Girl Friendly Parenting Tips : मुली घराच्या सुखाचा सर्वांत सुंदर भाग असतात. त्या घरात आनंद घेऊन येतात. मुलगी ही वडिलांचा अभिमान, आईची मैत्रीण आणि भावाची कायमची साथीदार असते. पण, मुलीचे संगोपन योग्य प्रकारे करणे गरजेचे असते. तिच्यावर केवळ प्रेमच करू नका, तर ती मोठी होत असताना तिला काही गोष्टींची समज दिली पाहिजे.
२ ते १२ वर्षे हा मुलींच्या विकासाचा सर्वांत महत्त्वाचा काळ असतो. या काळात, विशेषतः मुलींना योग्य संगोपन, संरक्षण आणि भावनिक आधार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला लहान मुलगी असेल, तर तुम्ही तिला खालील पाच गोष्टींची योग्य ती माहिती दिली पाहिजे. जर तुम्ही या पाच गोष्टींकडे लक्ष दिले, तर तुमची मुलगी केवळ सुरक्षितच राहणार नाही, तर ती आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासूदेखील बनेल.
१) बरोबर आणि चूक यातील फरक शिकवा
मुलींना लहानपणापासूनच चांगला आणि वाईट स्पर्श याबद्दलची शिकवण देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुलींनाही लहानपणापासूनच या गोष्टी शिकवायला सुरुवात करणे अधिक महत्त्वाचे आहे. कोणतीही अस्वस्थ करणारी परिस्थिती उद्भवल्यास तिने तत्काळ आपल्या पालकांना म्हणजे तुम्हाला सांगणे गरजेचे आहे हे तिला समजावून सांगा. त्यासाठी घरात तिला आश्वासक वाटेल असे योग्य आणि खेळीमेळीचे वातावरण ठेवा.
२) सुरक्षेला प्राधान्य द्या
तुमच्या मुलीला अनोळखी लोकांपासून अंतर राखून बोलायला, वागायला शिकवा. शाळेत आणि बाहेर जाताना सावधगिरी बाळगण्याची सवय लावा. तिच्याकडून घरातील आई-वडिलांचे आणि महत्त्वाचे फोन नंबर पाठ करून घ्या. सुरक्षिततेबद्दलच्या जागरूकतेमुळे मुलींचा आत्मविश्वासही वाढतो.
३) खुल्या चर्चेसाठी वातावरण तयार करा
तुमच्या मुलीसाठी घरात असे वातावरण तयार करा की, ती तुमच्याबरोबर सर्व काही शेअर करू शकेल. मुली अनेकदा भीती किंवा अपमानामुळे बऱ्याचशा गोष्टी लपवतात. त्यांना सामाजिक कलंकाची भीती न दाखवता, तिच्यात तुमच्याविषयी आपलेपणाची भावना निर्माण होऊ द्या, जेणेकरून ती तुमच्याबरोबर तिच्या भावना मोकळेपणाने व्यक्त करू शकेल.
४) शिक्षण आणि स्वावलंबनावर लक्ष केंद्रित करा
तुमच्या मुलींना त्यांच्या आवडीनुसार उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करा. अभ्यासाबरोबर त्यांना इतर कौशल्येही शिकवा. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्यासाठी प्रोत्साहित करा.
५) आत्मविश्वास वाढवा
तुमच्या मुलीच्या लहान-लहान यशाचे कौतुक करा. तिला तिची मते व्यक्त करण्याची संधी द्या. तिची इतरांशी तुलना करणे टाळा. आत्मविश्वासू मुलगी भविष्यात एक कणखर व्यक्ती बनते.
६) तुम्ही कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे?
मुलाचे संगोपन करताना, त्यांना प्रत्येक गोष्ट समजून सांगावी; धमकावून वा भीती घालून नाही. त्यांचा सोशल मीडिया आणि स्क्रीन टाइम लिमिटेड करा. तसेच, तुमच्या मुलीच्या मित्र-मैत्रिणी कोण आहेत, त्यांचे फॅमिली बॅकग्राऊंड कसे आणि तिच्या सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवा.
