Chronic Constipation Baba Ramdev : धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि असंतुलित आहारामुळे बद्धकोष्ठतेची समस्या होणे सामान्य बाब झाली आहे. अधूनमधून होणारी बद्धकोष्ठता सहसा चिंतेचे कारण नसते; परंतु २-४ दिवस पोट साफ होत नसेल किंवा हा त्रास वारंवार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. दीर्घकाळ पोट साफ न झाल्यामुळे मूळव्याध, फिशर (गुदद्वारातील भेगा) आणि शौचाच्या वेळी वेदना होणे किंवा जास्त जोर लावावा लागणे यांसारखे त्रास उद्भवू शकतात. सततच्या बद्धकोष्ठतेसोबतच पोटदुखी, शौचातून रक्त पडणे किंवा अचानक वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसल्यास सतर्क राहावे.

बद्धकोष्ठतेवर उपचार करण्यासाठी आहार आणि जीवनशैलीत सुधारणा करणे आवश्यक आहे. आहारात पुरेसे फायबर, पाणी आणि नियमित शारीरिक हालचालींचा समावेश करावा. तीव्र त्रास असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, काही विशिष्ट योगासने पचनसंस्थेला सक्रिय करतात आणि पोटाचे स्नायू मजबूत करतात. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारी ५ योगासने आणि ती करण्याची योग्य पद्धत:

पवनमुक्तासन (Pawanmuktasana / Wind-Relieving Pose):

पाठीवर झोपून गुडघे वाकवावेत आणि पाय पोटाकडे आणावेत. दोन्ही हातांनी गुडघे धरून ते शरीराकडे खेचावेत. हे करताना श्वास हळूहळू आत घेणे आणि सोडणे चालू ठेवावे. या आसनामुळे पोट आणि कमरेभोवतीचे स्नायू ताणले जातात. तीव्र पाठदुखी असल्यास पाय जास्त न खेचता सौम्य ताण द्यावा.

सेतुबंधासन (Setu Bandhasana / Bridge Pose):

पाठीवर झोपून गुडघे वाकवावेत आणि पाय जमिनीवर ठेकवावेत. श्वास घेताना हळूहळू नितंब आणि कंबरेचा भाग वर उचलावा. ही स्थिती काही वेळ धरून ठेवल्यानंतर हळूहळू पूर्वस्थितीत यावे. या आसनामुळे पोटाचे आणि कंबरेचे स्नायू सक्रिय होतात.

उत्तानपादासन (Uttanpadasana / Raised Leg Pose):

पाठीवर सरळ झोपून दोन्ही पाय हळूहळू वर उचलावेत. काही सेकंद पाय याच स्थितीत ठेवून नंतर हळूहळू खाली आणावेत. यामुळे पोटाच्या स्नायूंवर योग्य दाब येऊन ते मजबूत होतात.

नौकासन (Naukasana / Boat Pose):

या आसनात शरीराचा आकार होडीसारखा (नौकेसारखा) होतो. पाठीवर झोपून नितंबावर शरीराचा तोल सांभाळात शरीराचा वरचा भाग (धड) आणि पाय एकाच वेळी हवेत वर उचलावेत. श्वासोच्छ्वास नियमित ठेवून क्षमतेनुसारच ही स्थिती टिकवून ठेवावी.

पादवृत्तासन (Padavrttasana / Leg Circles Pose):

पाठीवर झोपून एक पाय वर उचलावा आणि गोलाकार फिरवावा. ही क्रिया हळू आणि नियंत्रित पद्धतीने करावी. यामुळे पोटाचे व पायांचे स्नायू सक्रिय होतात. सुरुवातीला कमी फेऱ्या मारून नंतर हळूहळू सराव वाढवावा.

योगाभ्यास करताना घ्यायची काळजी:

योगाभ्यास नेहमी स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसारच करावा. शरीरावर अनावश्यक ताण देणे किंवा जबरदस्ती करणे टाळावे. स्लिप डिस्क, पाठदुखी, मणक्याचे आजार किंवा अलीकडेच शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय सराव करू नये. बद्धकोष्ठतेसोबत गंभीर लक्षणे असल्यास वैद्यकीय सल्ला घेणे अनिवार्य आहे.

(टीप: ही माहिती सामान्य आरोग्य जागृतीसाठी आहे. गंभीर त्रास असल्यास वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा.)