Oil vs Ghee Which is Better: बरेच लोक कुकिंग ऑइल खाणे टाळतात किंवा जेवणात तेलाचा अगदी कमी वापर करतात. जेवणात तेलाचा अतिवापर करणे आरोग्यास हानिकारक मानले जाते. जास्त तेलाच्या सेवनाने वेगवेगळे आजार उदभवू शकतात. मात्र, बराच काळ खाद्यतेलाचे सेवन न केल्याने शरीरावर होणाऱ्या वाईट परिणामांबद्दल तुम्ही ऐकलेय का? होय, खाद्यतेल अचानक खाणे सोडल्याने शरीरावर त्याचे परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा वेळी कोणते तेल खावे आणि त्याचा वापर किती प्रमाणात असावा हे जाणून घेतले पाहिजे. तेलाचे सेवन करणे अचानकपणे सोडल्याचाही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

अनेक लोक डाळ, भाजी आणि पराठे यांसारखे पदार्थ बनविण्यासाठी नेहमी तुपाचा वापर करतात. घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा तुपाची शिफारस करतात. त्यांचा असा विश्वास आहे की, आहारात तुपाचा समावेश केल्याने शरीर केवळ मजबूतच होत नाही, तर ते निरोगीही राहते. असाही एक समज आहे की, ते इतर खाद्यतेलांपेक्षा अधिक सहजपणे पचते; परंतु हा सर्वसामान्य समज बरोबर नाही. तूप आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे; पण इतर खाद्यतेलांमध्ये असलेले घटकही आपल्या शरीरासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत.

तेल का आवश्यक?

अनेक तेलांमध्ये ओमेगा ३ असते, जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही. म्हणून ते अन्न स्रोतांकडून मिळवणे आवश्यक आहे. तेलामध्ये चांगले फॅट्स असतात, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रत्येक गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो, असे म्हणतात आणि हीच बाब तेलांनाही लागू होते. स्वयंपाक करताना किंवा तळलेले पदार्थ नियमितपणे खाण्यासाठी जास्त खाद्यतेल वापरल्याने वजन तर वाढतेच; पण ते तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. त्यामुळे खाद्यतेलाचा कमी, तसेच मर्यादित वापर केल्यास, ते खाद्यतेल आरोग्यासाठी चांगले आहे.

तुपासोबत ही तेले वापरणेदेखील महत्त्वाचे

खरे तर, तूप हे एक संतृप्त मेद आहे. शेंगदाणा, तीळ, मोहरी व ऑलिव्ह तेलामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते; तर सूर्यफूल आणि सोयाबीन तेलामध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. आपल्या शरीराला या तिन्ही प्रकारच्या मेदांची गरज असते.

त्यामुळे सूर्यफूल, सोयाबीन, ऑलिव्ह, मोहरी व शेंगदाणा यांसारख्या तेलांसोबतच आपल्या आहारात तुपाचा समावेश करणेही आवश्यक आहे. उदाहरणार्थ- तुम्ही भाज्या, डाळी शिजवण्यासाठी, पराठे-पुरी तळण्यासाठी शेंगदाणा, तीळ, सूर्यफूल इत्यादी तेलाचा वापर करू शकता.

तुपाचा वापर अशा प्रकारे करा

पोळ्या आणि डाळींवर तूप घालून खाऊ शकता. मोनोअनसॅच्युरेटेड (MUFA) आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडने समृद्ध असलेली तेलं आपल्या हृदयासाठी खूप चांगली मानली जातात.

त्यांचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. त्यामुळे जर तुम्हाला ही तेलं वापरण्याबद्दल अजूनही संभ्रम असेल, तर तुम्ही आता या तीन प्रकारच्या चरबींचा तुमच्या आहारात योग्य प्रमाणात समावेश करू शकता.