सौंदर्य हे कोणाला नको असते. प्रत्येकाला वाटते की आपण सुंदर दिसावे. हे सौंदर्य मिळवण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. डाएट, व्यायाम बरोबर त्वचेच्या काळजी घेण्यासाठी अनेक महागडे उत्पादन वापरण्यापासून ते घरगुती उपायापर्यंत सर्व काही करतात. सोशल मीडियावर अनेकदा असे स्किन केअर ट्रेंड्स चर्चेत येत असतात जे सौंदर्य वाढवण्याचा दावा करतात. घरगुती स्किनकेअर ट्रेंड्स शोधण्यासाठी इंटरनेट हे एक उत्तम ठिकाण आहे, पण एखाद्या हॅकमध्ये “नैसर्गिक” घटक आहेत याचा अर्थ असा नाही की तो सुरक्षित किंवा प्रभावी आहे. असाच एक स्किन केअर हॅक म्हणजे भेंडीचा फेस पॅक.
भेंडीचा फेस पॅक म्हणून वापरण्याचा अलीकडील ट्रेंड हे अशा व्हायरल दाव्याचे उत्तम उदाहरण आहे ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही आणि तज्ञांच्या मते, ते प्रत्यक्षात हानिकारक असू शकते. “या पॅकने १० वर्षांनी तरुण दिसा,” असे एका व्हिडिओमध्ये सुचवले होते, आणि पुढे असेही म्हटले होते की,”यासाठी तुम्हाला फक्त तीन चिरलेल्या भेंड्या आणि थोडे दही लागेल.”
काय आहे व्हायरल भेंडी ब्युटी हॅक?
साहित्य
३ – चिरलेली भेंडी
२ मोठे चमचे – दही
कृती
दोन्ही घटक एकत्र वाटून घ्या.
ते तुमच्या चेहऱ्यावर लावा.
ते २० मिनिटे किंवा सुकेपर्यंत तसेच ठेवा.
त्यात असेही म्हटले आहे की,”ही पेस्ट दर दोन आठवड्यांनी एकदा लावता येते.”
पोस्टमध्ये पुढे असे म्हटले आहे की,”ही पेस्ट वृद्धत्व आणि मुरुमांशी लढण्यास मदत करते आणि त्वचा उजळ करते. “हा अँटी-एजिंग फेस पॅक तुमच्या त्वचेवरील मुरुमांचे डाग, व्रण आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी आहे,” असे त्यात लिहिले होते.
भेंडी त्वचेसाठी फायदेशीर असल्याचा दावा
त्वचेच्या दुरुस्तीस मदत करते: भेंडीमधील कॅरोटीनॉइड्स हे आवश्यक पोषक तत्व आहेत जे त्वचेच्या पेशींची वाढ आणि दुरुस्ती सुनिश्चित करतात.
चमकदार त्वचा देते: भेंडी त्वचेला चमक देते. ती व्हिटॅमिन सी, ए, फोलेट आणि कॅल्शियमने समृद्ध आहे, जे खराब झालेल्या पेशी काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.
मुरुम टाळते: जर तुम्हाला मुरुमांचा त्रास होत असेल, तर फक्त भेंडीची पेस्ट लावा. “त्याचे अँटीऑक्सिडंट आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचेला नैसर्गिक थंडावा देतात,” असेही पोस्टमध्ये लिहिले होते.
तथापि, एका तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर, त्यांनी सुचवले की,”दही फायदेशीर असले तरी, भेंडी त्वचेसाठी चांगली आहे या दाव्यात काहीही तथ्य नाही.”
भेंडी त्वचेसाठी खरंच सुरक्षित आहे का?
“काही भाज्या जेवणाच्या टेबलावर आकर्षक दिसू शकतात, पण त्यांचा त्वचेवर फारसा परिणाम होईलच असे नाही,” असे मत ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’च्या सल्लागार त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटिक त्वचारोगतज्ञ आणि त्वचारोग शल्यचिकित्सक डॉ. रिंकी कपूर यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मांडले.
भेंडी अन् दही वापरणे योग्य की अयोग्य?
“त्वचा उजळ करण्याच्या उद्देशाने भेंडी आणि दह्याच्या मिश्रणाबाबतही हेच खरे आहे. ऑनलाइन दिसणारी प्रत्येक युक्ती प्रभावीपणे काम करेलच असे नाही. हे दावे अनेकदा कोणत्याही वैज्ञानिक संशोधनाशिवाय केले जातात. त्वचेसाठीच्या अनेक घरगुती उपायांमध्ये दह्याचा मुख्य घटक म्हणून सामान्यतः वापर केला जातो. याचे कारण म्हणजे दह्यामध्ये लॅक्टिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे एक्सफोलिएटर म्हणूनही काम करू शकते. तथापि, भेंडी किंवा भेंडीमध्ये मिसळल्यास ते हानिकारक ठरू शकते,” असे डॉ. कपूर म्हणाल्या.
त्वेचवर भेंडी कच्ची लावल्यास होऊ शकतात दुष्परिणाम
डॉ. कपूर यांच्या मते, “भेंडीमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे ती कच्ची लावल्यास त्वचेवर ॲलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात.” “ज्या लोकांची त्वचा तेलकट, मुरुम-प्रवण किंवा संवेदनशील आहे, त्यांनी भेंडी आणि दह्याचे मिश्रण त्वचेवर लावणे टाळावे, कारण त्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिघडू शकते. याचा अतिवापर केल्यास त्वचेवर पुरळ येऊ शकते आणि संवेदनशीलता वाढू शकते,” असे डॉ. कपूर म्हणतात.
त्वचा उजळ करण्यास मदत करणारे सक्रिय घटक, जसे की नियासिनमाइड, कोजिक ॲसिड, ॲझेलेइक ॲसिड, ग्लायकोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन सी, यांचा समावेश असलेली स्किनकेअर दिनचर्या सुरू करू शकता तेही तज्ज्ञांच्या सल्ल्याने.
“संतुलित आहार घेणे, पुरेसे पाणी पिणे, नियमितपणे सनस्क्रीन वापरणे आणि ४५ मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करणे यांसारख्या एकत्रित प्रयत्नांमुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास खूप मदत होऊ शकते. केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी, जर तुम्हाला तुमच्या त्वचेत मोठे बदल अपेक्षित असतील तर त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्या,” असा आग्रह डॉ. कपूर करतात.
टीप – वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
