Non Alcoholic Fatty Liver Disease : यकृत हा शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करणे, विषारी पदार्थ बाहेर टाकणे, औषधांचे चयापचय करणे आणि पचनासाठी आवश्यक असलेले पित्त तयार करणे अशी महत्वाची कार्ये यकृताकडून होत असतात. अनेकांना वाटते की, फक्त मद्यपानामुळे यकृताचे नुकसान होते; परंतु वैद्यकीय तज्ञांच्या मते, तुमच्या रोजच्या अनेक सवयी आहेत, ज्या हळूहळू यकृताचे नुकसान करतात.
डॉक्टरांचा सल्ला न घेता, वेदनाशामक गोळ्यांचा वारंवार वापर, हर्बल सप्लिमेंट्सचा गैरवापर, साखरयुक्त पेयांचे अतिसेवन, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे सेवन आणि एनर्जी ड्रिंक्सचे अतिसेवन यांसारख्या सवयींमुळेही यकृताचे नुकसान होते.
तज्ज्ञांच्या मते, मद्यपान न करताही यकृत खराब होऊ शकते. ‘एनएचएस’नुसार (NHS), सध्याच्या काळात ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ (NAFLD) हा जगभरातील यकृताच्या सर्वांत सामान्य आजारांपैकी एक बनला आहे. त्यामध्ये व्यक्ती दारू पीत नसली तरीही तिच्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी (फॅट) जमा होऊ लागते. लठ्ठपणा, मधुमेह (डायबिटीज), हाय कोलेस्ट्रॉल, आहारातील साखरेचे जास्त प्रमाण आणि व्यायामाचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे आहेत. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास याचे रूपांतर सूज (NASH), लिव्हर सिरोसिस आणि पुढे जाऊन लिव्हर फेल्युअरमध्ये होऊ शकते.
रोजच्या ‘या’ ५ सवयी यकृतीवर करतात गंभीर परिणाम
१. पेनकिलर औषधांचा अतिवापर
‘मेडलाइन प्लस’नुसार, वेदना किंवा ताप आल्यावर लोक सहसा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘निमेसुलाइड’ किंवा ‘निमेसुलाइड पॅरा’सारख्या वेदनाशामक (पेनकिलर) आणि काही NSAIDs औषधांचे वारंवार सेवन करतात. योग्य प्रमाणात ही औषधे सुरक्षित मानली जातात; परंतु जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळ सेवन केल्यास लिव्हरवर गंभीर परिणाम होऊ शकतो. विशेषतः आधीपासूनच यकृताचा आजार असल्यास गंभीर धोके निर्माण होतात.
२. हर्बल सप्लिमेंट्सचा चुकीचा वापर
‘एनसीबीआय’नुसार (NCBI), ‘हर्बल’ किंवा ‘नैसर्गिक’ लिहिलेले उत्पादन पूर्णपणे सुरक्षित असते, असा लोकांचा समज असतो; परंतु सर्वच हर्बल सप्लिमेंट्स शास्त्रीयदृष्ट्या प्रमाणित नसतात. काही आयुर्वेदिक, हर्बल किंवा बॉडीबिल्डिंग सप्लिमेंट्समध्ये असे घटक आढळले आहेत, जे यकृताला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणतेही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
३. साखरेचे प्रमाण जास्त असलेली ड्रिंक्स
कोल्ड ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस, फ्लेवर्ड कॉफी आणि इतर गोड पेयांमध्ये अधिक प्रमाणात एडेड शुगर आणि ‘हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप’ असते. फ्रुक्टोजच्या अतिसेवनाने यकृतामध्ये चरबी जमा होण्याची प्रक्रिया वेगवान होते, ज्यामुळे फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.
४. प्रोसेस्ड फूड (प्रक्रिया केलेले अन्न)
चिप्स, पॅक केलेले स्नॅक्स, इन्स्टंट नूडल्स, प्रोसेस्ड मीट, बिस्किटे व फास्ट फूड यांसारख्या अल्ट्रा-प्रोसेस्ड पदार्थांमध्ये जास्त मीठ, ट्रान्स फॅट, रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात. त्यांचे नियमित सेवन लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढवते.
५. एनर्जी ड्रिंक्सचा लिव्हरवर परिणाम
ऊर्जा देणाऱ्या ‘एनर्जी ड्रिंक्स’मध्ये कॅफिन आणि इतर उत्तेजक घटक असतात, जे मूत्रपिंडांसह यकृतावरही वाईट परिणाम करतात. रोज ‘शुगर फ्री’ एनर्जी ड्रिंक्स प्यायल्यानेही यकृताला गंभीर दुखापत (Liver Injury) होण्याचा धोका असतो.
काय काळजी घ्यावी?
यकृत खराब होण्यासाठी फक्त दारूच जबाबदार असते, असे नाही. औषधांचा योग्य वापर, संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे पालन केल्यास गंभीर धोके टाळता येतात. तुम्हाला सतत थकवा, पोटदुखी, भूक न लागणे किंवा कावीळ यांसारखी लक्षणे दिसल्यास, त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
