Reduce Bad Cholesterol: आपल्या रोजच्या जेवणात कांद्याचं स्थान अगदी ठरलेलं असतं. भाजी असो, आमटी असो किंवा ताटातली साधी कोशिंबीर. कांदा नसेल तर जेवणाची चवच काहीशी अपुरी वाटते. पण ताटातला हा साधासुधा कांदा केवळ चव वाढवण्यासाठीच नाही, तर शरीरासाठीही अनेक पोषक घटकांचा स्रोत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कांद्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि सल्फरयुक्त संयुगे आढळतात. त्यामुळे नियमित आहारातील कांदा आरोग्यासाठी नेमका कसा फायदेशीर ठरू शकतो, याबाबत जाणून घेऊया…

कांद्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि काही फायदेशीर वनस्पतीजन्य संयुगे आढळतात. चेन्नईतील फिटनेस आणि न्यूट्रिशन कोच राज गणपत यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडीओमध्ये कांद्याचे काही विशिष्ट फायदे सांगितले आहेत.

अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत

कांद्यात क्वेर्सेटिन (Quercetin) नावाचे अँटिऑक्सिडंट संयुग आढळते. शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढण्यास आणि पेशींना होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास अँटिऑक्सिडंट्स मदत करतात. क्वेर्सेटिनमध्ये दाह-विरोधी गुणधर्म असल्याचेही संशोधनातून दिसून आले आहे. त्यामुळे आहारात कांद्यासारख्या भाज्यांचा समावेश करणे एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

पचनासाठी फायबर महत्त्वाचं

कांदा केवळ चव वाढवण्यासाठी नाही, तर आहारातील फायबरचा स्रोत म्हणूनही महत्त्वाचा आहे. फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच आतड्यांच्या आरोग्यासाठी फायबर महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे रोजच्या आहारात भाज्या आणि इतर फायबरयुक्त पदार्थांसोबत कांद्याचाही समावेश करता येतो.

कांद्यामधील सल्फरयुक्त संयुगे ठरू शकतात फायदेशीर

कांदा चिरताना डोळ्यातून पाणी का येतं, याचा संबंध त्यातील सल्फरयुक्त संयुगांशी आहे. कांद्याला मिळणारी विशिष्ट चव आणि तीव्र वास यामागेही ही संयुगे कारणीभूत असतात. या नैसर्गिक संयुगांचा हृदयाच्या आरोग्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. काही संशोधनांमध्ये कांद्याच्या सेवनाचा कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबासारख्या हृदयविकाराच्या जोखीम घटकांशी संबंध आढळला आहे. मात्र, कांदा हा उच्च रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉलवरील उपचाराचा पर्याय नाही.

कमी कॅलरी, पण अनेक पोषक घटक

कांद्यामध्ये कॅलरी तुलनेने कमी असतात आणि त्यातून काही महत्त्वाची जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात. तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कांद्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ब ६ आणि पोटॅशियम आढळते. त्यामुळे रोजच्या आहारात कांद्याचा समावेश केल्यास विविध पोषक घटक मिळवण्यास हातभार लागू शकतो. कांदा नैसर्गिकरित्या ग्लूटेन-फ्री, फॅट-फ्री आणि डेअरी-फ्री आहे.

मग कच्चा कांदा खावा की शिजवून?

कांदा कच्चा, कोशिंबिरीत, सॅलडमध्ये किंवा विविध पदार्थांमध्ये शिजवून खाता येतो. मात्र, कांदा खाल्ल्याने एखादा आजार बरा होतो किंवा कोलेस्ट्रॉल/ब्लड प्रेशर निश्चितपणे कमी होते, असा दावा करणे योग्य नाही. कांदा हा संतुलित आहाराचा एक भाग म्हणून पाहावा. त्यासोबत हिरव्या भाज्या, फळे, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, प्रोटीन आणि पुरेसे पाणी यांचा आहारात समावेश करणे अधिक महत्त्वाचे आहे.

ताटातला साधा कांदा केवळ चव वाढवत नाही, तर फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि काही महत्त्वाची जीवनसत्त्वे-खनिजेही देतो. त्यामुळे पुढच्या वेळी सॅलडमध्ये कांद्याची वाटी दिसली, तर त्याकडे फक्त चव वाढवणारा पदार्थ म्हणून पाहू नका!