सतत येणारा खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आणि छातीत जडपणा… ही लक्षणे दिसताच अनेकदा रुग्ण दमा (Asthma), ब्राँकायटिस किंवा सामान्य संसर्ग समजून त्याकडे दुर्लक्ष करतात; पण, हे मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते. असेच काहीसे एका ५० वर्षीय महिलेबरोबरही घडले. या महिलेवर काही आठवड्यांपासून दम्यासाठी उपचार सुरू होता. डॉक्टरांनी तिला इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला होता; पण, नियमित वापरानंतरही त्या महिलेच्या प्रकृतीमध्ये कोणतीही सुधारणा झाली नव्हती. जेव्हा काहीच फरक पडेनासा झाला तेव्हा त्या महिलेने सेकंड ओपिनियन बंगळूरच्या सक्रा वर्ल्ड हॉस्पिटल क्रिटिकल केअर आणि इंटरव्हेंशनल पल्मोनोलॉजी तज्ञ डॉ. सचिन कुमार याच्याकडे उपचार सुरू केले.

डॉ. सचिन कुमार यांनी औषधे बदलण्याऐवजी सुरुवातीपासून त्या महिलेची पुन्हा सखोल तपासणी करण्याचा निर्णय घेतला. छातीच्या सामान्य एक्स-रे (X-Ray) मध्ये एक पूर्णपणे अनपेक्षित आणि धक्कादायक बाब समोर आली.स महिलेच्या फुफ्फुसांभोवती मोठ्या प्रमाणावर द्रव साचले होते. पुढील तपासण्यांनी खऱ्या निदानाची पुष्टी केली: या महिलेला फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) झाला होता, जो फुफ्फुसाच्या आवरणापर्यंत (Pleura) पसरला होता.”ही बातमी रुग्ण आणि तिच्या कुटुंबीयांसाठी अत्यंत धक्कादायक होती.

डॉ. सचिन कुमार यांनी द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना स्पष्ट करतात की,”दम्यासारख्या दिसणाऱ्या लक्षणांमागे फुफ्फुसाचा कर्करोग असू शकतो, अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. हे प्रकरण वैद्यकशास्त्रातील एक महत्त्वाचा धडा अधोरेखित करते. सतचा खोकला किंवा धाप लागणे हे नेहमीच दमा, ब्राँकायटिस किंवा सामान्य संसर्गामुळे असते असे नाही. योग्य उपचार करूनही लक्षणे कायम राहिल्यास, केवळ औषधे बदलण्याऐवजी नवीन तपासणी करणे आवश्यक असते.”

१. फुफ्फुसांभोवती पाणी साचणे (Pleural Effusion)

डॉ. कुमार यांच्या मते,”फुफ्फुसांभोवती द्रव साचणे (प्ल्युरल इफ्युजन) हे अनेकदा फुफ्फुसाच्या कर्करोगाचे पहिले लक्षण असू शकते. अशा रुग्णांमध्ये हळूहळू वाढणारी धाप लागणे, छातीत जडपणा जाणवणे किंवा सततचा कोरडा खोकला ही लक्षणे दिसतात. अनेकदा त्यांना सामान्य श्वसनविकार समजण्याची चूक केली जाते.

“फुफ्फुसाचा कर्करोग हा आता केवळ धूम्रपान करणाऱ्या वृद्ध पुरुषांपुरिता मर्यादीत असलेला आजार राहिलेला नाही. आमच्या रुग्णालयात दर तीन महिन्यांनी फुफ्फुसाच्या कर्करोगाची २ ते ३ नवीन प्रकरणे नोंदवली जातात. त्यापैकी सुमारे ४०% रुग्ण हे महिला असतात किंवा त्यांनी कधीही धूम्रपान केलेले नसते. “डॉ. कुमार यांनी अधोरेखीत केले.

२. फुफ्फुसाच्या कर्करोगात नेहमीच ठराविक लक्षणे दिसून येत नाहीत. (Lung cancer doesn’t always present with typical symptoms)

जेव्हा बहुतांश लोक फुफ्फुसाच्या कर्करोगाचा विचार करतात, तेव्हा ते त्याला सततचा खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांच्याशी जोडतात. ही सर्वात सामान्य धोक्याची चिन्हे असली, तरी प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत कर्करोग पुस्तकी वर्णनाप्रमाणेच दिसून येतो असे नाही.

श्वास घेण्यास त्रास होण्याची (धाप लागण्याची) अनेक कारणे असू शकतात:

  • ट्यूमरमुळे श्वासमार्गात अडथळा निर्माण होणे.
  • फुफ्फुसांभोवती पाणी साचणे.
  • फुफ्फुसाचा एखादा भाग निकामी होणे किंवा फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होणे.

काही रुग्णांमध्ये सततचा खोकला सुरू होण्यापूर्वीच धाप लागण्यास सुरुवात होते. बऱ्याच प्रकरणांत सुरुवातीची लक्षणे शरीराच्या इतर भागांत दिसतात; परंतु लोक त्याकडे तणाव, वाढते वय, पोषणाचा अभाव किंवा सामान्य आरोग्य समस्या समजून दुर्लक्ष करतात. जेव्हा ट्यूमर आजूबाजूच्या मज्जातंतू (नसा), रक्तवाहिन्या किंवा इतर अवयवांवर दाब टाकतो, तेव्हा असे घडते.

या आव्हानात भर घालणारी गोष्ट म्हणजे, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. परिणामी, आजार बळावेपर्यंत अनेक रुग्ण या सूक्ष्म धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष करतात.

३. असामान्य लक्षणे – ज्याकडे दुर्लक्ष करू नये (Unusual Symptoms)

आवाजात सतत बदल होणे (Hoarseness of Voice): आवाजात दीर्घकाळ टिकणारा बदल लगेचच फुफ्फुसाच्या समस्येचे सूचक असेलच असे नाही. तथापि, छातीतील ट्यूमरमुळे स्वरतंतूंना (Vocal Cords) नियंत्रित करणाऱ्या मज्जातंतूवर (Recurrent Laryngeal Nerve) दाब पडू शकतो. ॲलर्जी किंवा घशाचा संसर्ग ही सामान्य कारणे असली, तरी काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ आवाज घोगरा राहिल्यास तपासणी आवश्यक आहे.

गिळण्यास अडचण (Dysphagia): अन्न गिळताना वेदना होणे किंवा त्रास होणे हे अन्ननलिकेवर ट्यूमरचा दाब असल्याचे लक्षण असू शकते. रुग्णांना सुरुवातीला द्रव पदार्थांपेक्षा घन पदार्थ गिळताना जास्त त्रास जाणवतो.

चेहऱ्यावर किंवा मानेवर सूज (Superior Vena Cava Syndrome):

चेहऱ्यावर, मानेवर किंवा छातीच्या वरच्या भागात विनाकारण सूज येत असेल, तर ते सुपीरियर व्हेना कावा (SVC) सिंड्रोमचे लक्षण असू शकते. ट्यूमर शरीराच्या वरच्या भागातून हृदयाकडे रक्त नेणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीवर दाब टाकतो तेव्हा ही स्थिती निर्माण होते. अशा वेळी त्वरित वैद्यकीय उपचारांची गरज असते.

मानेवर किंवा गळ्याच्या हाडाजवळ गाठ (Swollen Lymph Nodes):

कॉलरबोनच्या (Collarbone) वर किंवा मानेवर आलेली वेदनारहित गाठ ही कर्करोग जवळच्या लसिका ग्रंथींमध्ये (Lymph Nodes) पसरल्याचे लक्षण असू शकते.

पाठ, खांदे किंवा हाडांमध्ये सतत वेदना (Bone and Spine Pain):

कर्करोग मणक्यामध्ये किंवा हाडांमध्ये पसरल्यास मान, पाठ आणि हाडांमध्ये खोलवर वेदना, बधिरता, ताठरपणा किंवा अशक्तपणा येऊ शकतो. अवयवांमध्ये अचानक अशक्तपणा जाणवल्यास ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती असू शकते. कर्करोग हाडांमध्ये पसरल्यास रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढते (Hypercalcemia), ज्यामुळे जास्त तहान लागणे, मळमळ, उलट्या, बद्धकोष्ठता, अशक्तपणा आणि डोकेदुखी असे त्रास होतात.

मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे (Neurological Symptoms):

कर्करोग मेंदूपर्यंत किंवा मज्जारज्जूभोवतीच्या आवरणापर्यंत पसरल्यावर सतत डोकेदुखी, चक्कर येणे, झटके येणे, अंधुक दिसणे, तोल जाणे किंवा शरीराच्या एका भागात अशक्तपणा येणे ही गंभीर लक्षणे दिसतात.

  • बोटांच्या आकारात बदल (Digital Clubbing):
  • यामध्ये बोटांची टोके जाड होतात आणि नखे अधिक गोलाकार व वाकलेली दिसतात.
  • वारंवार छातीचा संसर्ग (Recurrent Chest Infections):
  • उपचारांनंतरही वारंवार ब्राँकायटिस किंवा न्यूमोनिया होत असल्यास (विशेषतः फुफ्फुसाच्या एकाच भागात), ट्यूमरमुळे श्वासनलिकेत अडथळा असू शकतो.

हार्मोन्स आणि मज्जासंस्थेशी संबंधित बदल (Paraneoplastic Syndromes):

काही प्रकरणांत कर्करोगाच्या पेशींमुळे असे घटक तयार होतात जे प्रतिकारशक्तीला असामान्यपणे सक्रिय करतात. यामुळे स्नायूंची कमजोरी, सोडियमची कमी पातळी आणि इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन दिसून येते.

४. कोणाला अधिक धोका असतो? (Risk Factors)

धूम्रपान हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे मुख्य कारण असले, तरी धूम्रपान न करणाऱ्यांनाही खालील कारणांमुळे धोका असू शकतो:

  • सेकंड हँड स्मोक (इतरांनी ओढलेल्या सिगारेटचा धूर).
  • बायोमास इंधनाचा धूर आणि स्वयंपाकघरातील धूर.
  • रेडॉन वायू, ॲस्बेस्टॉस, डिझेलचा धूर आणि विषारी वायू प्रदूषण.
  • बाष्पशील सेंद्रिय संयुगे (VOCs) व इतर औद्योगिक रसायने.
  • अनुवांशिकता (कुटुंबामध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा इतिहास असणे).
  • भूतकाळात छातीवर रेडिएशन थेरपी झालेली असणे.

५. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? (When to See a Doctor)

जर कोणाला ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असेल, सतत धाप लागत असेल, खोकल्यातून रक्त येत असेल किंवा वारंवार छातीत संसर्ग होऊन उपचारांनंतरही आराम मिळत नसेल, तर त्यांनी विलंब न करता ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.