Eating olive oil before meals effect : आजकाल सोशल मीडियावर ऑलिव्ह ऑईल म्हणजेच ऑलिव्हच्या फळांपासून तयार केलेल्या तेलाची बरीच चर्चा होत आहे. जेवणापूर्वी दररोज एक चमचा ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी होतो, असा दावा केला जात आहे. मात्र, हा दावा कितपत खरा आहे? मधुमेह असलेल्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी हा उपाय करावा का?

याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एस्क्प्रेसने इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील एंडोक्रिनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर सप्तर्षि भट्टाचार्य यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मते ऑलिव्ह ऑईलमुळे रक्तातील साखर वाढण्याच्या प्रक्रियेवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, दररोज तेल पिणे हा मधुमेह नियंत्रित ठेवण्याचा खात्रीशीर उपाय असल्याचे सिद्ध झालेले नाही.

जेवणापूर्वी ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने काय होते?

अलीकडे उंदरांवर करण्यात आलेल्या एका संशोधनात असे आढळले की, ग्लुकोज देण्याच्या १५ मिनिटे आधी ऑलिव्ह ऑईल दिलेल्या उंदरांच्या रक्तातील साखरेची पातळी, ऑलिव्ह ऑईल न दिलेल्या उंदरांच्या तुलनेत कमी होती.

यामागे एक महत्त्वाचे कारण असू शकते. आपण खाल्लेल्या अन्नातील कर्बोदके लहान आतड्यात पचून शरीरात शोषली जातात. मात्र, चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटातून अन्न पुढे जाण्याची प्रक्रिया मंदावू शकते. त्यामुळे ग्लुकोज हळूहळू रक्तात पोहोचते आणि जेवणानंतर सुरुवातीच्या काळात रक्तातील साखर वाढण्याचा वेग कमी होऊ शकतो.

टाइप-२ मधुमेह असलेल्या सहा पुरुषांवर करण्यात आलेल्या एका छोट्या अभ्यासातही असे आढळले की, बटाटे खाण्यापूर्वी ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने पोट रिकामे होण्याची प्रक्रिया मंदावली आणि रक्तातील साखर वाढण्यास उशीर झाला.

मात्र, हा अभ्यास अतिशय कमी लोकांवर करण्यात आला होता. त्यामुळे दररोज ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो, असा निष्कर्ष काढता येत नाही.

ऑलिव्ह ऑईलमधील कॅलरीजकडेही का लक्ष दिले पाहिजे?

ऑलिव्ह तेल ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आरोग्यासाठी फायदेशीर असू शकते. मात्र, त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही जास्त असते. एक ग्रॅम चरबीमधून सुमारे ९ कॅलरीज मिळतात. तर एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑईलमधून जवळपास १२० कॅलरीज मिळतात. म्हणजेच, दररोज दोन मोठे चमचे तेल प्यायल्यास आहारात सुमारे २४० अतिरिक्त कॅलरीजची भर पडू शकते.

जर तुम्ही रोजच्या आहारात कोणताही बदल न करता अतिरिक्त ऑलिव्ह ऑईल पिण्यास सुरुवात केली. तर शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. दीर्घकाळ असे केल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. शरीरात अतिरिक्त चरबी जमा झाल्यास ती पोटाभोवती आणि यकृतामध्येही साठू शकते. त्यामुळे फॅटी लिव्हरसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

तसेच शरीरातील चरबीचे प्रमाण वाढल्याने इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजेच शरीरातील पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशी स्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे कठीण होऊ शकते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढू नये म्हणून दररोज ऑलिव्ह ऑईल पिणे हा मधुमेह नियंत्रणात ठेवण्याचा योग्य उपाय नाही.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अधिक फायदेशीर आहे का?

ऑलिव्ह ऑईलमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड नावाची असंतृप्त चरबी असते. तूप किंवा लोणी यांसारख्या संतृप्त चरबीच्या जागी मर्यादित प्रमाणात असंतृप्त चरबीचा वापर केल्यास कोलेस्टेरॉलच्या पातळीत सुधारणा होण्यास मदत मिळू शकते.

एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे तेल शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता तयार केले जाते. त्यामुळे त्यामध्ये पॉलीफेनॉल नावाची नैसर्गिक संयुगे अधिक प्रमाणात असू शकतात. या संयुगांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीरातील पेशींचे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. रिफाइंड ऑलिव्ह ऑईलमध्ये या संयुगांचे प्रमाण तुलनेने कमी असू शकते.

काही संशोधनांमध्ये एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचा समावेश असलेल्या भूमध्यसागरीय आहाराचे सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका सुमारे ३० टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून आले आहे. मात्र, भूमध्यसागरीय आहारामध्ये केवळ ऑलिव्ह ऑईल नसते. त्यामध्ये भाज्या, फळे, कडधान्ये, सुका मेवा आणि इतर पौष्टिक पदार्थांचाही समावेश असतो. त्यामुळे या फायद्याचे संपूर्ण श्रेय केवळ ऑलिव्ह ऑईलला देता येत नाही.

ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने वजन कमी होते का?

ऑलिव्ह ऑईल वजन कमी करण्यासाठीचे कोणतेही जादुई साधन नाही. त्यामध्ये असलेल्या चरबीमुळे पोट भरल्याची भावना काही काळ टिकू शकते. मात्र, केवळ ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने वजन कमी होईल, असे म्हणता येत नाही. काही संशोधनांनुसार, ऑलिव्ह ऑईलच्या सेवनामुळे GLP-1 या हार्मोनच्या स्रावात वाढ होऊ शकते. हा हार्मोन भूक, पोट भरल्याची भावना आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, याचा अर्थ ऑलिव्ह ऑईल प्यायल्याने वजन हमखास कमी होते, असा होत नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एकूण कॅलरीजचे प्रमाण, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत.

मग रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी केवळ एका पदार्थावर किंवा घरगुती उपायावर अवलंबून राहण्याऐवजी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

संतुलित आहार – रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या, डाळी, कडधान्ये, संपूर्ण धान्ये आणि योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश करा.

व्यायाम – नियमित चालणे आणि इतर शारीरिक हालचालींमुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.

वजन नियंत्रणात ठेवणे – अतिरिक्त वजन कमी केल्याने इन्सुलिनचा प्रभाव सुधारण्यास मदत होऊ शकते.

तेलाचे प्रमाण मर्यादित ठेवणे – ऑलिव्ह ऑईल वापरायचे असल्यास ते अतिरिक्त पिण्याऐवजी स्वयंपाकात इतर चरबीच्या जागी मर्यादित प्रमाणात वापरा.

डॉक्टरांचा सल्ला घ्या – मधुमेहाची औषधे किंवा इन्सुलिन स्वतःहून बंद करू नका किंवा त्यात बदल करू नका.