Gut health is the foundation of overall health : आपल्या शरीरातील आरोग्याचा मोठा भाग पचनसंस्थेवर अवलंबून असतो. आधुनिक वैद्यकीय संशोधनानुसार आतड्यांमध्ये असलेले ‘चांगले बॅक्टेरिया’ किंवा आतड्यातील सुक्ष्मजीव पचनक्रिया सुधारण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यावरही परिणाम करतात. अनेकजण आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी फक्त दही किंवा केळ्यावर अवलंबून राहतात; मात्र तज्ज्ञांच्या मते इतकेच पुरेसे नसते.
गॅस्ट्रोएंटेरोलॉजी तज्ज्ञांच्या मते, आहारात फायबर, प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स असलेले पदार्थ नियमित घेतल्यास आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखले जाते. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी होऊ शकतात.
आता केळ आणि दही व्यतिरिक्त कोणते पदार्थ आतड्याचे आरोग्यसाठी उपयुक्त आहेत, हे जाणून घेऊया.
किमची : आंबलेल्या पदार्थाचा आरोग्यदायी फायदा (Kimchi – A fermented superfood for gut)
किमची हा पारंपरिक कोरियन फर्मेंटेड पदार्थ असून तो प्रामुख्याने कोबीपासून तयार केला जातो. आंबवण्याची प्रक्रियेदरम्यान त्यामध्ये पोस्टबायोटिक्स तयार होतात, जे शरीरासाठी फायदेशीर मानले जातात.
किमचीचे नियमित सेवन केल्याने आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढण्यास मदत होऊ शकते. काही संशोधनांनुसार या पदार्थामध्ये असलेले सूक्ष्मजीव पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास सहाय्य करतात.
आले : पचन सुधारण्यासाठी नैसर्गिक उपाय (Ginger – Natural digestive support)
आले हा भारतीय स्वयंपाकातील महत्त्वाचा घटक असून त्यात दाह कमी करणारे (anti-inflammatory) आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. काही अभ्यासांनुसार आले पोटातील अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया वेगवान करण्यास मदत करते.
यामुळे अन्न पोटात जास्त वेळ न राहता पचन सुधारते आणि गॅस, अपचन किंवा पोटफुगीसारख्या समस्या कमी होऊ शकतात. आले चहा, भाजी किंवा काढ्यामध्ये सहज समाविष्ट करता येते.
केळ : प्रीबायोटिक्सचा उत्तम स्रोत (Banana – Rich in prebiotics and fiber)
केळ हे सहज उपलब्ध आणि पचनासाठी उपयुक्त फळ आहे. त्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स मुबलक प्रमाणात असतात, जे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात.
दररोज एक केळ खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होऊ शकते आणि दीर्घकाळ पोट भरल्याची भावना टिकून राहते
दही : प्रोबायोटिक्सचा नैसर्गिक साठा (Yogurt – Natural probiotic powerhouse)
दही हा नैसर्गिक प्रोबायोटिक पदार्थ असून त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडोबॅक्टेरियमसारखे उपयुक्त जीवाणू असतात. हे जीवाणू आतड्यांतील सूज कमी करण्यास आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात.
दही नियमित खाल्ल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळू शकते. उन्हाळ्यात दही शरीराला थंडावा देण्यासही उपयुक्त ठरते.
नाशपाती : फायबरयुक्त फळाचा पचनावर सकारात्मक परिणाम (Pear – Fiber-rich fruit for digestion)
नाशपातीमध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर आढळते, जे पचनसंस्था नियमित ठेवण्यास मदत करते. हे फायबर आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देऊ शकते.
नियमितपणे नाशपाती खाल्ल्यास पोट साफ राहण्यास मदत होते आणि आतड्याचे आरोग्य सुधारण्यास हातभार लागतो.
संतुलित आहारत आतड्याचे आरोग्यासाठी महत्त्वाचा (Balanced diet is key for healthy microbiome)
तज्ज्ञांच्या मते, आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी केवळ एखाद्या एकाच पदार्थावर अवलंबून न राहता विविध प्रकारचे फायबरयुक्त आणि फर्मेंटेड पदार्थ आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, बिया आणि संपूर्ण धान्य यांचा समतोल आहार घेतल्यास आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखले जाऊ शकते. त्यामुळे पचन सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एकूण आरोग्य अधिक चांगले राहू शकते.
