Not Every Fruit Is Safe During Monsoon: पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे पचनशक्ती काही प्रमाणात मंदावू शकते आणि दूषित अन्न-पाण्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे या ऋतूत संतुलित, ताजे आणि स्वच्छ अन्न खाणे विशेष महत्त्वाचे असते. गरम, ताजे शिजवलेले पदार्थ, हंगामी भाज्या, डाळी, सूप आणि पुरेशा प्रमाणात पाणी यांचा आहारात समावेश करावा. रस्त्यावरील उघड्यावर मिळणारे अन्न, जास्त तेलकट किंवा अर्धवट शिजवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. तसेच फळे आणि भाज्या स्वच्छ धुऊन खाव्यात. योग्य आहारासोबत स्वच्छतेची काळजी घेतल्यास पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवण्यास आणि अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.

फळे तुमच्या आरोग्यासाठी निःसंशयपणे फायदेशीर आहेत; परंतु पावसाळ्यात काही विशिष्ट फळे खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. ती खाणे फायद्याऐवजी हानिकारक ठरू शकते. ठेचलेली किंवा जास्त पाणी असलेली फळे पावसाळ्यात लवकर खराब होतात. तसेच त्यांच्यामध्ये जीवाणू किंवा कीटक असू शकतात, ज्यामुळे पोटदुखी, अन्नातून विषबाधा, उलट्या, जुलाब आणि सर्दी होऊ शकते.

कधी कधी बाहेरून स्वच्छ दिसणारी फळेदेखील आतून सडलेली असतात आणि आरोग्यासाठी विषाप्रमाणे काम करतात. त्यामुळे अशी फळे खाणे टाळणे महत्त्वाचे आहे.

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘ही’ फळं

बेरी

पावसाळ्यात स्ट्रॉबेरी, ब्ल्यूबेरी व रास्पबेरी यांसारखी फळे खाऊ नयेत. कारण- ती जीवाणूंमुळे सहजपणे आंबतातच; पण त्याचप्रमाणे आर्द्रतेमुळेही खराब होण्याची प्रक्रिया लवकर होते. अशा फळांचे सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात आणि अन्नातून विषबाधादेखील होऊ शकते.

टरबूज आणि खरबूज

उन्हाळ्यात लोक कलिंगड आणि खरबूज ही फळे भरपूर प्रमाणात खातात; मात्र पावसाळ्यात ती खाणे टाळावे. कारण- ही फळे खूप ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे ती अधिक लवकर खराब होतात आणि दूषित होतात.

आंबा

पावसाळ्यातही आंबे खाणे टाळावे. आंब्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे पोटात जळजळ आणि आम्लपित्त होऊ शकते. तसेच त्यामुळे पोटात जडपणा, गॅस आणि अपचनाचा धोकाही वाढू शकतो.

पीच

पीच हे एक असे फळ आहे, जे ओलाव्यामुळे लवकर नरम पडू शकते. तसेच, त्याला सहजपणे बुरशी लागते, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते.

काकडी

पावसाळ्यात जास्त पाणी असलेल्या काकड्या खाणे टाळावे. कारण- त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.