Metabolism slows down after 30: कमकुवतपणा ही वृद्धापकाळातील समस्या आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते हे बदल आपण विचार करतो त्यापेक्षा कितीतरी आधी म्हणजेच वयाच्या तिसाव्या वर्षापासूनच सुरू होतात. मुंबईतील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopaedic Surgeon) डॉ. मनन व्होरा यांनी नुकताच एका सोशल मीडिया व्हिडिओद्वारे याकडे लक्ष वेधले आहे.

स्नायूंची झीज आणि मंदावणारे मेटाबॉलिझम

डॉ. व्होरा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, वयाच्या तिशीनंतर शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होऊ लागते, याला वैद्यकीय भाषेत ‘सार्कोपेनिया’ (Sarcopenia) म्हणतात. ही भारतात सर्वाधिक दुर्लक्षित आरोग्य समस्यांपैकी एक आहे.

“तुम्हाला ते जाणवत नसेल, पण ते आत्ता या क्षणी घडत आहे,” असे डॉ. व्होरा सांगतात. स्नायू कमी झाल्यामुळे शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) मंदावते. परिणामी, तुम्ही आधीइतकेच अन्न खात असलात तरी शरीर त्याची साठवणूक वेगळ्या पद्धतीने (चरबीच्या स्वरूपात) करू लागते आणि वजन वाढू लागते.

‘ऑस्टिओपोरोसिस’चा धोका: हाडे होतात ठिसूळ

स्नायूंच्या बरोबरीने हाडांची घनता (Bone Density) देखील कमी होऊ लागते. याला ‘ऑस्टिओपोरोसिस’ म्हणतात. हे कोणतेही संकेत न देता घडत असल्याने अत्यंत धोकादायक असते. किरकोळ पडण्याने होणारे फ्रॅक्चर हे याचे पहिले लक्षण असू शकते.

वजन उचलणे हाच रामबाण उपाय

या समस्यांशी लढण्यासाठी डॉ. व्होरा ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ (Strength Training) म्हणजेच वजन उचलण्याचे महत्त्व पटवून देतात. ते म्हणतात, “जर हातातील वजन तुमच्या शरीराला आव्हान देत नसेल, तर त्याचा काही उपयोग नाही. आपले शरीर केवळ नवीन आव्हानांशी जुळवून घेते.” हे केवळ शरीर कमावण्यासाठी नसून वयाच्या ५०, ६० आणि ७० व्या वर्षीही तुमचे शरीर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक आहे.

नेमके काय घडते?

इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली इथले वरिष्ठ सल्लागार डॉ. राजू वैश्य यांनी या प्रक्रियेवर अधिक प्रकाश टाकला आहे.

नैसर्गिक प्रक्रिया: ३० वर्षांनंतर दर दशकात सुमारे ३ टक्के ते ५ टक्के स्नायूंची झीज होते. याचे कारण म्हणजे संप्रेरकांमधील बदल (Testosterone, Estrogen), शारीरिक हालचालींचा अभाव आणि प्रथिनांचे (Protein) अपुरे सेवन.

स्नायू आणि हाडांचे नाते: स्नायू आणि हाडे एका युनिटप्रमाणे काम करतात. स्नायू कमकुवत झाले की हाडांवर पडणारा ताण कमी होतो, त्यामुळे हाडांची घनता कमी होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो.

सुरुवात कशी करावी?

डॉ. वैश्य यांनी यासाठी काही सल्ले दिले आहेत.

  • सुरुवात संथ करा: सुरुवातीला शरीराच्या वजनावर आधारित व्यायाम (Body-weight exercises) जसे की स्कॉट्स, वॉल पुश-अप्स करा.
  • नियमितता: आठवड्यातून २-३ वेळा प्रमुख स्नायू गटांसाठी व्यायाम करा.
  • आहार: व्यायामासोबतच पुरेसे प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि नियमित हालचाल गरजेची आहे.