Oats vs Poha Which Breakfast Is Better for Weight Loss: सकाळचा नाश्ता हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा आहार मानला जातो. मात्र, वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेकांच्या मनात एकच प्रश्न कायम असतो. नाश्त्यासाठी ओट्स खावेत की पोहे? फिटनेसप्रेमी ओट्सला पसंती देतात; तर अनेकांच्या मते, गरमागरम पोह्यांसारखा हलका आणि चविष्ट नाश्ता दुसरा नाही. पण, वजन कमी करायचं असेल, आणि दिवसभर शरीरात उत्साह टिकवून ठेवायचा असेल, तर या दोन्हींपैकी नेमका कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरतो? याचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी दोन्ही पदार्थांचे गुणधर्म समजून घेणं महत्त्वाचं आहे.

सकाळचा नाश्ता इतका महत्त्वाचा का?

आहारतज्ज्ञांच्या मते, चांगला नाश्ता म्हणजे फक्त पोट भरणारा आहार नव्हे. तो असा असावा की, ज्यामुळे बराच वेळ भूक लागू नये, पचनक्रिया सुरळीत राहावी आणि शरीराला सातत्यानं ऊर्जा मिळावी. नाश्त्यात योग्य प्रमाणात तंतुमय घटक, प्रथिनं व आरोग्यदायी चरबी हे घटक असतील, तर दिवसभर खाण्याची अनावश्यक इच्छा कमी होते.

ओट्स फिटनेससाठी इतके लोकप्रिय का?

वजन कमी करण्याच्या आहारात ओट्सचा समावेश मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये असणारं बीटा-ग्लुकान हे विद्राव्य तंतू. हे तंतू पचनक्रिया मंदावतात आणि बराच वेळ पोट भरल्याची भावना निर्माण करतात. त्यामुळे वारंवार भूक लागत नाही आणि मधल्या वेळेत खाण्याचं प्रमाणही कमी होतं.

त्याशिवाय ओट्स हळूहळू पचत असल्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळत राहते. रक्तातील साखरेची पातळीही अचानक वाढत नाही. त्यामुळे मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठीही साधे, साखर नसलेले ओट्स तुलनेनं चांगला पर्याय मानले जातात.

मात्र, बाजारात मिळणारे फ्लेवर्ड किंवा इन्स्टंट ओट्स अनेकदा साखर आणि कृत्रिम स्वादांनी भरलेले असतात. त्यामुळे शक्यतो साधे रोल्ड किंवा स्टील-कट ओट्स निवडण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.

पोह्यांना कमी लेखणं ठरू शकते चूक

अनेकांना पोहे हे फक्त हलकं आणि साधं अन्न वाटतं; पण प्रत्यक्षात योग्य पद्धतीनं तयार केलेले पोहेही पौष्टिक नाश्ता ठरू शकतात. पोहे सहज पचतात, पटकन तयार होतात आणि सकाळच्या घाईतही उत्तम पर्याय ठरतात.

जर पोह्यांमध्ये शेंगदाणे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, मटार, गाजर किंवा इतर भाज्यांचा समावेश केला, तर त्यांची पौष्टिकता आणखी वाढते. शेंगदाण्यांमधून प्रथिनं व आरोग्यदायी चरबी मिळते आणि तर लिंबाचा रस घातल्यास शरीराला लोह शोषून घेण्यास मदत होते. त्यामुळे साधे पोहे अधिक संतुलित आणि पोषक बनतात.

वजन कमी करण्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं?

अनेकांना वाटतं की, वजन कमी करण्यासाठी फक्त एखादा पदार्थ पुरेसा असतो; मात्र तज्ज्ञांचं मत वेगळं आहे. कोणताही एक पदार्थ जादूची कांडी ठरत नाही. संपूर्ण दिवसाचा आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

नाश्ता असा असावा की, त्यात पुरेशी प्रथिनं, तंतुमय घटक आणि आवश्यक पोषक द्रव्यांचा समावेश असेल. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि जास्त खाण्याची सवयही नियंत्रणात राहते.

मग शेवटी ओट्स की पोहे?

आता सर्वांत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर…

जर तुमचं मुख्य उद्दिष्ट वजन कमी करणं, बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटणं आणि दिवसभर सातत्यानं ऊर्जा मिळणं असेल, तर साधे, साखर नसलेले ओट्स तुलनेनं अधिक फायदेशीर ठरू शकतात. त्यातील बीटा-ग्लुकान तंतू भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

मात्र, घरच्या घरी भाज्या, शेंगदाणे आणि लिंबाचा रस घालून तयार केलेले पोहेदेखील आरोग्यदायी आणि संतुलित नाश्ता ठरू शकतात. विशेषतः हलका, पटकन पचणारा आणि चविष्ट पर्याय हवा असेल, तर पोहे ही उत्तम निवड आहे.

म्हणजेच ओट्स आणि पोहे यांच्यातील खरी निवड तुमच्या उद्दिष्टांवर अवलंबून आहे. वजन कमी करण्याला प्राधान्य असेल, तर ओट्स किंचित सरस ठरतात; पण संतुलित पद्धतीनं बनवलेले पोहेही आरोग्यासाठी तितकेच उपयुक्त आहेत. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे नाश्ता कोणताही असो, तो संतुलित, पौष्टिक आणि प्रमाणात असणं गरजेचं आहे.