Pain During Sexual Intercourse: संबंध हा दाम्पत्याच्या नात्यातील जवळीक, विश्वास आणि आनंद वाढवणारा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, काही जणांना शारीरिक संबंधांच्या वेळी वेदना, अस्वस्थता किंवा त्रास जाणवतो. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटू शकतो; मात्र प्रत्येक वेळी किंवा सतत वेदना होत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण- अशा वेदनांमागे शरीराशी संबंधित, तसेच मानसिक कारणेही असू शकतात.

पहिल्यांदा किंवा बऱ्याच काळानंतर संबंध ठेवताना त्रास होऊ शकतो?

लैंगिक आरोग्य आणि जवळीकविषयक तज्ज्ञ डॉ. अनिता श्याम यांच्या मते, पहिल्यांदा शारीरिक संबंध प्रस्थापित करताना किंवा बराच काळ लैंगिक जवळीक झालेली नसताना काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू शकते. मात्र, हा त्रास सतत होत राहणे किंवा वेदना तीव्र असणे सामान्य मानले जात नाही.

डॉ. श्याम सांगतात की, वेदना सतत किंवा तीव्रतेने होत असतील आणि त्यासोबत रक्तस्राव, असामान्य स्राव किंवा शारीरिक संबंध ठेवण्यात अडचण येत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

वेदना होण्यामागे एक महत्त्वाचे कारण काय?

शारीरिक संबंधांमध्ये अनेकदा महिलांचा आनंद आणि शरीराची तयारी यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही. शरीर आणि मन संबंधांसाठी पूर्णपणे तयार नसताना घाई केल्यास अस्वस्थता वाढू शकते.

यामध्ये पूर्वतयारी म्हणजेच जवळीक वाढवण्यासाठी दिलेला वेळ महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे शरीराला शारीरिक संबंधांसाठी तयार होण्यास मदत होते आणि नैसर्गिक ओलावा वाढू शकतो. त्यामुळे घाई न करता दोघांनीही एकमेकांच्या भावना आणि गरजा समजून घेणे आवश्यक आहे.

केवळ शारीरिक संबंधांवरच लक्ष केंद्रित करू नका

महिलांच्या लैंगिक आनंदामध्ये केवळ योनीमार्गे होणारे संबंधच महत्त्वाचे नसतात. अनेक महिलांना लैंगिक आनंद आणि परमोच्च सुखासाठी बाह्य संवेदनशील भागाला होणारी उत्तेजनाही अधिक महत्त्वाची ठरते. त्यामुळे दोघांनीही एकमेकांच्या आवडी-निवडी आणि आरामाची पातळी समजून घेणे गरजेचे आहे.

शारीरिक संबंध अधिक आरामदायी करण्यासाठी काय कराल?

१. घाई करू नका

शारीरिक जवळीक सुरू करण्यापूर्वी एकमेकांसोबत वेळ घालवा. भावनिक जवळीक आणि विश्वास वाढल्यास तणाव कमी होण्यास मदत होते.

२. जोडीदाराशी मोकळेपणाने बोला

काय आवडते, कशामुळे अस्वस्थ वाटते किंवा कुठे वेदना होतात, याबद्दल जोडीदाराशी स्पष्टपणे बोलणे महत्त्वाचे आहे. संवादाचा अभाव अनेकदा समस्या वाढवू शकतो.

३. आनंदावर लक्ष केंद्रित करा

शारीरिक संबंध म्हणजे केवळ ठरावीक पद्धतीने संबंध प्रस्थापित करणे नव्हे. दोघांनाही आनंददायी आणि आरामदायी अनुभव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वतःवर किंवा जोडीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव ठेवू नका.

४. योग्य वातावरण तयार करा

मनावरील ताण कमी करून शांत आणि आरामदायी वातावरण तयार केल्यास जवळीक अधिक सुखद होऊ शकते.

५. गरजेनुसार नवीन पर्याय समजून घ्या

दोघांची संमती असेल आणि दोघांनाही आरामदायी वाटत असेल, तर शारीरिक जवळीकीतील वेगवेगळे पर्याय समजून घेता येतात. मात्र, कोणतीही गोष्ट जबरदस्तीने करू नये.

सतत वेदना होत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

शारीरिक संबंधांवेळी अधूनमधून किरकोळ अस्वस्थता जाणवणे आणि प्रत्येक वेळी वेदना होणे यांत फरक आहे. सतत वेदना, रक्तस्राव, असामान्य स्राव किंवा संबंध ठेवताना वारंवार अडचण येत असल्यास स्वतःहून कारण ठरवण्याऐवजी स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा संबंधित आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

शारीरिक संबंध हा लाजण्याचा किंवा टाळण्याचा विषय नसून, आरोग्यासंबंधीचा एक भाग आहे. योग्य माहिती, परस्परसंवाद, संमती आणि आवश्यक त्या वेळी वैद्यकीय मदत घेतल्यास लैंगिक आरोग्य अधिक सुरक्षित आणि समाधानकारक ठेवता येते.