Pancreatic Cancer: स्वादुपिंड हा पचनासाठी आवश्यक असलेली विकरे आणि इन्सुलिनसारखी संप्रेरके तयार करणारा एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. जेव्हा स्वादुपिंडातील पेशींची अनियंत्रितपणे वाढ होऊ लागते, तेव्हा स्वादुपिंडाचा कर्करोग होऊ शकतो. सुरुवातीच्या टप्प्यावर याची गंभीर लक्षणे सहसा दिसून येत नाहीत, त्यामुळे याला ‘सायलेंट कॅन्सर’ (निःशब्द कर्करोग), असेही म्हटले जाते. तरीही, योग्य वेळी निदान झाल्यास यावर उपचार करणे शक्य असते. सुरुवातीची धोक्याची लक्षणे वेळीच ओळखल्यास वेळेवर उपचार करणे शक्य होते. आम्ही अशा काही लक्षणांवर प्रकाश टाकत आहोत, जी सहजपणे ओळखता आली पाहिजेत.

स्वादुपिंडाचा कर्करोग कसा होतो?

जेव्हा स्वादुपिंडाच्या पेशींमधील डीएनएमध्ये उत्परिवर्तन घडून येते आणि त्यामुळे कर्करोगाच्या गाठी तयार होतात, तेव्हा हा आजार उद्भवतो. मात्र, या आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करणे कठीण होऊ शकते. कारण- याची लक्षणे अनेकदा सामान्य वाटतात. ही लक्षणे कर्करोगाचे निदान होण्यापूर्वी सुमारे एक वर्ष आधी दिसू लागतात, ज्यामुळे योग्य वेळी खबरदारी घेणे शक्य होऊ शकते.

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची लक्षणे

  • कावीळ
  • सतत पोटदुखी
  • वजन कमी होणे
  • अशक्तपणा
  • थकवा
  • त्वचेला खाज सुटणे

स्वादुपिंडाच्या कर्करोगाची सुरुवातीची लक्षणे

पोटात किंवा पाठीत सतत वेदना

जर पोटाच्या वरच्या भागात किंवा पाठीत दीर्घकाळ वेदना होत असतील आणि औषधोपचारांचा त्यावर काहीच परिणाम होत नसेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पोटाच्या वरच्या भागात सतत वेदना होत असतील, तर त्याचे कारण पित्ताशयातील खडे असू शकते.

अचानक वजन कमी होणे

कोणताही आहार किंवा व्यायाम न करता वेगाने वजन कमी होणे हे स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. जर तुमचे वजन कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय कमी होत असेल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. काही वेळा वजन कमी होणे धोकादायक ठरू शकते.

भूक मंदावणे

जर तुम्हाला दीर्घकाळपर्यंत भूक लागत नसेल किंवा थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. भूक कमी होण्याची विविध कारणे असू शकतात; कधी कधी केवळ अति थकव्यामुळेही असे होऊ शकते, जी बाब तुम्ही दुर्लक्षित करू नये.

कावीळ

डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, गडद रंगाची लघवी आणि फिकट रंगाची विष्ठा ही पित्तनलिकेतील अडथळ्याची लक्षणे असू शकतात. हा अडथळा स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी संबंधित असू शकतो. या प्रक्रियेदरम्यान रक्त पातळ होऊ लागते
हा बदल हळूहळू लक्षात येतो.

पचनाच्या समस्या जाणवणे

पोटाशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. वारंवार होणारा गॅस, अपचन, मळमळ, उलट्या किंवा तेलकट विष्ठा ही स्वादुपिंड योग्यरीत्या काम करीत नसल्याची लक्षणे असू शकतात. जर तुम्हाला पोटाशी संबंधित अशा काही समस्या जाणवत असतील, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.