Side Effects Of Siting Just After Eating: आजकाल अनेक जण ९-१० तास लॅपटॉपसमोर बसून व्यतीत करतात. ते दिवसाच्या १४-१५ तासांपैकी १० तास एकाच स्थितीत आणि एकाच खुर्चीवर बसतात. ते त्याच जागी नाश्ता व जेवण आणि पुन्हा तिथेच बसून राहिलेले काम पूर्ण करतात. पण, तुम्हाला माहीत आहे का ही सवय किती धोकादायक असू शकते? जेवण झाल्यावर लगेच बसणे ही तुम्हाला एक छोटी सवय वाटू शकते; पण त्यामुळे शरीराच्या कार्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. जेवण झाल्यावर लगेच बसणे ही काही सामान्य गोष्ट नाही. पचनसंस्थेसाठी हा एक मोठा पूर्वसंकेत असतो. जेव्हा अन्न ऊर्जेत रूपांतरित होण्याऐवजी सडू लागते, तेव्हा शरीर धोक्याचे संकेत देते. चला जाणून घेऊया की, जेवण झाल्यावर लगेच बसणे शरीरासाठी किती हानिकारक आहे.

जेवणानंतर लगेच बसणे किती धोकादायक?

खरं तर जेव्हा आपण जेवतो, तेव्हा पोट आणि आतड्यांमधील रक्तप्रवाह वेगाने वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया कार्यक्षमतेने पार पडते. मात्र, जेवणानंतर लगेच बसल्यास ही प्रक्रिया मंदावते. जेव्हा तुम्ही कोणतीही शारीरिक हालचाल करत नाही, तेव्हा जठराग्नीवर मोठा ताण येतो आणि पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी दुप्पट मेहनत करावी लागते. अशा परिस्थितीत अन्न पचण्याऐवजी सडू लागते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक वाढतात.

लठ्ठपणा आणि पुढे आलेले पोट – जेवणानंतर लगेच बसल्याने उष्मांक जळण्यात अडथळा येतो आणि तुमची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे तुमच्या पोटाभोवती चरबी जमा होते.

आम्लपित्त आणि छातीत जळजळ – जेवणानंतर लगेच बसल्यास, पोटातील आम्ल अन्ननलिकेत परत येऊ शकते, ज्यामुळे ढेकर येणे आणि छातीत जळजळ वाढते.

गॅस आणि बद्धकोष्ठता – या सवयीमुळे अन्न पचायला त्रास होतो. जेवणानंतर लगेच बसल्याने आतड्यांची क्रिया मंदावते, पचनास उशीर होतो आणि गॅस व बद्धकोष्ठता वाढते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे – जेवणानंतर लगेच बसल्यावर तुमचे शरीर ग्लुकोजचा योग्य रीतीने वापर करू शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते आणि मधुमेह होऊ शकतो.

हृदयाला असलेले धोके – पचनक्रिया आणि पोटाच्या कार्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो. या सवयीमुळे हृदयालाही हानी पोहोचू शकते. अपचनामुळे कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात, ज्यामुळे हृदयावर दबाव येऊ शकतो.