Nutrition Deficiency Responsible For Thinning Hair: अशा अनेक महिला आहेत, ज्या केस पातळ होणे आणि गळण्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. पण त्यांना हे माहितच नसते की यामागील मुख्य आणि मोठे कारण म्हणजे शरीरातील पोषक घटकांची कमतरता आहे. जर दैनंदिन आहारात योग्य प्रमाणात खनिजे (मिनरल्स) आणि जीवनसत्त्वे (विटामिन्स) समाविष्ट केली, तर केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतात आणि त्यांच्या गुणवत्तेत तसेच घनतेत सुधारणा करता येते.
महिलांमध्ये केस विरळ होणे किंवा केस गळतीची समस्या ही अचानक उद्भवणारी नसून ती हळूहळू होत जाणारी प्रक्रिया आहे. भांग (Parting) रुंद होणे, पोनीटेल पातळ वाटणे आणि केस गळती वाढत जाणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे आहेत. जरी हार्मोन्स आणि अनुवंशिकता (Genetics) यात महत्त्वाची भूमिका बजावत असले, तरी ‘पोषक तत्वांची कमतरता’ हे यामागचे सर्वात सामान्य आणि उपचार करण्यायोग्य कारण असल्याचे समोर आले आहे.
मासिक पाळीतील रक्तस्राव, आहारातील चुकीच्या सवयी, गर्भधारणा, ताणतणाव आणि बदलती जीवनशैली यामुळे महिलांमध्ये काही विशिष्ट पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. ही कमतरता वेळीच ओळखल्यास केसांची गळती थांबवून ते पुन्हा जोमाने वाढवता येतात.
केस गळतीला कारणीभूत ठरणारे ५ प्रमुख घटक
१. लोह (आयर्न आणि कमी फेरिटिन)
महिलांमध्ये केस विरळ होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे लोहाची कमतरता. अनेकदा हिमोग्लोबिन सामान्य दिसते, पण शरीरातील लोहाची साठवणूक (Ferritin) कमी असू शकते. लोहाच्या कमतरतेमुळे केसांच्या मुळांपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो आणि केस वाढण्याची गती मंदावते.
२. व्हिटॅमिन डी
केसांच्या वाढीचे चक्र (Growth Cycle) नियंत्रित करण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक आहे. घरातील कामांमुळे सूर्यप्रकाशाशी कमी संपर्क येणाऱ्या महिलांमध्ये याची कमतरता जास्त आढळते. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे केसांची घनता (Density) कमी होते.
३. व्हिटॅमिन बी १२
शाकाहारी किंवा व्हीगन आहार घेणाऱ्या महिलांमध्ये बी १२ची कमतरता प्रकर्षाने जाणवते. हे लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. थकवा जाणवणे, केस कमकुवत होऊन तुटणे आणि त्वचा निस्तेज होणे.
४. झिंक (Zinc) आणि प्रोटीन
केस हे ‘केराटिन’ नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे केस पातळ होतात, तर झिंकच्या कमतरतेमुळे टाळूची (Scalp) त्वचा खराब होऊन केस गळती वाढते.
५. फॅटी ॲसिड्स
आहारातील निरोगी चरबी (Healthy Fats) टाळू हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. नट्स आणि बियांचा समावेश आहारात नसल्यास केस कोरडे आणि कमकुवत होतात.
वेळेवर निदान का आवश्यक?
केस गळतीची लक्षणे अनेकदा सामान्य थकवा किंवा तणावाशी जोडली जातात, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. केवळ ब्लड टेस्ट (रक्त चाचणी) द्वारेच या कमतरतेचे अचूक निदान होऊ शकते. यामध्ये प्रामुख्याने खालील चाचण्या सुचवल्या जातात.
- सीरम फेरिटिन
- व्हिटॅमिन डी आणि बी १२
- थायरॉईड प्रोफाईल
तज्ज्ञांचा सल्ला
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही चाचणीशिवाय सप्लिमेंट्स घेणे शरीरासाठी घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या. पोषक तत्वांची पातळी, तणाव आणि हार्मोन्सचा सखोल अभ्यास करून केसांवर अचूक उपचार तज्ज्ञ सुचवू शकतात.
केस हे तुमच्या शरीराच्या अंतर्गत पोषणाचा आरसा आहेत. शरीराला योग्य पोषण मिळाल्यास केसांची मुळे आपोआप मजबूत होतात. त्यामुळे केस गळतीकडे दुर्लक्ष न करता, मुळाशी जाऊन त्यावर उपचार करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
