Okra Water for Diabetes : भारतात मधुमेह हा आता सर्वात सामान्य आजार बनत आहे. पण, त्याचे शरीरावर होणारे परिणाम गंभीर आहेत. भारतात दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढतेय. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयात हा आजार होतोय. शरीरातील साखर वाढली की पुन्हा ती नियंत्रणात आणण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागतेय. एकूणच आहाराकडे फार लक्ष द्यावे लागते, यात अनेकजण नैसर्गिक उपाय करताना दिसतात. सध्या असाच एक नैसर्गिक उपाय चर्चेत आला, तो म्हणजे ‘ओकरा वॉटर’ (Okra Water) – रात्रभर भेंडी पाण्यात भिजवून तयार केलेले हे एक साधे पेय आहे. पण, हे खरोखर मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते की हा केवळ एक ट्रेंड आहे? चला जाणून घेऊया….
भेंडीचे पाणी (Okra Water) म्हणजे काय?
ताजी भेंडी कापून ती काही तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून तुम्ही हे पाणी सहज तयार करू शकता. हे पाणी भेंडीमधील विरघळणारे फायबर (Soluble Fibre) आणि पोषक घटक शोषून घेते, ज्यामुळे हे पाणी थोडे चिकट पण अत्यंत पौष्टिक बनते. भेंडीमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन C, व्हिटॅमिन K आणि पॉलिफेनॉल भरपूर प्रमाणात असतात, जे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
भेंडीचे पाणी रक्तातील साखर कशी कमी करते?
ज्यांची रक्तातील साखर जास्त आहे, त्यांच्यासाठी भेंडीचे पाणी कसे फायदेशीर ठरू शकते.
साखरेचे शोषण कमी करते : भेंडीमध्ये विरघळणारे फायबर भरपूर असते. हे फायबर पचनसंस्थेत जेलसारखा पदार्थ तयार करते, ज्यामुळे रक्तात साखर शोषली जाण्याचा वेग मंदावतो, यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
इन्सुलिन सेंसिटिविटी सुधारते : अभ्यासानुसार, भेंडीमधील काही घटक शरीराची इन्सुलिनला सेंसिटिविटी क्षमता सुधारतात, त्यामुळे तुमचे शरीर ग्लुकोजचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकते.
आतड्यांच्या आरोग्यास मदत (Gut Health): भेंडीमधील फायबर ‘प्रिबायोटिक’ म्हणून काम करते, जे फायदेशीर बॅक्टेरियांना प्रोत्साहन देते. निरोगी पचनसंस्था अप्रत्यक्षपणे साखर नियंत्रित करण्यास मदत करते.
अँटीऑक्सिडंट संरक्षण : भेंडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ‘ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’ कमी करण्यास मदत करतात, जो मधुमेहाच्या गुंतागुंतीचा एक मुख्य घटक आहे.
संशोधन काय सांगते?
सुरुवातीचे संशोधन आणि प्राण्यांवरील चाचण्यांचे निकाल उत्साहवर्धक असले तरी मानवावरील संशोधनाचे पुरावे अजूनही मर्यादित आहेत. काही छोटे अभ्यास असे सुचवतात की, भेंडीमुळे ‘फास्टिंग शुगर’ कमी होण्यास मदत होऊ शकते, परंतु तज्ज्ञांच्या मते, हे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांना पर्याय ठरू शकत नाही.
भेंडीचे पाणी कसे तयार करावे?
१. २ ते ३ ताज्या भेंडी धुवून घ्या.
२. त्या लांब चिरून घ्या.
३. एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा.
४. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या.
मधुमेहींच्या रुग्णांनी घ्या ‘या’ गोष्टींची काळजी
औषधे बंद करू नका : तुमच्या डॉक्टरांनी दिलेली औषधे कधीही बंद करू नका.
देखरेख ठेवा : रक्तातील साखरेची पातळी नियमितपणे तपासत राहा.
तज्ज्ञांचा सल्ला घ्या : जर तुम्ही इन्सुलिनवर असाल, तर हे सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांशी नक्की बोला.
मर्यादित वापर : अतिसेवनामुळे काहींना पचनाच्या समस्या (गॅस किंवा फुगल्यासारखे वाटणे) होऊ शकतात.
औषधांवर परिणाम : जर तुम्ही मेटफॉर्मिन (Metformin) हे औषध घेत असाल तर सावध राहा, कारण भेंडीचे पाणी या औषधाच्या शोषणात अडथळा आणू शकते. तसेच रक्त पातळ करण्याची औषधे घेणाऱ्यांनीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(टीप – कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टराचा सल्ला घ्या.)
