Simple Ways to Stay Active Throughout Your Day : रोजच्या धावपळीच्या जीवनात दररोज व्यायामासाठी एक तास काढणे अनेकदा कठीण जाते. तर यासाठी आम्ही तुम्हाला आज एक सोपा उपाय सांगणार आहोत. दिवभरातील हालचालींचे छोटे-छोटे भाग करा आणि ते दिवसभरात वेगवेगळ्या वेळी करा. फिटनेस ट्रेनर डॅन गो यांनी अलीकडेच ‘एक्सरसाईज स्नॅक्स’ (Exercise Snacks) या प्रकाराबद्दल सांगितले आहे. यामध्ये कमी वेळासाठी केल्या जाणाऱ्या शारीरिक हालचालींचा समावेश होतो. यासाठी व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नसते आणि दैनंदिन दिनचर्येत या छोट्या हालचालींचा सहज समावेश करून शारीरिक सक्रियताही वाढवता येते.
२७ ऑगस्ट रोजी केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये डॅन यांनी “जगातील अंदाजे ६० ते ८५ टक्के लोक आणि जवळपास दोन-तृतीयांश मुले निष्क्रिय जीवनशैली जगतात,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार लोक दिवसातील बराच वेळ बसून घालवतात. त्यामुळे वारंवार हालचाल करणे हा निष्क्रिय जीवनशैलीला आळा घालण्याचा एक मार्ग ठरू शकतो.
‘एक्सरसाईज स्नॅक्स’ म्हणजे काय?
‘एक्सरसाईज स्नॅक्स’च्या संकल्पनेमागचा मूळ विचार अगदी सोपा आहे. व्यायामाच्या एका विशिष्ट सत्राची वाट पाहण्याऐवजी, लोक दिवसभरात थोड्या-थोड्या वेळासाठी शारीरिक हालचाल करू शकतात. दर ३० मिनिटांनी पाच मिनिटे चालल्याने दीर्घकाळ बसून राहण्याचे काही दुष्परिणाम कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच तासनतास एकाच जागी बसून राहण्याऐवजी थोडा वेळ चालण्यासाठी उठणे. व्यस्त वेळापत्रकात अशा छोट्या हालचालींचा समावेश करणे सोपे असते आणि त्याद्वारे दिवसभरात एकूण हालचालींचे प्रमाण वाढवता येते.
दिवसभरात अधिक हालचाल करण्याचे सोपे मार्ग कोणते?
‘एक्सरसाईज स्नॅक्स’साठी जिम, व्यायामसाहित्य किंवा औपचारिक व्यायामाची गरज नसते. त्याऐवजी नेहमीच्या दिनचर्येत छोटे बदल करा.
१. गाडी दूर पार्क करा – तुमच्या ऑफिस, कॉलेज किंवा ज्या ठिकाणी तुम्ही थांबला आहात त्यापासून लांब अंतरावर गाडी पार्क केल्यास चालण्याचा अतिरिक्त सराव होऊ शकतो.
२. पायऱ्या – जिथे शक्य असेल तिथे लिफ्ट किंवा एस्केलेटरऐवजी पायऱ्यांचा वापर करा.
३. वॉकिंग ट्रेडमिल वापरा – जे लोक दिवसातील बराच वेळ डेस्कवर बसून काम करतात, त्यांच्यासाठी ‘वॉकिंग ट्रेडमिल’ हा काम करत असतानाच हालचाल करण्याचा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
ज्यांना व्यायामासाठी पूर्ण एक तास बाजूला काढणे कठीण किंवा दडपणाचे वाटते, त्यांच्यासाठी हालचालींचे असे अनेक छोटे टप्पे अधिक सोयीचे वाटू शकतात. व्यायाम म्हणजे केवळ एका विशिष्ट सत्रात केला जाणारा प्रकार असतो असे न मानता दिवसभरात हालचाल करण्याच्या छोट्या संधी शोधणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. अशा छोट्या ‘एक्सरसाईज स्नॅक्स’चा नियमितपणे सराव केल्यास, त्यांचा दैनंदिन दिनचर्येत सहज समावेश होऊन जीवनशैली अधिक सक्रिय होण्यास मदत होऊ शकते.
