ऑनलाईन व्हिडिओ गेम्समुळे मुले फक्त आळशी होत नाहीत तर त्यांचा या गेम्सच्या माध्यमातून जंक फूड खाण्यासाठी प्रेरीत केले जात असल्याचा दावा एका नव्या अभ्यासावरून करण्यात आला आहे.
मिशिगन स्टेट विद्यापीठाच्या एका संशोधक गटाने केलेल्या अभ्यामध्ये ऑनलाईन व्हिडिओ गेम्समधून मुलांचे फक्त मनोरंजन नाही तर त्यामागे बऱ्याचशा उत्पादनांच्या जाहिराती देखील आहेत. सामान्यपणे विचार केल्यास ही कुणाच्या सहज लक्षात न येणारी बाब आहे. मात्र, मोफत गेम्स उपलब्ध करून देण्यामागील हेतू पडताळल्यावर ही बाब समोर आली आहे.   
ऑनलाईन गेम्समधून साखरेचे प्रमाण जास्त असलेल्या, सोडियमयुक्त व चरबी वाढवणाऱ्या पदार्थांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचा दावा या संशोधक गटाने केला आहे.    
खाद्यपदार्थांचे विपणन करणाऱ्या अनेक संकेत स्थळांवर मोफत व्हिडिओ गेम्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यंशोधकांनी अभ्यासासाठी १४५ संकेत स्थळांची निवड केली होती. या सर्व संकेतस्थळांवर एकूण ४३९ खाद्यपदार्थांच्या जाहिराती संशोधकांना आढळल्या. हे सर्व जाहिरातवजा गेम्स असल्याचा या संशोधक गटाने दावा केला असून, त्यांचा मुळ उद्देश मुलांना जंक फूडकडे आकर्षित करणे हाच आहे.
“आम्हाला एका बाबीची काळजी वाटते. ती म्हणजे हे सर्व खाद्यपदार्थ मुलांमधील उर्जाक्षय करणारे, अतिजास्त उष्मांक असलेले आणि आहारमूल्ये नसलेले आहेत,” असे या प्रकल्पाचे सह संचालक व अन्नशास्त्र आणि मानवी पोषण विभागाचे सहाय्यक प्राध्यापक लॉरेन वेदरस्पून म्हणाले.   
“या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्याप्रमाणामध्ये साखरेचा वापर केला जात असून, यामध्ये अनेक डबाबंद सूप्स, साखरयुक्त पेये आणि चॉकलेटस चा भडीमार करण्यात आला आहे,” असे वेदरस्पून यांनी सांगितले.      
हे व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी सहज व सोपे आहेत. या गेम्समध्येच या खाद्यपदार्थांची ब्रँड नावे, त्यांचे लोगो, चित्रे यांचा वापर करण्यात आला आहे.
“टीव्हीवरील जाहिरातींशी तुलना केल्यास ऑनलाईन गेम्समधून मनोरंजनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या जाहिराती मुलांवर जास्त परिणाम करणाऱ्या आहेत,” असे या प्रकल्पाच्या दुसऱ्या सहाय्यक संचालक व जाहिरात आणि जनसंपर्क विभागाच्या सहाय्यक प्राध्यापीका एलिझाबेथ टेलर क्यूलिआम म्हणाल्या.