Health Benefits Of Purple Okra : तुम्ही कधी जांभळी भेंडी खाल्ली आहे का? या भेंडीला ‘मॅजेंटा भेंडी’ असेही म्हणतात. ही तिच्या हिरव्या भेंटी इतकी सामान्य नाही, पण आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर आहे. त्यामुळे, जर तुम्हाला ती मिळाली, तर तिचे नक्की सेवन करा कारण तिचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. या भाजीबद्दल अधिक माहिती देताना, क्लिनिकल डायटिशियन गरिमा गोयल यांनी सांगितले की, “जांभळी भेंडी ही नेहमीच्या हिरव्या भेंडीचा एक आकर्षक प्रकार आहे. तिचा लक्षवेधी जांभळा रंग ‘अँथोसायनिन्स’मुळे येतो. ही नैसर्गिक रंगद्रव्ये बेरी, लाल कोबी आणि जांभळ्या गाजरांमध्येही आढळतात आणि ती त्यांच्या अँटिऑक्सिडंट व दाह-विरोधी (anti-inflammatory) गुणधर्मांसाठी ओळखली जातात.”

गोयल पुढे म्हणाल्या की, ही संयुगे पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून वाचवण्यास, हृदयाच्या आरोग्यास मदत करण्यास आणि चयापचय (metabolism) संतुलन सुधारण्यास हातभार लावू शकतात. त्यांनी असेही सांगितले की, पौष्टिकतेच्या बाबतीत जांभळी आणि हिरवी भेंडी बऱ्यापैकी सारख्याच आहेत — “दोन्हीमध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फोलेट आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, परंतु जांभळ्या प्रकारात तिच्या रंगद्रव्यामुळे अँटिऑक्सिडंट्सचा अतिरिक्त फायदा मिळतो.”

जांभळी भेंडी आकर्षक का वाटते?

गोयल म्हणाल्या, “यामुळे नेहमीच्या भेंडीचे सर्व फायदे मिळतातच, शिवाय रोजच्या जेवणाला एक रंगीबेरंगी आणि अँटिऑक्सिडंट्सनी समृद्ध असा वेगळा स्वादही मिळतो.”

“भेंडीमधील फायबर आतड्यांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि पोट भरल्याची भावना निर्माण करते. त्यामुळे जे लोक वजन नियंत्रण किंवा संतुलित पोषणावर लक्ष केंद्रित करत आहेत, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर, त्यातील अँटिऑक्सिडंट्स दाह कमी करून आणि पेशींचे एकूण आरोग्य सुधारून दीर्घकालीन फायदे देऊ शकतात,” असे त्यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

काय लक्षात घ्यावे?

एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, शिजवताना उष्णता आणि आम्लतेमुळे (acidity) या भेंडीचा जांभळा रंग बदलून तो हिरवा किंवा तपकिरी होतो. ‘तिचा मूळ रंग आणि पोषक तत्त्वे टिकवून ठेवण्यासाठी ती अगदी हलकी शिजवणे उत्तम ठरते; जसे की पटकन परतून (saute) किंवा भाजून घेणे, किंवा आमटी-रस्स्यामध्ये स्वयंपाकाच्या अगदी शेवटी घालणे,’ असे गोयल म्हणाल्या.”

तिची उपलब्धता अजूनही मर्यादित असू शकते आणि ती अनेकदा सेंद्रिय दुकाने, शेतकरी बाजार (Farmers’ Market) किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आढळते.

आहारात जांभळ्या भेंडीचा समावेश करणे हा तुमच्या ताटात अधिक विविधता आणि सूक्ष्म पोषक तत्त्वांची भर घालण्याचा एक सोपा मार्ग आहे. “एकट्या भेंडीला सुपरफूड म्हणता येणार नाही, पण ती विविध, वनस्पती-समृद्ध आहारात उत्तम प्रकारे बसते. नेहमीच्या भेंडीच्या तुलनेत दिसायला आकर्षक तर आहेच, शिवाय पौष्टिकतेच्या बाबतीतही सरस आहे,” असे गोयल म्हणाल्या.