Odisha Girl Death by Lice:चालताना-फिरताना, ऑफिसमध्ये किंवा इतर कुठेही तुम्हाला असे अनेक लोक भेटतात, जे वारंवार डोकं खाजवत असतात. त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात; पण सर्वांत मोठं कारण म्हणजे डोक्यातील उवांमुळे होणारा संसर्ग.

बहुतेक लोकांना वाटतं, “अरे, काही नाही; केस धुतले की, सगळं ठीक होईल,” आणि ते ही समस्या पूर्णपणे दुर्लक्ष करतात; पण तुम्हाला माहीत आहे का, अशा प्रकारे दुर्लक्ष करणं पुढे जाऊन खूप धोकादायक ठरू शकतं? ही समस्या इतकी गंभीर होऊ शकते की जीवावरही बेतू शकते.

ओडिशातील पुरी जिल्ह्यातून एक चिंताजनक घटना समोर आली आहे. दीर्घकाळ डोक्यात उवांच्या गंभीर संसर्गानं त्रस्त असलेल्या १२ वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बालंगा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंपागडा साही परिसरातील आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्य आणि वेळेवर उपचार मिळण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. चला, नेमकी ही संपूर्ण घटना काय आहे ते जाणून घेऊया.

काय प्रकरण आहे?

एबीपी लाईव्हच्या वृत्तानुसार मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचं नाव लक्ष्मीप्रिया साहू असं होतं. ती स्थानिक शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत होती. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ती अनेक महिन्यांपासून डोक्यात उवांच्या तीव्र संसर्गानं त्रस्त होती.

सुरुवातीला ही समस्या साधी आहे, असं समजून दुर्लक्ष करण्यात आलं; पण हळूहळू हा संसर्ग अधिक गंभीर होत गेला. संसर्ग टाळण्यासाठी मुलीच्या आईनं तिचं डोकं मुंडण करण्याचा सल्ला दिला होता; मात्र मुलगी त्यासाठी तयार नव्हती.

याचदरम्यान उवांचा संसर्ग संपूर्ण डोक्यात पसरला. संसर्गामुळे येणारी दुर्गंधी आणि सतत वाढणाऱ्या त्रासामुळे मुलीच्या मनावरही परिणाम होऊ लागला. तिनं घराबाहेर जाणं जवळपास बंद केलं. केस कायम बांधून ठेवत असल्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांना या संसर्गाची तीव्रता किती आहे, याचा अंदाजच आला नाही.

रक्ताची उलटी झाल्याने प्रकृती बिघडली

तीन दिवसांपूर्वी मुलीला अचानक रक्ताची उलटी होऊ लागली आणि परिस्थिती अधिकच गंभीर झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला तत्काळ पुरी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी खूप प्रयत्न करूनही शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

तज्ज्ञ काय म्हणतात?

बहुतेक तज्ज्ञ व हेल्थ रिसर्चनुसार, डोक्यातील उवांचा संसर्ग साधारणपणे जीवघेणा नसतो. मात्र sciencedirect या वैज्ञानिक आरोग्यविषयक वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, डोक्यातील उवा हे बाहेरून शरीरावर राहणारे परजीवी असतात, जे माणसाच्या रक्तावर जगतात.

ही समस्या लहान मुलं, त्यांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती आणि एकाच घरात राहणारे लोक यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. सामान्यतः उवांना मोठा आरोग्य धोका मानलं जात नाही आणि त्या थेट एखादा आजार पसरवतात, असंही नाही. त्यामुळे अनेकदा लोक ही समस्या छोटी समजून दुर्लक्ष करतात; पण उवांचा संसर्ग खूप काळ राहिला किंवा खूप जास्त प्रमाणात झाला, तर त्याचे गंभीर परिणामही दिसू शकतात.

१२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूमुळे चिंता वाढली

स्टडीमध्ये सांगण्यात आलं आहे की, २६ ऑगस्ट २०२० रोजी अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील एका ग्रामीण भागात राहणाऱ्या १२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूनं वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला. अहवालानुसार, मुलीच्या मृत्यूचं मुख्य कारण हृदयविकाराचा झटका (कार्डिॲक अरेस्ट) असल्याचं सांगण्यात आलं.

तपासात असंही समोर आलं की, तिला आयर्नच्या तीव्र कमतरतेमुळे झालेला ॲनिमिया होता. ही अवस्था डोक्यात दीर्घकाळ राहिलेल्या उवांच्या तीव्र संसर्गामुळे निर्माण झाली होती. मेडिकल रिपोर्टनुसार, मुलीच्या डोक्यात उवांची संख्या खूप जास्त होती. सतत रक्त शोषल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता वाढत गेली आणि शेवटी ती जीवघेणी ठरली. या प्रकरणात मुलीच्या आई-वडिलांवर निष्काळजीपणा आणि बाल अत्याचाराचे आरोपही करण्यात आले.

उवा आणि रक्ताची कमतरता यांचा थेट संबंध

स्टडीजच्या माहितीनुसार, उवा या रक्त शोषणाऱ्या परजीवी कीटक असतात. एका संशोधनात असं आढळलं की, एक प्रौढ मादी ऊ एका वेळी सुमारे ०.०००१५ मिलिलिटर रक्त शोषते. जर एखाद्या मुलाच्या डोक्यात हजारो उवा असतील आणि दिवसभरात त्या अनेक वेळा रक्त शोषत असतील, तर दररोज आणि महिनाभरात शरीरातील रक्ताची मात्रा धोकादायक पातळीपर्यंत कमी होऊ शकते. विशेषतः आधीपासून अशक्त किंवा कुपोषित मुलांमध्ये ही समस्या अधिक गंभीर ठरू शकते. म्हणूनच ही समस्या कधीही हलक्यात घेऊ नये.