5 Ways to Prevent Gray Hair : हल्ली अनेकजण केस अकाली पांढरे होण्याच्या समस्येशी सामना करताना दिसतात. हे शरीरातील पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे घडते. लोह, व्हिटॅमिन बी १२, फॉलिक अॅसिड, तांबे, जस्त आणि प्रथिने यांच्या कमतरतेमुळे मेलेनिन उत्पादनावर थेट परिणाम होतो. यामागे अनियमित आहार आणि जंक फूड हे एक प्रमुख कारण आहे, विशेषतः तरुणांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते, म्हणून केस पांढरे होण्यावर केवळ बाहेरून उपाय करून चालणार नाही तर अंतर्गतरित्यादेखील पोषण करणे महत्त्वाचे आहे. यासाठी ताण-तणावावर नियंत्रण आणि निरोगी जीवनशैली अवलंबणे महत्त्वाचे आहे. यावर तुम्ही काही घरगुती उपाय देखील करु शकता.

१) आवळा

आवळा केसांमधील नैसर्गिक रंगद्रव्य टिकवून ठेवण्यास मदत करतो. यासाठी १-२ चमचे ताजा आवळा रस किंवा अर्धा चमचा आवळा पावडर कोमट पाण्यात मिसळून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास केसांचे अकाली कमकुवत होणे आणि पांढरे होणे टाळण्यास मदत होते.

२) काळे तीळ

काळे तीळ केसांच्या मुळांना पोषण देऊन मेलेनिन तयार होण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा काळे तीळ हळूहळू चावा किंवा जेवणात मिसळा. सकाळी किंवा दुपारी हा उपाय करुन शकता. यामुळे केसांची वाढ आणि रंग दोन्ही मजबूत होतो.

३) कढीपत्ता

कढीपत्ता केसांची मुळे मजबूत करते आणि केस अकाली पांढरे होणे कमी करते. यासाठी ८ ते १० ताज्या कढीपत्त्यांची पाने घ्या, ती कच्ची चावा किंवा जेवणात वापरा. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स केसांचे आयुष्य वाढवतात.

४) बाजरी

बाजरीमध्ये लोह आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे केसांच्या रंगद्रव्यासाठी आवश्यक असतात. १ वाटी बाजरी आठवड्यातून ३-४ वेळा घ्या यामुळे केस आतून मजबूत होतात.

५) जवसाच्या बिया

जवसामुळे ताण आणि जळजळ कमी होते, यामुळे केसांचा पांढरेपणा कमी होण्यास मदत होते. १ चमचा ताजे कुस्करलेले जवस हे दही किंवा कोमट पाण्यात मिसळा. याचे रोज सेवन केल्यास केसांच्या आरोग्यासाठी आणि हार्मोनल संतुलनासाठी फायदेशीर आहे.

६) तांब्याच्या भांड्यातील पाणी

मेलेनिन उत्पादनासाठी तांबे हे एक आवश्यक खनिज आहे. तांब्याच्या भांड्यात रात्रभर साठवलेले पाणी रोज सकाळी १ ग्लास प्या. हे केसांचा नैसर्गिक रंग राखण्यास मदत करते.

सातत्य सर्वात महत्त्वाचे आहे

केस पांढरे होणे ही जादू नाही तर एक संथ जैविक प्रक्रिया आहे. दररोज तुम्ही वरील पैकी एक उपाय जरी करून पाहिल्यास ३-६ महिन्यांत फरक दिसू शकतो. याशिवाय संयम, योग्य आहार आणि जीवनशैलीतील बदल हे खरे उपाय आहेत.

तसेच केस रंगवण्यापूर्वी शरीराचे पोषण करण्यावर भर द्या. जेव्हा अंतर्गत कमतरता पूर्ण होतील तेव्हाच बाह्य परिणाम दिसून येतील. हे सहा अंतर्गत उपाय नैसर्गिकरित्या केसांचे आयुष्य वाढवण्यास मदत करू शकतात.