What Is the Secret Behind Nitin Gadkari’s 46 Kg Weight Loss: वजन कमी करण्यासाठी अनेक जण वेगवेगळे डाएट प्लॅन, कठोर व्यायाम किंवा झटपट परिणाम देणाऱ्या उपायांचा अवलंब करतात. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तब्बल ४६ किलो वजन कमी करीत स्वतःमध्ये केलेला बदल हा कोणत्याही शॉर्टकटमुळे नाही, तर शिस्तबद्ध दिनचर्या आणि नियमित व्यायाम यांमुळे शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. विशेष म्हणजे, कोविड काळानंतर त्यांनी आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलल्याचा खुलासा केला.

फराह खानच्या यूट्यूब चॅनेलवरील एका व्हिडीओमध्ये नितीन गडकरी यांनी त्यांचा दैनंदिन दिनक्रम आणि फिटनेस यांबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. या गप्पांमध्ये त्यांनी आपल्या व्यग्र वेळापत्रकासोबतच आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय कसा घेतला, याची माहिती दिली.

त्यांनी सांगितले की, रात्री उशिरापर्यंत बैठका आणि काम सुरू असतानाही व्यायामात कोणतीही तडजोड करीत नाही. “रात्री साडेनऊ वाजले आहेत. तुमच्याशी भेट झाल्यानंतरही माझी रात्री १ वाजेपर्यंत कामं आहेत. त्यानंतर सकाळी ७ वाजता उठून मी अडीच तास व्यायाम करतो. एकेकाळी माझं वजन १३५ किलो होतं, आता ते ८९ किलो आहे. या दिनचर्येचा सकारात्मक परिणाम माझ्या चेहऱ्यावरही दिसतो,” असे नितीन गडकरी यांनी सांगितले.

याआधी एएनआयला दिलेल्या पॉडकास्ट मुलाखतीतही त्यांनी आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल सविस्तर भाष्य केले होते. कोविडनंतर तब्बल ४६ किलो वजन कमी केल्याचे त्यांनी सांगितले. हा बदल केवळ दिसण्यासाठी नव्हता, तर स्वतःच्या आरोग्याबद्दल गंभीरपणे विचार करण्याचा तो टप्पा होता, असे त्यांनी स्पष्ट केले.

गडकरी यांच्या मते, अनेक वर्षे कामाच्या व्यापात त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. ” माझं आयुष्य पूर्णपणे अनियोजित आणि शिस्तीशिवाय होतं; पण आता व्यायाम हा माझ्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग झाला आहे. दररोज दोन ते अडीच तास व्यायाम करतो,” असे त्यांनी सांगितले.

त्यांच्या आयुष्यातील हा मोठा बदल कोविड काळात घडलेल्या काही वैयक्तिक घटनांनंतर झाला. त्या काळात आपल्या काही जवळच्या मित्रांचे निधन झाल्यानंतर आरोग्याबाबत गंभीर निर्णय घेण्याची गरज असल्याची जाणीव झाल्याचे त्यांनी सांगितले. “कोविडमध्ये माझ्यासोबत असलेले काही मित्र गेले. तेव्हा मला जाणवलं की, आता स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” असे त्यांनी नमूद केले.

वजन कमी करण्यासाठी ते नेमकं काय करतात, याबाबतही त्यांनी माहिती दिली. त्यांच्या दिनक्रमात प्राणायाम, स्ट्रेचिंग, शरीर बळकट करणारे व्यायाम, तसेच प्रशिक्षित प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव या घटनांचा समावेश आहे.

मात्र, सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या व्यक्तींना दररोज दोन ते अडीच तास व्यायाम करणं शक्य आहे का? याबाबत फिटनेस आणि लाइफस्टाईल सल्लागार साधना सिंग यांनी महत्त्वाचे मत व्यक्त केले आहे.

त्यांच्या मते, बहुतांश कामकाजी लोकांसाठी दररोज इतका वेळ व्यायामासाठी देणं दीर्घकाळ शक्य होईलच असं नाही. मात्र, यशाचं खरं गमक व्यायामाच्या कालावधीत नसून सातत्य आणि शिस्तीत आहे. ४५ ते ६० मिनिटांचा नियमित व्यायाम, ज्यामध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि शरीराची लवचिकता दीर्घकाळासाठी प्रभावी ठरू शकतो.

त्यांच्या मते, बहुतांश कामकाजी लोकांसाठी दररोज इतका वेळ व्यायामासाठी देणं दीर्घकाळ शक्य होईलच, असं नाही. मात्र, यशाचं खरं गमक व्यायामाच्या कालावधीत नसून, सातत्य आणि शिस्तीत आहे. ४५ ते ६० मिनिटांचा नियमित व्यायाम, ज्यामध्ये कार्डिओ, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि शरीराची लवचिकता वाढवणाऱ्या व्यायामप्रकारांचा समावेश असेल, तर तो व्यायामही दीर्घकाळासाठी प्रभावी ठरू शकतो.

साधना सिंग यांच्या मते, प्राणायामामुळे तणाव नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि हार्मोन्सचा समतोल राखण्यासही फायदा होतो. स्ट्रेचिंगमुळे सांधे, रक्ताभिसरण आणि शरीराची हालचाल सुधारते; तर स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे स्नायू मजबूत होतात, चयापचय प्रक्रिया सुधारते आणि वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढण्याचा धोका कमी होतो.

तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी केवळ कमी खाणे किंवा फक्त कार्डिओ व्यायाम करणे पुरेसे नसते. प्राणायाम, स्ट्रेचिंग व स्ट्रेंथ ट्रेनिंग यांचा समतोल साधणारी जीवनशैली अवलंबणेच दीर्घकाळ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकते.

(टीप : ही माहिती नितीन गडकरी यांनी विविध मुलाखतींमध्ये केलेली विधानं आणि फिटनेस तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतं यांवर आधारित आहे. कोणताही नवीन व्यायाम किंवा फिटनेस दिनक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)