Oral Cancer Horoscope: नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्रीनुसार, भारतात दरवर्षी तोंडाच्या कर्करोगाचे सुमारे ६०,००० नवीन रुग्ण आढळतात. आकडेवारीनुसार, भारतात दर तासाला ५ पेक्षा जास्त लोक तोंडाच्या कर्करोगामुळे जीव गमावतात. यावरून हा आजार किती गंभीर आहे, हे लक्षात येते.
तोंडाचा कर्करोग प्रामुख्याने ४० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये दिसून येतो. त्यामुळे त्याची लक्षणे वेळीच ओळखणे आणि गरज असल्यास योग्य उपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.
फोर्टिस रुग्णालयातील सीनियर कन्सल्टंट आणि युनिट हेड, हेड अँड नेक सर्जन डॉ. अंबेश सिंह यांनी तोंडात होणाऱ्या अशा २ समस्यांबद्दल सांगितले आहे, ज्या २-३ आठवड्यांत बऱ्या होत नसतील तर त्या तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकतात.
तोंडाच्या कर्करोगाची ही २ लक्षणे दुर्लक्षित करू नका
डॉक्टरांच्या मते, खालील २ लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. ही तोंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
पहिले लक्षण – तोंडात झालेली जखम किंवा तोंड आलं असेल २ ते ३ आठवड्यांत बरा होत नसेल किंवा वारंवार होत असेल.
दुसरे लक्षण – तोंडात पांढरा किंवा लाल डाग दिसणे, गाठ होणे किंवा सतत रक्त येणे.
या लक्षणांकडेही लक्ष द्या
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) नुसार, तोंडाचा कर्करोग झाल्यास पुढील लक्षणे दिसू शकतात –
- तोंड, चेहरा किंवा घशावर झालेली जखम बरी न होणे
- तोंड उघडताना त्रास होणे
- घशात गाठ जाणवणे
- तोंड, जीभ किंवा जबड्यात दुखणे
- अन्न चावताना किंवा गिळताना त्रास होणे
- तोंडाच्या आत, ओठांवर किंवा हिरड्यांवर सूज येणे
- तोंडात किंवा त्वचेवर गाठ किंवा दाणे दिसणे
- कोणतेही कारण नसताना तोंडातून रक्त येणे
- आवाजात बदल होणे
- दात सैल होणे
- कोणतेही कारण नसताना वजन कमी होणे
ही लक्षणे केवळ तोंडाच्या कर्करोगातच दिसतात असे नाही. तोंडातील साधी समस्या, बिनाइन ट्यूमर किंवा इतर आजारांमध्येही अशी लक्षणे दिसू शकतात. मात्र, यापैकी कोणतेही लक्षण २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहिल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
कोणाला तोंडाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो?
खालील लोकांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचा धोका अधिक असू शकतो
- तंबाखू खाणारे
- सिगारेट, बीडी किंवा सिगार ओढणारे
- जास्त प्रमाणात दारू पिणारे
- आहाराकडे योग्य लक्ष न देणारे
- ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) ची लागण झालेले लोक
- रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले लोक
- एड्स असलेले रुग्ण
तसेच, सूर्याच्या अतिनील किरणांच्या (UV Rays) जास्त संपर्कामुळे ओठांचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो.
घरच्या घरी तोंडाची तपासणी कशी कराल?
ICMR नुसार, तोंडात काही संशयास्पद बदल किंवा असामान्य खुणा आहेत का, हे आपण स्वतःही पाहू शकतो. त्यासाठी पुढील गोष्टी करा –
१. सर्वात आधी हात स्वच्छ धुवा.
२. बोटांच्या मदतीने तोंडाच्या आत नीट तपासा. कुठे गाठ किंवा सूज आहे का, ते पाहा.
३. डोके थोडे मागे करून तोंडाच्या वरच्या भागाकडे पाहा. तिथे काही गाठ किंवा वेगळा बदल दिसतोय का, ते तपासा.
४. जीभ बाहेर काढून वर उचला आणि जीभेच्या खाली काही असामान्य दिसतेय का, ते पाहा.
५. घशाच्या दोन्ही बाजूंना गाठ, दाणा किंवा सूज आहे का, ते तपासा.
तोंडात काही वेगळे किंवा असामान्य दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तपासणीनंतर हे लक्षण कर्करोगामुळे आहे की इतर कोणत्या कारणामुळे, हे डॉक्टर सांगू शकतात.
तोंडाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी काय करावे?
तोंडाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काही सवयी बदलणे गरजेचे आहे.
- धूम्रपान करणे टाळा.
- दारूचे सेवन कमी करा.
- पान आणि तंबाखू खाणे टाळा.
- विशेषतः तोंडात तंबाखू ठेवून झोपू नका.
- आहारात हिरव्या आणि पिवळ्या रंगाच्या भाज्यांचा समावेश करा.
- ताजी फळे नियमित खा.
महत्त्वाचे: तोंडात झालेली जखम, डाग, गाठ किंवा इतर कोणताही बदल बराच काळ राहिल्यास स्वतःहून निष्कर्ष काढू नका. डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे योग्य ठरेल.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
