Oral Cancer : तोंडात होणाऱ्या कर्करोगाला ‘ओरल कॅन्सर’ किंवा ‘माऊथ कॅन्सर’, असे म्हटले जाते. या प्रकारच्या कर्करोगात तोंडाच्या आत असामान्य पेशींची वाढ होऊ लागते. त्याचा सर्वाधिक परिणाम ओठ, जीभ किंवा गालांच्या आतील भागावर होतो. जर हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यावरच लक्षात आला, तर योग्य उपचारांनी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच याच्या सुरुवातीच्या लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे आहे. जेवताना तोंडात होणारी जळजळ हे तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. विशेषतः तंबाखू किंवा ‘पान मसाला’चे सेवन करणाऱ्यांनी या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये.
जेवणानंतर तोंडात जळजळ होणे : कर्करोगाचे एक लक्षण
डॉक्टरांच्या मते, तोंडाचा कर्करोग होण्यापूर्वी अनेक लोकांना या लक्षणाचा अनुभव येतो. तरीही ते अनेकदा याकडे दुर्लक्ष करतात. ज्या व्यक्ती पान मसाला किंवा सुपारीचे सेवन करतात, त्यांनी या लक्षणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. या लक्षणात तिखट पदार्थ सहन न होणे किंवा खाल्ल्यानंतर तोंडात तीव्र जळजळ होणे यांचा समावेश होतो. त्यामुळे अशा प्रकारचा त्रास झाल्यास त्याला क्षुल्लक समजू नका. किंबहुना, जर तुम्हाला अचानक तोंडात जळजळ जाणवू लागली (जी यापूर्वी कधीच होत नव्हती), तर ते तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
तंबाखू आणि पान मसाल्याचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना काहीही खाताना तोंडात जळजळ होणे हे ‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’ (OSMF)चे लक्षण असू शकते. डॉक्टरांच्या मते, कर्करोगाची सुरुवात अनेकदा याच लक्षणाने होते. त्यात सुरुवातीला तोंडात जळजळ आणि ताण जाणवतो, आणि त्यानंतर हळूहळू तोंड उघडण्यास त्रास होऊ लागतो. ७ ते १० टक्के प्रकरणांमध्ये, OSMF चे रूपांतर पुढे जाऊन मुख-कर्करोगात होऊ शकते.
जेवणानंतर तोंडात तीव्र जळजळ जाणवल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेळेवर निदान झाल्यामुळे त्वरित उपचार सुरू करणे शक्य होते.
‘ओरल सबम्युकस फायब्रोसिस’ ही तोंडात हळूहळू बळावणारी एक समस्या आहे. त्यात पेशींची असामान्य वाढ होऊन तोंडाच्या आत जखमेसारखा भाग तयार होऊ शकतो. ही समस्या प्रामुख्याने तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसून येते.
तोंडच्या कर्करोगाच्या या लक्षणांकडेही लक्ष द्या :
जर तोंडात एखादे व्रण (अल्सर) किंवा जखम झाली असेल आणि ती २-३ आठवड्यांत बरी होत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तोंडात दिसणाऱ्या लाल किंवा पांढऱ्या डागांकडे दुर्लक्ष करू नका.
- तोंडात गाठ किंवा सूज असणे
- तोंडात सतत वेदना होणे
- तोंड पूर्णपणे उघडता न येणे
- तोंडाइतक्याच कानातही वेदना जाणवू शकतात.
- अन्न गिळण्यास अडचण येऊ लागते.
- जबड्यांमध्ये ताठरपणा जाणवतो.
- दात कमकुवत होऊन पडू लागतात.
- आवाजात बदल होऊ लागतात.
