Overactive Bladder: अनेक जण लांबचा प्रवास करताना आधी शौचालय कुठे आहे याचा विचार करतात. चित्रपटगृह, रेस्टॉरंट किंवा मीटिंगमध्येही वॉशरूमजवळची जागा निवडतात. काही जण रात्री अनेकदा लघवीसाठी उठतात किंवा बाहेर जाण्यापूर्वी पाणी पिणं कमी करतात. हळूहळू या सवयी इतक्या सामान्य वाटू लागतात की त्याकडे कोणी लक्षच देत नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर (Overactive Bladder – OAB) या आजाराचे संकेत असू शकतात. हा केवळ जास्त पाणी प्यायल्यामुळे किंवा वाढत्या वयामुळे होणारा त्रास नसून, योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास नियंत्रणात ठेवता येणारी वैद्यकीय समस्या आहे.

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे नेमकं काय?

सामान्यतः मूत्राशय (ब्लॅडर) लघवी साठवून ठेवतो आणि पूर्ण भरल्यानंतर मेंदूला लघवीची सूचना देतो. पण ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमध्ये ही प्रक्रिया बिघडते. मूत्राशयातील स्नायू कमी प्रमाणात लघवी असतानाही आकुंचन पावतात आणि वारंवार लघवीची तीव्र इच्छा निर्माण होते.

अमेरिकेतील National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases (NIDDK) नुसार, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरची प्रमुख लक्षणे अशी आहेत:

  • अचानक आणि आवरता न येणारी लघवीची तीव्र इच्छा
  • दिवसभर वारंवार लघवीला जाणे
  • रात्री अनेकदा लघवीसाठी जाग येणे
  • काही रुग्णांमध्ये शौचालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच लघवी होणे (Urge Incontinence)
  • ‘वयामुळे होतं’ हा मोठा गैरसमज

अनेकांना वाटतं की वयानुसार वारंवार लघवी होणं स्वाभाविक आहे. मात्र, युरोलॉजिस्ट सांगतात की हा सर्वात मोठा गैरसमज आहे. हा त्रास कोणत्याही वयोगटातील महिला आणि पुरुषांना होऊ शकतो. वाढतं वय हा एक जोखीम घटक असला तरी तो एकमेव कारण नाही.

जीवनशैलीचाही होतो परिणाम

काही सवयींमुळे ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरची लक्षणे वाढू शकतात. त्यामध्ये

  • जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी (कॅफिन)
  • मद्यपान
  • कृत्रिम गोड पदार्थ (Artificial Sweeteners)
  • धूम्रपान

हे घटक मूत्राशयाला उत्तेजित करून लक्षणे अधिक तीव्र करू शकतात.

दैनंदिन आयुष्यावर होतो मोठा परिणाम

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरचा त्रास केवळ शारीरिक नसतो, तर मानसिक आणि सामाजिक जीवनावरही परिणाम करतो.

  • प्रवास टाळण्याची वेळ येते.
  • सामाजिक कार्यक्रमांमध्ये जाणं कमी होतं.
  • वारंवार लघवी टाळण्यासाठी पाणी कमी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration) होऊ शकते.
  • रात्री अनेकदा उठल्यामुळे झोप अपुरी राहते.
  • वृद्ध व्यक्तींमध्ये रात्री घाईत बाथरूमला जाताना पडण्याचा आणि हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.
  • ही लक्षणे इतर आजारांचाही इशारा असू शकतात

वारंवार लघवी होणं म्हणजे नेहमीच ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर असतो असं नाही. ही लक्षणे खालील आजारांमुळेही दिसू शकतात.

  • युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)
  • मूत्राशयातील खडे
  • पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथी वाढणे
  • अनियंत्रित मधुमेह

म्हणूनच स्वतःच निष्कर्ष काढण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

निदान कसं केलं जातं?

डॉक्टर सामान्यतः खालील गोष्टींच्या आधारे निदान करतात:

  • लक्षणांची सविस्तर माहिती
  • ब्लॅडर डायरी (दिवसभरातील लघवीची नोंद)
  • शारीरिक तपासणी
  • लघवीची चाचणी
  • आवश्यक असल्यास इतर तपासण्या
  • वेळीच उपचार घेतल्यास मिळू शकतो आराम

तज्ज्ञांच्या मते, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर हा लपवून ठेवण्याचा किंवा ‘वयामुळे होतं’ म्हणून दुर्लक्ष करण्याचा आजार नाही. योग्य वेळी निदान, जीवनशैलीत बदल, ब्लॅडर ट्रेनिंग, पेल्विक फ्लोअर व्यायाम आणि आवश्यकतेनुसार औषधोपचार यामुळे हा त्रास मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आणता येतो. जर तुम्हाला वारंवार लघवीला जाणं, रात्री अनेकदा जाग येणं किंवा अचानक लघवीची तीव्र इच्छा होणं अशी लक्षणे सतत जाणवत असतील, तर ती सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. वेळेत युरोलॉजिस्टचा सल्ला घेतल्यास हा त्रास नियंत्रणात येऊ शकतो आणि जीवनाची गुणवत्ता सुधारू शकते.