भारतात २०१८ मध्ये अंदाजे ११.६ लाख इतके कर्करोगाचे रुग्ण होते असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले असून त्याचा अर्थ दहातील एका व्यक्तीला जीवनात कर्करोगास सामोरे जावे लागते व दर १५ रुग्णातील एक जण यात मरण पावतो असे दिसून आले आहे. जागतिक कर्करोग दिनानिमित्त सादर करण्यात आलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, भारतात कर्करोगाने ७८४८०० रुग्ण मरण पावले असून १.३५ अब्ज लोकांपैकी २२.६ लाख लोकांना सध्या कर्करोग झालेला आहे. भारतात स्तनाच्या कर्करोगाचे १६२५००, तोंडाच्या कर्करोगाचे १२००००, गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे ९७ हजार, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ६८ हजार, पोटाच्या कर्करोगाचे ५७ हजार, आतडय़ाच्या कर्करोगाचे ५७ हजार रुग्ण आहेत. एकूण नवीन कर्करुग्णांपैकी हे प्रमाण ४९ टक्के आहे.

पुरुषांमध्ये ५७०००० नवीन कर्करुग्णात तोंडाचा कर्करोग असलेले ९२ हजार, फुफ्फुसाच्या कर्करोगाचे ४९ हजार, पोटाच्या कर्करोगाचे ३९ हजार, आतडय़ाच्या कर्करोगाचे ३७ हजार, श्वासनलिका कर्करोगाचे ३४ हजार म्हणजे एकूण ४५ टक्के रुग्ण आहेत. स्त्रियांमध्ये ५८७००० नवीन कर्करोग रुग्णात स्तनाचा कर्करोग १६२५००, गर्भाशय मुखाचा कर्करोग ९७ हजार, अंडाशयाचा कर्करोग ३६ हजार, तोंडाचा कर्करोग २८ हजार व आतडय़ाचा कर्करोग २० हजार महिलांना असून हे प्रमाण एकूण साठ टक्के आहे.

भारतात तंबाखूमुळे मानेचा, डोक्याचा व तोंडाचा कर्करोग पुरुषांत अधिक आहे. महिलांत गर्भाशय मुखाचा कर्करोग अधिक आहे. स्तनाचा कर्करोग हा जास्त वजन व लठ्ठपणाशी संबंधित असतो. त्यास जीवनशैलीही कारणीभूत असते. जगात कर्करोगाचे प्रमाण पुढील २० वर्षांत ६० टक्के वाढू शकते. पुढील दशकात योग्य उपाययोजना केल्या तर ७० लाख लोकांचे प्राण वाचवता येतील. भारतात सध्या १६ कोटी ४० लाख लोक धूररहित तंबाखू वापरतात, ६९ दशलक्ष लोक सिगारेट ओढतात, ४२ दशलक्ष लोक सिगारेट व तंबाखू दोन्हीचे व्यसन करतात. पुरुषात एकूण कर्करोगात ३४-६९ टक्के प्रमाण हे तंबाखू निगडित कर्करोगांचे आहे तर स्त्रियात १०-२७ टक्के प्रमाण हे तंबाखूशी निगडित कर्करोगाचे आहे.