मधुमेह ही आजच्या काळातील एक सामान्य आरोग्य समस्या बनली आहे. जगभरात मोठ्या संख्येने लोक या आजाराने प्रभावित आहेत. मधुमेह हा केवळ वृद्ध व्यक्तींनाच होणारा आजार राहिलेला नाही, तर बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि इतर कारणांमुळे तरुणांमध्येही त्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काही प्रकरणांमध्ये लहान वयातील मुलांमध्येही मधुमेह आढळून येतो.
मात्र, अनेकांना सुरुवातीच्या काळात मधुमेहाची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नाहीत. त्यामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी वाढत असतानाही अनेकांना त्याची कल्पना नसते. वारंवार लघवी होणे आणि नेहमीपेक्षा जास्त तहान लागणे ही मधुमेहाची काही सामान्य लक्षणे आहेत. मात्र, त्याशिवायही शरीरात काही बदल दिसून येऊ शकतात.
त्यामुळे ही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक त्या तपासण्या करून घेणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया, टाईप-२ मधुमेह म्हणजे नेमका काय आणि त्याची कोणती लक्षणे दिसू शकतात.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह शरीरावर कसा परिणाम करतो, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास नसतो, अशा व्यक्तींनाही या आजाराबाबत योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
मधुमेह हा एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोज म्हणजेच रक्तातील साखरेची पातळी सामान्यतेपेक्षा जास्त वाढते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी ग्लुकोजची आवश्यकता असते. रक्तातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचवण्यासाठी इन्सुलिन या हार्मोनची महत्त्वाची भूमिका असते.
जेव्हा शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करीत नाही किंवा शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते. कालांतराने रक्तातील साखर नियंत्रित न राहिल्यास त्याचा शरीरातील विविध अवयवांवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः हृदय, डोळे, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते.
केवळ वारंवार लघवी आणि तहान लागणे हीच लक्षणे नाहीत; जाणून घ्या ‘ही’ लक्षणेही…
मधुमेहाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे आणि नेहमीपेक्षा जास्त तहान लागणे यांचा समावेश होतो. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर शरीर अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते आणि त्यानंतर शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने अधिक तहान लागू शकते.
मात्र, याशिवायही मधुमेहाची काही लक्षणे दिसू शकतात. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार,लक्ष देणे आवश्यक असणारी लक्षणे खालीलप्रमाणे :
१. वारंवार भूक लागणे
पुरेसे अन्न खाल्ल्यानंतरही वारंवार भूक लागत असेल, तर त्यामागे रक्तातील साखरेशी संबंधित समस्या असू शकते. शरीरातील पेशींना ग्लुकोजचा योग्य वापर करता न आल्यास, सतत भूक लागल्यासारखी जाणीव होऊ शकते.
२. प्रयत्न न करता वजन कमी होणे
आहार किंवा व्यायामामध्ये कोणताही विशेष बदल केलेला नसताना अचानक किंवा सतत वजन कमी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. मधुमेहामध्ये शरीर ग्लुकोजचा योग्य वापर करू न शकल्यास ऊर्जा मिळवण्यासाठी शरीरातील चरबी आणि स्नायूंचा वापर होऊ शकतो.
३. सतत थकवा आणि चिडचिड जाणवणे
दिवसभर पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सतत थकवा जाणवत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त चिडचिड होत असेल, तर त्यामागे रक्तातील साखरेतील बदलांसह इतरही कारणे असू शकतात.
४. दृष्टी अंधुक होणे
रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यास काही व्यक्तींना दृष्टी अंधुक होण्याचा किंवा अस्पष्ट दिसण्याचा त्रास होऊ शकतो. असा त्रास तुम्हाला वारंवार होत असल्यास डोळ्यांची तपासणी करण्यासोबतच डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे.
५. वारंवार संसर्ग होणे
काही व्यक्तींना वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग (UTI) किंवा यीस्ट इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. परंतु, अशा संसर्गाचा त्रास वारंवार होत असेल, तर त्यामागील कारण शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
शिवाय शरीरात दिसू शकतात ‘हे’ बदल
मधुमेहाची काही लक्षणे सुरुवातीला अगदी सामान्य वाटू शकतात. मात्र, काही बदल असे असतात, ज्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
जखमा उशिरा बऱ्या होणे
शरीरावर झालेली एखादी जखम किंवा छोटी इजा बरी होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असेल आणि ती सहजगत्या बरी होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त राहिल्यास जखम भरून येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.
त्वचेवर काळे डाग किंवा काळसरपणा
मानेभोवती, काखेत किंवा मांड्यांच्या भागात त्वचा काळसर आणि जाडसर दिसू लागणे हे काही व्यक्तींमध्ये इन्सुलिन प्रतिरोधाशी संबंधित लक्षण असू शकते. त्वचेमध्ये अशा स्वरूपाचा कोणताही बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते.
हात-पायांना मुंग्या किंवा बधिरपणा
हात किंवा पायांमध्ये वारंवार मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे किंवा संवेदना कमी झाल्यास, त्यामागे अनेक कारणे असू शकतात. दीर्घकाळ रक्तातील साखर वाढलेली राहिल्यास मज्जातंतूंवरही परिणाम होऊ शकतो.
मधुमेहापासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे?
मधुमेह होण्याचा धोका कमी करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः टाईप-२ मधुमेहाच्या बाबतीत आहार, शारीरिक हालचाल आणि वजनाचे योग्य व्यवस्थापन यांची भूमिका महत्त्वाची असते.
टाईप-२ मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहारात पौष्टिक आणि संतुलित पदार्थांचा समावेश करावा. फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी आणि इतर पौष्टिक पदार्थ योग्य प्रमाणात घेणे फायदेशीर ठरू शकते. अति प्रमाणात साखर, प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि चरबीयुक्त पदार्थांचे सेवन टाळणे किंवा कमी करणे आवश्यक आहे.
सोबतच नियमित शारीरिक हालचाल करणेही महत्त्वाचे आहे. दररोज चालणे, व्यायाम करणे किंवा आपल्या क्षमतेनुसार कोणतीही शारीरिक ॲक्टिव्हिटी करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
धूम्रपान आणि मद्यपान टाळणेही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तसेच, ज्यांना मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास आहे किंवा ज्यांना मधुमेहाचा धोका अधिक आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करून घेणे योग्य ठरते.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे वारंवार लघवी होणे, खूप तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, सतत थकवा जाणवणे किंवा दृष्टी अंधुक होणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, तर स्वतःहून निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे केवळ मधुमेहामुळेच होतात, असे नाही; इतर आरोग्य समस्यांमुळेही ती दिसू शकतात. योग्य तपासणी केल्यानंतरच त्या आजाराचे कारण स्पष्ट होऊ शकते.
