Painkiller Kidney Damage: डोकेदुखी, अंगदुखी, ताप किंवा मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी अनेकजण डॉक्टरांचा सल्ला न घेता पेनकिलर घेतात. काहीजण सर्दी, ताप किंवा इतर त्रासांमध्ये स्वतःहून अँटिबायोटिक्सही सुरू करतात. मात्र, अशा औषधांचा वारंवार आणि चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो.

एशियन हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि किडनी डिसीज अँड ट्रान्सप्लांट मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. सागर गुप्ता यांच्या मते, किडनीला सुरुवातीला नुकसान होत असतानाही अनेकदा त्याची स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे समस्या लक्षात येईपर्यंत किडनीच्या कार्यक्षमतेवर मोठा परिणाम झालेला असू शकतो.

पेनकिलरचा किडनीवर कसा परिणाम होतो?

काही पेनकिलर, विशेषतः NSAIDs प्रकारातील औषधे, वारंवार किंवा दीर्घकाळ घेतल्यास किडनीसाठी धोकादायक ठरू शकतात. किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यानंतरही सुरुवातीला वेदना किंवा इतर ठळक लक्षणे जाणवतीलच असे नाही.

काही वेळा नियमित रक्त तपासणी केल्यानंतर क्रिएटिनिनची पातळी वाढलेली दिसते आणि त्यातून किडनीच्या कार्यक्षमतेत काही बिघाड झाल्याचे लक्षात येते. किडनीमध्ये स्वतःला सांभाळण्याची क्षमता असल्यामुळे नुकसान बराच काळ लपून राहू शकते. लक्षणे दिसेपर्यंत काही प्रकरणांमध्ये नुकसान वाढलेले किंवा कायमस्वरूपी झालेले असू शकते.

किती वेळा पेनकिलर घेणे धोकादायक?

किडनी निरोगी असलेल्या व्यक्तीने एखाद्या वेळी एक-दोन दिवस पेनकिलर घेतल्यास सामान्यतः मोठी चिंता करण्याचे कारण नसते. मात्र, अनेक आठवडे नियमितपणे किंवा आठवड्यातून अनेक वेळा पेनकिलर घेण्याची सवय असल्यास धोका वाढू शकतो.

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास हा धोका आणखी वाढू शकतो. याशिवाय वाढते वय, डायबिटीज किंवा आधीपासून किडनीची कार्यक्षमता कमी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कमी पाणी पिणे आणि मद्यपान यामुळेही किडनीवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

अँटिबायोटिक्सही किडनीसाठी ठरू शकतात नुकसानकारक

अँटिबायोटिक्सचा वापरही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे. काही अँटिबायोटिक्स किडनीच्या पेशींवर थेट परिणाम करू शकतात, तर काही औषधांमुळे किडनीमध्ये सूज किंवा दाह निर्माण होऊ शकतो.

विशेष म्हणजे अँटिबायोटिक्सचा उपयोग बॅक्टेरियामुळे होणाऱ्या संसर्गासाठी केला जातो. व्हायरसमुळे होणाऱ्या संसर्गावर त्यांचा उपयोग होत नाही. तरीही सर्दी, फ्लू किंवा सामान्य व्हायरल इन्फेक्शनमध्ये अनेकजण स्वतःहून अँटिबायोटिक्स घेण्यास सुरुवात करतात. अशा औषधांचा दीर्घकाळ बिनसल्ला वापर किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो.

या लोकांनी औषध घेताना विशेष काळजी घ्यावी

  • आधीपासून किडनीचा आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये.
  • ज्येष्ठ नागरिकांनी औषधांचा वापर डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार करावा.
  • डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून पेनकिलर किंवा इतर औषधे घेणे टाळावे.
  • शरीरात वारंवार पाण्याची कमतरता होत असल्यास औषध घेताना विशेष काळजी घ्यावी.
  • हार्ट फेल्युअर किंवा लिव्हरचा आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • गर्भवती महिला आणि लहान मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे देऊ नयेत.

डॉक्टरांचा सल्ला का महत्त्वाचा?

वारंवार पेनकिलर घेण्याची गरज भासत असेल, तर केवळ औषध घेऊन वेदना दाबण्याऐवजी त्यामागचे कारण शोधणे महत्त्वाचे आहे. कोणतेही औषध किती प्रमाणात आणि किती दिवस घ्यायचे, हे व्यक्तीची प्रकृती आणि आजारानुसार बदलू शकते.

त्यामुळे पेनकिलर किंवा अँटिबायोटिक्स स्वतःहून घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि गरजेनुसार किडनीची तपासणी करून घेणे अधिक सुरक्षित ठरते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)