Oral Cancer Symptoms Test: तोंडाच्या कर्करोगाला ‘ओरल कॅन्सर’ किंवा ‘ओरल कॅव्हिटी कॅन्सर’, असेही म्हटले जाते. त्याची सुरुवात तोंडाच्या एखाद्या भागात होते आणि तो शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू शकतो. हा कर्करोग तोंडाच्या पोकळीतील कोणत्याही भागात जसे की जीभ, ओठ, हिरड्या, दात, गालांचा आतील भाग, लाळ ग्रंथी, तोंडाचा तळ किंवा टाळू, टॉन्सिल्स किंवा घशातील लटकणारा मांसल भाग होऊ शकतो. म्हणूनच तोंडाच्या कर्करोगाचे लवकर निदान होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आणि त्याचे निदान कसे केले जाते, याची माहिती दिली आहे.

तोंडच्या कर्करोगाची धोक्याची चिन्हे आणि लक्षणे

  • तोंडात, चेहऱ्यावर किंवा घशात न बरी होणारी जखम
  • तोंड उघडण्यास त्रास होणे
  • जीभ, हिरड्या किंवा तोंडाच्या आत पांढरे, लाल किंवा मिश्र रंगाचे चट्टे दिसणे
  • मानेमध्ये गाठ किंवा ऊतींची जाडी वाढणे
  • तोंड, जीभ किंवा जबड्यात सतत वेदना होणे
  • अन्न चावताना किंवा गिळताना दीर्घकाळ त्रास होणे
  • तोंडात, ओठांवर किंवा हिरड्यांवर सूज येणे किंवा जाड गाठ दिसून येणे

‘ही’ लक्षणेही दिसण्याची शक्यता

  • आवाजात बदल होणे
  • दात सैल होणे
  • तोंडातून विनाकारण रक्त येणे
  • विनाकारण वजन कमी होणे

ही लक्षणे तोंडातील सौम्य गाठ (बिनाइन ट्यूमर) किंवा शरीराच्या इतर भागातील कर्करोगाचे संकेत असू शकतात. जर ही लक्षणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिली, तर त्यांकडे दुर्लक्ष न करता, ताबडतोब तपासणीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तोंडच्या कर्करोगाचे निदान कसे केले जाते?

तोंडच्या कर्करोगाच्या निदानामध्ये रुग्णाचा वैद्यकीय इतिहास तपासणे, तसेच शारीरिक आणि तोंडाची तपासणी करणे यांचा समावेश होतो. तोंडाच्या तपासणीदरम्यान, तोंडाच्या प्रत्येक भागाची बारकाईने पाहणी केली जाते. त्यात डॉक्टर लाल किंवा पांढरे चट्टे आणि गाठी आहेत का, हे तपासतात. त्यानंतर पुढील चाचण्या केल्या जातात.

ब्रश सायटोलॉजी (Brush Cytology) – या चाचणीमध्ये, संशयास्पद भागातून नमुना घेतला जातो आणि सूक्ष्मदर्शकाखाली त्याची तपासणी केली जाते. त्यात पॅथॉलॉजिस्टद्वारे असामान्य पेशींची उपस्थिती तपासली जाते.
फाइन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी या चाचणीमध्ये सुजलेल्या किंवा बाधित भागातून एका बारीक सुईच्या साह्याने पेशी काढल्या जातात आणि नंतर त्यांची तपासणी केली जाते.

बायोप्सी (Biopsy) – संशयास्पद भागातून ऊतींचा एक छोटा नमुना घेतला जातो. त्यासाठी अनेकदा ‘पंच बायोप्सी’ उपकरणाचा वापर केला जातो — आणि कर्करोगाच्या पेशींची उपस्थिती आहे की नाही, हे ठरविण्यासाठी त्याची तपासणी केली जाते.

इमेजिंग चाचण्या – क्ष-किरण (X-rays), सीटी स्कॅन (CT scans), एमआरआय (MRIs) किंवा पेट स्कॅन (PET scans) यांसारख्या काही इमेजिंग चाचण्या केल्या जाऊ शकतात. कर्करोग किती प्रमाणात पसरला आहे, हे निश्चित करण्यास या चाचण्या मदत करतात.

कोणाला जास्त धोका असतो?

  • कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन करणारे लोक
  • तोंडात तंबाखू धरून ठेवणे
  • मद्यपान
  • धारदार दात किंवा नीट न बसणारे कृत्रिम दात (डेंटचर्स)
  • अयोग्य आहार
  • ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV)
  • रोगप्रतिकार शक्तीची कमतरता
  • सूर्याच्या अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचा संपर्क, ज्यामुळे ओठांचा कर्करोग होऊ शकतो.