Nose Picking Health Risks: बऱ्याच लोकांना नाक खाजवायची किंवा वारंवार नाकात बोट घालायची सवय असते. अनेकदा ते विचार न करता फक्त बोट फिरवत असतात. जर नाकात काही समस्या असेल तर ठीक आहे, पण याचीच सवय लागी तर मात्र ते हानिकारक ठरू शकतं. डॉक्टर सांगतात की, वारंवार नाकात बोटं घातल्याने, खाजवल्याने नाकाच्या आतील नाजूक आवरणाला इजा होऊ शकते आणि कालांतराने संसर्गाचा धोका वाढतो. तर मग याबाबत सविस्तर या लेखामधून जाणून घेऊया…

मुंबईतील वॉकहार्ट हॉस्पिटलमधील ईएनटी तज्ज्ञ डॉ. नयन के. शेट्टी यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, नाकाचे आतील अस्तर खूपच संवेदनशील असते. वारंवार बोटांनी तिथे खाजव्यास तिथे सहज जखम किंवा इजा होऊ शकते. अधूनमधून नाक खाजवल्यास कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. पण जर ही हे वारंवार करत असाल, नाकाच्या आतील अस्तरामध्ये जळजळ होऊन सूजही येऊ शकते.

नाकाचा आकार बदलतो का?

डॉ. शेट्टी सांगतात की, नाकपुड्यांचे आतील अस्तर खूप पातळ आणि संवेदनशील असते. वारंवार घासल्याने किंवा खाजवल्याने किरकोळ इजा आणि सूज येऊ शकते. सततच्या त्रासामुळे नाकपुड्यांभेवतीच्या मऊ उती कमकुवत होऊ शकतात. काही केसेसमध्ये नाकाला वारंवार ताणल्याने किंवा खेचल्याने कालांतराने त्याचा आकार किंचित बदलू शकतो. त्यामुळे नाकपुड्या पूर्वीपेक्षा अधिक रूंद दिसू लागतात. मात्र हा बदल हळूहळू होतो.

डॉ. शेट्टी यांनी सांगितले की, नाकाचा आका एक-दोन दिवसात बदलत नाही. मात्र जर वारंवार बोट घालण्याची सवय दीर्घकाळ चालू राहिली, तर त्याचा नाकाच्या ऊतींच्या रचनेवर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

संसर्गाचा धोका कसा वाढतो?

दिवसभर वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श केल्याने हातांवर विविध जंतू जमा होतात. अशा परिस्थितीत नाकात बोटं घातल्याने हातांवर असलेले जीवाणू आणि इतर जंतू नाकाच्या आत पोहोचू शकतात. डॉक्टरांच्या मते, जेव्हा बोटं नाकात जातात, तेव्हा हे जंतू नाकाच्या आतील आवरणापर्यंत सहज पोहोचू शकतात. त्याचबरोबर बोटं आत घातल्यामुळे होणाऱ्या लहान ओरखड्यांमुळे संसर्गाचा धोका आणखी वाढतो. या लहान जखमांमुळे जीवाणूंना ऊतींमध्ये सहज प्रवेश मिळतो. त्यामुळे नाकाच्या आत वेदनादायक व्रण, सूज किंवा लहान फोड येऊ शकतात. वारंवार होणाऱ्या संसर्गामुळे नाकाच्या आत सूज, जळजळ आणि खपली धरणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

तुम्हाला नाक खाजवायची सवय असेल, तर काही लक्षणे नाकाच्या आतील आवरणाला झालेल्या नुकसानाचे संकेत देतात. डॉ. शेट्टी सांगतात की, वारंवार नाकातून रक्त येणे, सतत जळजळ होणे, दोन्ही नाकपुड्यांमध्ये वेदना होणे किंवा वारंवार खपली धरणे अशा समस्या असू शकतात.

याची लक्षणे कोणती?

  • नाकाच्या आत लालसरपणा
  • सूज किंवा सेन्सिटिव्हिटी
  • नाकाच्या जळजळ किंवा वेदना

जर ही लक्षणे वारंवार दिसून येत असतील, तर याचा अर्थ असा होऊ शकतो की नाकाच्या आतील आवरणाला सतत वेदना होत आहे किंवा ते खराब होत आहे.

नाकाचा कोरडेपणा कसा कमी करावा?

डॉ. शेट्टी यांनी सांगितले की, नाक ओलसर ठेवल्याने ही सवय मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शक्यतो नाक कोरडे होणार याची काळजी घ्यावी.

त्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा

  • नाकाच्या आतील त्वचा ओलसर ठेवण्यासाठी सलाईन नेझल स्प्रे वापरा
  • भरपूर पाणी प्या
  • जिथे झोपता त्या जागेतील हवापुरेशी दमट असावी
  • नाक पुसण्यासाठी बोटाऐवजी मऊ आणि सुती रूमाल वापरा

डॉ. शेट्टी यांच्या मते, नाकाच्या कोरडेपणावर वेळेवर उपचार केल्यास नाक खाजवायची इच्छा कमी होऊ शकते आणि नाकपुड्यांच्या आतील नाजूक आवरणाचे संरक्षण होऊ शकते.