Parenting Tips : घरात लहान मूल असेल तर त्याला खाऊ घालणे ही पालकांसाठी एक मोठी कसरतीचे काम असते. हातात जेवणाचे ताट घेऊन मुलाच्या मागे धावणारी आई, टीव्हीवर कार्टून दाखवून किंवा विविध खेळणी देऊन त्याला जेवण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत असलेले दृश्य आजकाल प्रत्येक घरात सहज पाहायला मिळते. कधीकधी लहान मुलांना जेवण भरवण्यात इतका वेळ जातो की पालक स्वतःच थकून जातात आणि हार मानतात. इतकेच नाही तर यामुळे पालकांची चिडचिड होते आणि ते मुलांवर रागावतात. पण मुलांना खाऊ घालताना तुम्ही खालील ६ सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचा ९० टक्के त्रास कमी होईल आणि मुले आनंदाने जेवतील.

१) मुलांवर अजिबात जबरदस्ती करू नका

पालकांना अनेकदा असे वाटते की, मुलाला रागावल्याने किंवा जबरदस्ती केल्याने ते शांत होईल आणि खायला लागेल, पण याचा मुलाच्या मनावर उलट परिणाम होतो. मुलांवर जेवणासाठी दबाव टाकल्याने त्यांची चिडचिड वाढते आणि त्यांच्या मनात अन्नाबद्दल भीती निर्माण होऊ शकते. जर तुमचे मूल जेवण्यास नकार देत असेल, तर त्याला रागावण्याऐवजी प्रेमाने आणि हळुवारपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. जर त्याचे पोट भरले असेल किंवा त्याची इच्छा नसेल, तर जबरदस्ती न करता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा.

२) जेवण चविष्ट आणि आकर्षक बनवा

लहान मुलांना चवीला स्वादिष्ट आणि दिसायला आकर्षक असलेले पदार्थ जास्त आवडतात. जर तुमची मुले लहान असतील, तर तुम्ही त्यांना क्रिएटिव्हपणे (Creativity) पदार्थ सजवून खायला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला मुलाला चपाती किंवा पराठा खाऊ घालायचा असेल, तर तो वेगवेगळ्या कार्टूनच्या किंवा चांदणी-गोलाकार आकारांमध्ये बनवा. तसेच, ताटात रंगीबेरंगी फळे आणि भाज्या वेगवेगळ्या आकारात मांडून द्या. जेव्हा मुलांना ताटातील अन्न मजेशीर वाटेल, तेव्हा ते स्वतःहून खाण्यासाठी प्रेरित होतील.

३) खाण्यापिण्याचे रुटीन (Routine) ठरवा

जर तुमच्या मुलाची खाण्यापिण्याची आणि झोपण्याचे रूटीन ठरलेले नसेल, तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या भुकेवर होतो. कधी लवकर तर कधी खूप उशिरा जेवल्याने त्यांच्या खाण्याच्या सवयी बिघडतात. यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांची एक निश्चित वेळ ठरवून घ्या. असे केल्याने मुलाचे ‘बायोलॉजिकल क्लॉक’व्यवस्थित बसेल आणि ती वेळ होताच त्यांना आपोआप भूक लागेल.

४) मोबाईल आणि टीव्हीची सवय बंद करा

आजकालची मुलं टीव्ही किंवा मोबाईल फोन स्क्रीनशिवाय जेवायला बसतच नाहीत. सुरुवातीला पालकांना आपल्या मुलांना खाऊ घालण्याचा हा एक सोपा मार्ग वाटतो, पण नंतर हीच सवय मोठ्या अडचणीचे कारण बनते. जेव्हा मूल सतत स्क्रीनकडे बघत जेवते, तेव्हा आपण नक्की काय आणि किती जेवलो आहोत याचे त्याला भान राहत नाही. यासाठी जेवताना संपूर्ण कुटुंबाने टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवून एकत्र जेवायला बसण्याचा नियम बनवा. यामुळे मुलाची अन्नाबद्दलची आवड वाढेल आणि कुटुंबासह नातेही घट्ट होईल.

५) मुलांना स्वतःहून जेवण्याची संधी द्या

तुमचे मूल लहान असेल तर जेवताना त्यांच्याकडून अन्न खाली सांडणे स्वाभाविक आहे. सुरुवातीला पसारा झाला तरी चालेल, पण त्यांना स्वतःच्या हाताने खाण्याचा प्रयत्न करू द्या. हा त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा (Learning Process) एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा मूल स्वतःच्या हाताने खाते, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो आणि त्याला अन्नाबद्दल उत्सुकता वाटते. या साध्या कृतीमुळे त्यांच्या शारीरिक हालचालींच्या कौशल्यांचा (Motor Skills) विकास होण्यासही मदत होते.

६) ताटात एकाच वेळी जास्त अन्न वाढू नका

जेव्हा तुम्ही मुलाच्या ताटात एकाच वेळी भरपूर अन्न वाढता, तेव्हा ते पाहूनच मूल अस्वस्थ होते आणि जेवण्यास नकार देते. म्हणूनच सुरुवातीला नेहमी अगदी थोड्या प्रमाणात जेवण वाढा. एकदा मुलाने ते संपवले की, त्याचे कौतुक करून त्याला हवे असल्यास पुन्हा द्या. यामुळे मुलावर जेवण संपवण्याचा मानसिक दबाव येत नाही आणि ते शांतपणे, आनंदाने जेवू शकते.