Why Heart Rates Increase Before The Age Of 40 : चाळीशी आधीच हृदयाचे ठोके वाढण्याची कारणे: वय वाढले की शरीराचे अवयव थकणे आणि काम करताना दम लागणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. यात हृदयाचे ठोके वाढणे किंवा धडधड होणे याचाही समावेश होतो. सहसा असे मानले जाते की, वयाची चाळीशी पार केली की माणसाचे शरीर थकूलागते आणि हृदयाची धडधड वाढू लागते. परंतु, काही लोकांमध्ये वयाची ४० वर्षे पूर्ण होण्याआधीच हृदयाची लय का बिघडू लागते? यामागे काय कारणे असावीत? हे अनुवंशिक आहे की इतर काही कारण आहे? याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
चाळीशीआधीच हृदयाची धडधड एवढी का वाढते? (Why Heartbeat Accelerates Before Age 40)
‘सायन्स टेक डेली’ (SciTechDaily) मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, वयाची ४० वर्षे पूर्ण होण्याआधीच हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे ही साधी गोष्ट नाही. खरं सांगायचे तर, हा एट्रियल फिब्रिलेशन (AFib – Atrial Fibrillation) नावाचा हृदयाशी संबंधित एक आजार आहे. हा आजार तेव्हा सुरू होतो, जेव्हा हृदयाच्या वरील भागात (Atria) विद्युत संकेत (Electrical Signals) बिघडू लागतात. यामुळे खालील भागाशी ताळमेळ राहत नाही आणि हृदय अत्यंत वेगाने व अनियमितपणे धडधडू लागते. असे झाल्यास हृदयाच्या आत रक्त साचू लागते आणि रक्ताच्या गाठी (Blood Clots) तयार होतात. पुढे जाऊन यामुळे थेट ब्रेन स्ट्रोक (मस्तिष्काघात), पक्षाघात (Paralysis) होऊ शकतो किंवा काही गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.
एकट्या अमेरिकेत १ कोटींहून अधिक लोक प्रभावित (Over 10 Million People Affected in the US)
नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार, एकट्या अमेरिकेतच तब्बल १ कोटींहून अधिक प्रौढ व्यक्ती या आजाराचा सामना करत आहेत. सहसा या आजाराचा संबंध वाढते वय, उच्च रक्तदाब (High BP), मधुमेह (Diabetes) आणि दीर्घकालीन हृदयरोग यांच्याशी जोडला जातो. परंतु, अनेकदा जनुकांमध्ये (Genes) दोष असल्यामुळे हा आजार वयाच्या ३० किंवा ४० व्या वर्षीच अचानक उद्भवतो.
पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रमुख डॉ. दाऊद दरबार सांगतात, “अनेक लोकांना तर थेट स्ट्रोकचा झटका आल्यावरच कळते की त्यांना AFib हा आजार झाला आहे. जर आपण एकाजरी रुग्णाला स्ट्रोक येण्यापासून वाचवू शकलो, तर त्या रुग्णासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा दिलासा ठरेल.”
जेव्हा आनुवंशिक धोके एकत्र येऊन हृदयाची लय बिघडवतात (When Genetic Risks Combine to Disrupt Heart Rhythm)
डॉ. दरबार यांच्या पथकाने या आजारावर एक मोठे संशोधन केले आहे. या संशोधनात ‘जेनेटिक म्युटेशन’चा (म्हणजेच आपल्या DNA मधील बदल) फरक प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा का पडतो? हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
या संशोधनात LMNA नावाच्या एका जनुकाचा (Gene) बारकाईने अभ्यास करण्यात आला. हे जनुक पेशींच्या आत डीएनए व्यवस्थित ठेवण्याचे काम करते. जेव्हा या जनुकातच काही दोष निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवणारे इतर जीन्स योग्य प्रकारे काम करू शकत नाहीत. जेव्हा या दुर्मिळ दोषासह शरीरातील इतर सामान्य आनुवंशिक धोकेही एकत्र येतात, तेव्हा तो रुग्ण वयाआधीच या आजाराच्या विळख्यात अडकतो.
आनुवंशिक बदलांमुळे समस्या अधिक गंभीर होते (Genetic Variations Exacerbate the Problem)
संशोधकांना असेही दिसून आले की, दुर्मिळ जनुकीय बदलासोबतच शरीरात सामान्य डीएनए बदलांचा भार जास्त झाला, तर कमी वयातच AFib होण्याचा धोका थेट दुप्पट होतो. या संशोधनातून अनेक चक्रावून टाकणारे खुलासे समोर आले आहेत, ज्यावर डॉ. दरबार यांनी सविस्तर मांडणी केली आहे.
प्रश्न-उत्तर: संशोधकांकडून सोप्या भाषेत समजून घ्या AFib चे गणित (Q&A: Understanding the Logic of AFib)
- प्रश्न: आपले हृदय एरवी कसे धडधडते आणि AFib मध्ये नक्की काय गडबड होते?
- उत्तर : आपल्या हृदयाचे ठोके एका नैसर्गिक पेसमेकरमधून येणाऱ्या विद्युत (Electrical) संकेतांमुळे सुरू होतात. हा संकेत वरील भागातून संपूर्ण हृदयात एकदम लयबद्ध पद्धतीने पसरतो, ज्यामुळे रक्त शरीरात व्यवस्थित पंप होते. AFib मध्ये ही संपूर्ण प्रणालीच कोलमडते. एक स्पष्ट संकेत येण्याऐवजी अनेक अनियंत्रित संकेत एकाच वेळी निर्माण होतात. त्यामुळे हृदयाचा वरील भाग धडधडण्याऐवजी थरथरू लागतो. यामुळे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरचा (Heart Failure) धोका प्रचंड वाढतो.
- प्रश्न: AFib ला तर वृद्धापकाळातील आजार मानतात, मग यात जीन्सचा (Genes) काय संबंध?
- उत्तर: बरोबर आहे, AFib ची ८०% प्रकरणे ही वाढते वय, बीपी आणि मधुमेहामुळेच असतात. परंतु, जवळपास २०% प्रकरणे ही आनुवंशिक (Genetic) असतात. आपल्या सर्वांच्याच शरीरात हजारो लहान-लहान आनुवंशिक बदल होत असतात. एखादाच बदल झाल्यास त्याचा विशेष फरक पडत नाही. परंतु, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरात दुर्मिळ LMNA म्युटेशनसोबत हे सामान्य आनुवंशिक बदलही मोठ्या प्रमाणावर जमा होतात, तेव्हा आजाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. याला ‘ॲडिटिव्ह रिस्क’ (Additive Risk) म्हणजेच एकत्र येऊन वाढणारा धोका म्हटले जाते. यू.के. बायोबँकच्या ५ लाख लोकांच्या माहितीवरून (Data) स्पष्ट झाले आहे की, अशा लोकांमध्ये कमी वयात AFib होण्याचा धोका दुप्पट होता. काही कुटुंबांमध्ये अनुवांशिकरित्या LMNA जीन्समध्येच दोष असतो. प्रयोगशाळेत हृदयाच्या पेशींचे मॉडेल बनवून पाहिल्यावर लक्षात आले की, LMNA म्युटेशन आणि हे सामान्य आनुवंशिक बदल एकत्र येऊन एकाच मार्गाने हल्ला करतात.हे म्युटेशन हृदयाच्या पेशींमधील सोडियमचा प्रवाह बाधित करते किंवा बिघडवते, जो योग्य ठोके पडण्यासाठी अत्यंत गरजेचा असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, दुर्मिळ म्युटेशन हृदयाला संवेदनशील बनवते आणि बाकीचे सामान्य आनुवंशिक बदल त्या आगीत तेल ओतण्याचे काम करतात. म्हणूनच, फक्त एकाच जनुकाचा विचार न करता संपूर्ण आनुवंशिक रचनेचा (Genetic Structure) विचार करणे गरजेचे आहे.
- प्रश्न: एका सामान्य माणसासाठी या संशोधनाचा काय फायदा आहे?
- उत्तर : हे संशोधन सध्या प्रयोगशाळेतील मॉडेलवर झाले आहे, त्यामुळे प्रत्यक्ष वैद्यकीय उपचारांमध्ये (Clinics) याचा वापर सुरू होण्यासाठी थोडा वेळ लागेल. परंतु, यामुळे भविष्यात कोणत्या रुग्णाला ऐन तरुणात AFib होण्याचा सर्वाधिक धोका आहे, हे आधीच ओळखता येईल. LMNA जनुकाकडे आतापर्यंत फक्त ‘हार्ट फेल्युअर’शी संबंधित घटक म्हणून पाहिले जायचे, परंतु या अभ्यासाने दाखवून दिले आहे की हे AFib ची सुरुवातही करू शकते. जर आपण एखाद्या अति-धोकादायक (High-Risk) रुग्णाला वेळेतच ओळखले, तर स्मार्टवॉच किंवा वेअरेबल मॉनिटरच्या मदतीने स्ट्रोक येण्यापूर्वीच आजाराचे निदान करू शकतो. या संशोधनाचा उद्देश आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा, तो आजार होऊच न देणे हा आहे.
