आहाराच्या सवयी, जीवनशैली आणि आरोग्याकडे असलेले दुर्लक्ष याचा परिणाम आज अनेक गंभीर आजारांच्या वाढत्या प्रमाणात दिसत आहे. कर्करोग हा त्यातीलच एक मोठा धोका. तो अचानक उद्भवत नाही, तर वर्षानुवर्षेच्या अंगवळणी पडलेल्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, झोपेचा अभाव आणि अपायकारक व्यसनांमधून हळूहळू आकार घेचो. चिंतेची बाब म्हणजे, पूर्वी दुर्मिळ मानले जाणारे काही कर्करोग आता मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. ओरल कॅव्हिटी कॅन्सर म्हणजेच तोंडाचा कर्करोग हे त्याचे ठळक उदाहरण आहे.

दुर्मिळातून सामन्याकडे झुकणारा तोंडाचा कर्करोग (Oral Cavity Cancer on the Rise)

प्रसिद्ध ऑन्कोलॉजिस्ट डॉ. सेवंती लिमाये यांनी अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यांच्या मते,”भारतात ओरल कॅव्हिटी कॅन्सरचे प्रमाण इतक्या वेगाने वाढत आहे की काही भागांत तो ब्रेस्ट कॅन्सरला टक्कर देत आहे. देशात ही स्थिती केवळ वैद्यकीय नव्हे, तर सामाजिक आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर ठरत आहे.”

आकडेवारी काय सांगते? (What Do the Numbers Show)

ठाण्यातील KIM हॉस्पिटल्सचे हेड अँड नेक ऑनकोसर्जरी तज्ज्ञ डॉ. हितेश सिंहावी यांच्या मते, “ओरल कॅव्हिटी कॅन्सर आज देशातील सर्वाधिक आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक झाला आहे. दरवर्षी सुमारे १.४३ लाख नवीन रूग्ण आढळतात. यामध्ये पुरुषांची संख्या महिलांच्या तुलनेत सहापट आहे. म्हणजेच पुरुषांमध्ये हा सर्वाधिक आढळणारा कर्करोग ठरत आहे. दुसरीकडे, ब्रेस्ट कॅन्सरचे दरवर्षी सुमारे १.९२ लाख नवीन रूग्ण आढळतात, ज्यात बहुतांश महिलांचा समावेश असतो. पुरुषांमध्ये ओरल कॅन्सर आणि महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर ही दोन मोठी आव्हाने बनली आहेत.”

तोंडाच्या कर्करोगाचा धोका का वाढतोय? (Why Is the Risk Increasing)

तोंड हे आपल्या रोजच्या सवयींशी थेट जोडलेले अवयव आहे. तंबाखू, सुपारी, गुटखा, मद्यपान, खराब ओरल हायजीन, तसेच तुटलेले किंवा धारदार दात यांमुळे होणारी सततची जखम, यामुळे तोंडाच्या आतल्या पेशींवर दीर्घकाळ परिणाम होतो. ही इजा वेळेवर भरून न निघाल्यास पेशीमध्ये असामान्य बदल होण्याची शक्यता वाढते. अनेकदा लहानसा फोड किंवा पांढरा डाग ‘सामान्य अल्सर’ समजून दुर्लक्षित केला जातो आणि इथूनच धोका वाढतो.

जीवनशैलीशी थेट संबंध (A Lifestyle-Linked Cancer)

डॉ. सिंहावी स्पष्ट करतात की ब्रेस्ट कॅन्सरमध्ये हार्मोनल आणि जैविक घटक मोठी भूमिका बजावतात, तर ओरल कॅव्हिटी कॅन्सर हा प्रामुख्याने जीवनशैलीशी संबंधित आहे. त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात टाळता येण्या जोगा कर्करोग आहे. मात्र, समाजात खोलवर रूजलेल्या सवयींमुळे हा प्रश्न केवळ वैद्यकीय न राहता वर्तणुकीचा आणि सामाजिक पातळीवरीलही बनतो.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवणाऱ्या सवयी (Breast Cancer Risk Factors)

ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत खराब झोप, व्यायामाचा अभाव, वजन वाढ, सततचा मानसिक ताण आणि बिघडलेले मेटाबॉलिक आरोग्य हे घटक महत्त्वाचे ठरतात. या सवयी हार्मोनल संतुलन बिघडवतात आणि त्याचा परिणाम स्तनाच्या ऊतींवर होतो.

तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची चिन्हे (Early Warning Signs)

ओरल कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे बहुतेक वेळा वेदनारहित असतात. तोंडात लहान फोड, पांढरे किंवा लाल डाग, तोंडात हलकी अस्वस्थता याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. खाण्या-पिण्यात किंवा बोलण्यात अडथळा येत नसल्याने रुग्ण घरगुती उपायांवर समाधान मानतो. मात्र, हीच लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगाची सूचना देत असू शकतात.

प्रतिबंध शक्य आहे (Prevention Is Possible)

तज्ज्ञांच्या मते ओरल कॅव्हिटी कॅन्सरपासून बचाव करणे शक्य आहे. तंबाखू कोणत्याही स्वरुपात टाळणे, मद्यपान मर्यादित ठेवणे, तोंडाची स्वच्छता राखणे, शरीर सक्रिय ठेवणे आणि तोंडात कोणताही बदल दीर्घकाळ जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे या सवयी निर्णायक ठरू शकतात. लहान लक्षणांकडे वेळेत लक्ष दिल्यास गंभीर आजार टाळता येऊ शकतो.