Oral Cancer Symptoms : तोंडाच्या कर्करोगाला ‘ओरल कॅन्सर’, असेही म्हणतात. या कर्करोगाची सुरुवात तोंडातील पेशींमधून होते आणि तो शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. तोंडातील गाठींचे दोन प्रकार असू शकतात बिनाइन (Benign) आणि मॅलिग्नंट . बिनाइन गाठी कर्करोगाच्या नसतात; तर मॅलिग्नंट गाठी कर्करोगाच्या असतात आणि त्या गंभीर स्वरूपाच्या ठरू शकतात. त्यामुळे तोंडात आढळणाऱ्या कोणत्याही असामान्य खुणा, गाठी किंवा जखमांची वेळीच तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
‘नॅशनल ओरल कॅन्सर रजिस्ट्री’ (NOCR)नुसार, तोंडाचा कर्करोग हा डोके आणि मानेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. त्याची सुरुवात जीभ, तोंडाचा तळभाग किंवा तोंडातील इतर भागांपासून होऊ शकते आणि तो घसा किंवा शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतो. त्यामुळे तोंडाच्या कोणत्या भागांमध्ये या कर्करोगाची लक्षणे दिसू शकतात, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे कुठे दिसू शकतात?
तोंडाच्या कर्करोगाची काही लक्षणे आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यातही दिसू शकतात; तर काही लक्षणे आजार बळावल्यानंतर स्पष्टपणे जाणवू शकतात. ही लक्षणे तोंडाच्या आत जखम, फोड, पांढरे किंवा लाल चट्टे, गाठ किंवा गडद रंगाचे डाग, दातांमध्ये बदल होणं – अचानक दात पडणं, दात सैल होणं किंवा अयोग्य पद्धतीनं दात येणं ही जबड्याच्या कॅन्सरची लक्षणं असतात.
कर्करोगाची चिन्हे टाळूवर, तोंडाच्या तळभागावर, टॉन्सिल्सच्या आसपास, जिभेच्या खाली किंवा जिभेच्या कडेला, हिरड्यांवर, ओठांवर, दात आणि जीभ यांच्यामधील भागात किंवा ओठांच्या आतील बाजूस दिसू शकतात. तोंडातील कोणतीही जखम किंवा फोड दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
फोर्टिस हॉस्पिटलमधील वरिष्ठ सल्लागार, युनिट प्रमुख व ‘हेड अँड नेक सर्जन’ डॉ. अंबेश सिंग यांच्या मते, तोंडातील एखादी जखम दोन ते तीन आठवडे होऊनही बरी होत नसेल, तर ती गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. त्याशिवाय तोंडात पांढरे किंवा लाल चट्टे दिसणे, गाठ तयार होणे आणि सतत रक्तस्राव होणे यांसारख्या समस्यांकडेही दुर्लक्ष करू नये.
‘या’ समस्यांमध्ये तोंडाचा कर्करोग दडलेला असणे शक्य
तोंडाच्या कर्करोगामध्ये विविध प्रकारची लक्षणे दिसून येऊ शकतात. मात्र, यापैकी कोणतेही एक लक्षण दिसले म्हणजे तोंडाचा कर्करोग झाला आहे, असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तरीही संभाव्य समस्या वेळीच ओळखण्यासाठी अशी लक्षणे दीर्घकाळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तोंड किंवा चेहऱ्यावर वारंवार फोड येणे, तोंडात किंवा घशात जखम होणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, घशात गाठ जाणवणे, तोंडात सतत वेदना होणे, जीभ किंवा जबड्यात वेदना जाणवणे, अन्न चावण्यास किंवा गिळण्यास त्रास होणे, तोंडाच्या आत, ओठांवर किंवा हिरड्यांवर सूज येणे, तोंडात गाठ किंवा फोड जाणवणे, कोणतेही स्पष्ट कारण नसताना तोंडातून रक्त येणे, आवाजात बदल होणे आणि दात सैल होणे यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. त्याशिवाय तोंडातील एखादी जखम किंवा चट्टा बराच काळ बरा होत नसेल, त्याच्या आकारात बदल होत असेल किंवा त्या ठिकाणी सतत वेदना, रक्तस्राव किंवा सूज जाणवत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
तोंडाच्या कर्करोगाची कारणे काय?
तोंडाचा कर्करोग होण्यामागे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. जीवनशैलीशी संबंधित काही सवयी आणि इतर जोखमीच्या घटकांमुळे तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामधील समाविष्ट घटक खालीलप्रमाणे :
- तंबाखूचे सेवन करणे
- विडी, सिगारेट किंवा हुक्का ओढणे
- मद्यपान करणे
- तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे
- दीर्घकाळ बरी न होणारी किंवा वारंवार होणारी संसर्गजन्य समस्या
- अयोग्य किंवा असंतुलित आहार
- सूर्याच्या अतिनील (UV) किरणांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे ओठांच्या कर्करोगाचा धोका वाढणे
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे इतर अनेक सामान्य आजारांमध्ये किंवा तोंडाच्या समस्यांमध्येही दिसू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे आढळली म्हणजे कर्करोगच आहे, असे समजून घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, तोंडातील जखम, गाठ, चट्टे किंवा इतर असामान्य बदल दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता, डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.
