेण्यास त्रास होतो.
या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘ऑर्थोप्निया’ म्हणतात. अशा वेळी काही जणांना बसल्यावर किंवा डोक्याखाली अधिक उशा घेतल्यावर थोडा आराम मिळतो. मात्र, हा त्रास हृदयाच्या कमकुवत कार्यक्षमतेशी संबंधित असू शकतो, त्यामुळे वारंवार असा अनुभव येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
३. रात्री पाय सुजतात किंवा जड वाटतात?
दिवसभर फारसा त्रास जाणवत नसतानाही संध्याकाळी किंवा रात्री पाय सुजल्यासारखे वाटतात का? पायांमध्ये जडपणा, सूज किंवा हलकी वेदना जाणवत असेल तर त्यामागे शरीरात अतिरिक्त द्रव साचण्याची समस्या असू शकते.
हृदयाची कार्यक्षमता कमी होणे, मूत्रपिंडांना शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सोडियम बाहेर टाकण्यात अडचण येणे किंवा यकृताचे कार्य बिघडणे, अशा विविध कारणांमुळे पायांना सूज येऊ शकते, त्यामुळे ही सूज वारंवार दिसत असल्यास केवळ थकवा समजून दुर्लक्ष करू नका.
४. पुरेशी झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतो?
रात्री पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी उठल्यावर थकवा जाणवत असेल, झोप वारंवार मोडत असेल किंवा दिवसभर सुस्ती राहत असेल तर त्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. यकृताच्या कार्यातील बिघाड, थायरॉईडसारख्या हार्मोन्सशी संबंधित समस्या, झोपेचे विकार किंवा इतर आजारांमुळेही झोपेवर परिणाम होऊ शकतो.
यकृत शरीरातील अनेक महत्त्वाच्या चयापचय प्रक्रियांमध्ये आणि विषारी घटकांचे विघटन करण्यामध्ये भूमिका बजावते. त्याच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यास थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. मात्र, केवळ झोप न लागणे किंवा थकवा येणे म्हणजे यकृताचा आजार आहे असे समजू नये.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
शारदा रुग्णालयातील अंतर्गत औषधोपचार विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी या लक्षणांबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या चर्चेचा संदर्भ घेतल्यास, रात्री वारंवार जाणवणारी लक्षणे केवळ झोपेचा त्रास म्हणून न पाहता त्यामागील संभाव्य आरोग्यविषयक कारणे तपासणे महत्त्वाचे ठरते. लक्षणे नियमितपणे जाणवत असतील किंवा त्यांची तीव्रता वाढत असेल तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
यासाठी रक्तदाब, रक्तातील साखर, मूत्रपिंडांचे कार्य आणि यकृताच्या कार्याशी संबंधित तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करता येतात. रात्री झोपण्यापूर्वी अतिप्रमाणात पाणी पिणे टाळावे; मात्र शरीरात पाण्याची कमतरता होणार नाही याचीही काळजी घ्यावी. रात्री जास्त मीठ असलेले पदार्थ आणि जड जेवण टाळणे फायदेशीर ठरू शकते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराची सवयही महत्त्वाची आहे.
(एक गोष्ट लक्षात ठेवा : रात्री लघवीला जाणे, पायांना सूज येणे किंवा झोपताना धाप लागणे ही लक्षणे दिसली म्हणजे हार्ट अटॅक येणारच असे नाही. मात्र, छातीत दुखणे, तीव्र श्वासोच्छ्वासाचा त्रास, थंड घाम किंवा अचानक चक्कर येणे अशी लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्या. शरीर देत असलेल्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिल्यास संभाव्य आजारांचे निदान लवकर होण्यास मदत होऊ शकते.)
