Weekend Drinking Smoking Habit Oral Cancer Risk : लोक लग्न, पार्ट्या आणि वीकेंड मोठ्या आनंदाने साजरे करतात. ते मित्र आणि कुटुंबासह वेळ घालवतात; पण या मौजमजेच्या नावाखाली लोक अनेकदा दारू, सिगारेट आणि गुटख्याचे सेवन करतात. मुंबई, पुणे, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये तणावपूर्ण जीवन आणि एकाकीपणाचा सामना करण्यासाठी लोक दारूचा आधार घेतात. त्यामुळे काही काळासाठी सर्व काही ठीक वाटते; पण हळूहळू शरीरात आजार निर्माण होऊ लागतात. सुरुवातीला लोकांना या धोक्याची जाणीव नसते आणि शरीरात आजार वाढतच जातात.

याच विषयावर दिल्लीतील अपोलो हॉस्पिटलचे डोके आणि मान कर्करोगशास्त्र वरिष्ठ सल्लागार डॉ. अक्षत मलिक यांनी सांगितले की, तोंडाच्या कर्करोगाच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे तंबाखूचे सेवन. गुटखा, खैनी, जर्दा यांसारखी धूरविरहित तंबाखूजन्य उत्पादने आणि तंबाखूयुक्त पान या गोष्टी तोंडाच्या आतील आवरणाला आणि हिरड्यांना नुकसान पोहोचवू शकतात. सिगारेट आणि बिडीच्या धुरामुळेदेखील तोंडाच्या आणि डोके-मानेच्या कर्करोगाचा धोका वाढतो .

धोकादायक वीकेंड सवयी

अनेक लोक तंबाखूचे सेवन करतात. कारण- त्यांना वाटते की, ते दररोज वापरत नसल्यामुळे धोका कमी असतो; पण कोणत्याही स्वरूपातील तंबाखूचा वापर आरोग्यासाठी सुरक्षित नसतोच, विशेषतः जेव्हा अधूनमधून होणारा वापर हळूहळू नियमित होऊ लागतो तेव्हा हा धोका अधिक वाढतो.

दारू आणि तंबाखूचे एकत्र सेवन

दारू आणि तंबाखू यांचे एकत्र सेवन चिंताजनक ठरू शकते. कारण- दारूमुळे तोंडाच्या आतील त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि तंबाखूमधील कर्करोगजन्य रसायनांच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या दोन्हींचे एकत्र सेवन केल्याने तोंड आणि घशाच्या कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. तरुणांमध्ये ‘सोशल स्मोकिंग’ म्हणजेच मित्रांसह अधूनमधून तंबाखूचे सेवन करण्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. पण, कोणतीही सवय अनेकदा अशीच सुरू होते. लोक म्हणतात, “मी रोज धूम्रपान करीत नाही.”

दुर्लक्ष करू नका ‘या’ शारीरिक लक्षणांकडे…

तोंडाचा कर्करोग लवकर ओळखल्यास, उपचारांचे चांगले परिणाम मिळू शकतात. त्यामुळे काही विशिष्ट लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. जसे की, दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न भरणारा तोंडातील व्रण, तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे, तोंड उघडण्यास किंवा चावण्यास अडचण, जेवताना सतत जळजळ किंवा वेदना, जिभेवर किंवा तोंडाच्या कोणत्याही भागावर गाठ किंवा जाडसरपणा, गिळण्यास अडचण, मानेमध्ये वेदनाविरहित गाठ, आवाजात दीर्घकाळ टिकणारा बदल. यापैकी कोणतेही लक्षण आढळल्यास, स्वतःहून औषधोपचार करण्याऐवजी डोके आणि मान किंवा तोंडाच्या कर्करोगाच्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या.

कुटुंबाची भूमिका महत्त्वाची

तंबाखूचे सेवन ही एक वैयक्तिक निवड आहे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नये. जर कुटुंबातील एखादा सदस्य प्रत्येक पार्टी, लग्न किंवा जेवणानंतर गुटखा किंवा सिगारेट ओढत असेल, तर त्याला थांबवणे किंवा त्या सवयीचे तोटे समजावून सांगितले पाहिजे. अनेकदा आपली सामाजिक सवय ही नियमित सवय कधी बनते, हे त्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. ही सवय मोडण्याच्या दृष्टीने कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो.

उत्सवात आरोग्यदायी सकारात्मकतेला उजाळा द्या

वीकेंडचा आनंद घेण्याचा हा एकमेव मार्ग नाही. व्यायाम करा, सायकल चालवा, पोहण्याचा आनंद घ्या किंवा तुम्हाला आवडेल अशा इतर कोणत्याही उपक्रमात सहभागी व्हा. त्यामुळे तुमच्या मेंदूत आनंदी हार्मोन्स स्रवतील आणि तुमच्या शरीराला सकारात्मक फायदे मिळतील. कुटुंबासह वेळ घालवा, सणासुदीच्या मिठाईचा आस्वाद घ्या, नाचा आणि फोटो काढा. असे केल्यामुळे तुमच्या उत्सवात सहभागी झालेले लोक आणि तुमच्या आठवणी अशा दोन्हींना अधिक ऊर्जितावस्था मिळेल.

(टीप – कोणतेही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)