Parenting Tips: प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलाला चांगल्या सवयी लागाव्यात आणि त्यांनी स्वावलंबी बनावे. परंतु, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत नकळत पालकांकडून काही अशा चुका होतात, ज्यामुळे मुलं हट्टी होतात. जर तुमचे मूल प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करत असेल, ओरडत, रडत असेल किंवा तुमचे ऐकत नसेल, तर यामागे तुमच्याच काही सवयी कारणीभूत ठरु शकतात. चला तर मग जाणून घेऊया पालकांच्या अशा सवयींबद्दल ज्या मुलांमधील हट्टीपणा नकळत वाढवत आहेत.
१. गरजेपेक्षा जास्त पर्याय (Options) देणे
आजच्या काळात मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आनंदी ठेवण्यासाठी पालक प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीमध्ये त्यांना पर्याय देऊ लागतात. मुलांना आवडीचा अधिकार देणे चांगली गोष्ट आहे, पण गरजेपेक्षा जास्त पर्याय दिल्याने मुले गोंधळात पडतात. जेव्हा मुलांना नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे करण्याची सवय होते, तेव्हा त्यांना वाटते की, प्रत्येक निर्णयाचे मालक तेच आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा खऱ्या आयुष्यात त्यांना त्यांच्या आवडीची गोष्ट मिळत नाही, तेव्हा ते ते सहन करू शकत नाहीत आणि हट्ट करू लागतात.
२. कोणतीही ठराविक रूटीन (Fixed Routine) नसणे
एक ठराविक रूटीन असेल तर मुलांना माहित असते की पुढे काय होणार आहे. यामुळे त्यांचे मन शांत राहते आणि त्यांना सुरक्षित वाटते. परंतु, जेव्हा कोणतीही निश्चित रूटीन नसते, तेव्हा मुले गोंधळून जातात. रूटीन नसल्यामुळे जेव्हा पालक अचानक मुलांना एखादे काम करण्यास सांगतात, तेव्हा मुले त्याला विरोध करतात. ज्याला पालक हट्टीपणा समजतात, तो खरं तर मुलांचा गोंधळ किंवा असुरक्षिततेची भावना असते.
३. एकच गोष्ट वारंवार करणे
जर तुम्ही मुलांना एकच गोष्ट वारंवार सांगत असाल, तर मुलांच्या हे लक्षात येते की पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस काम करण्याची काहीच गरज नाही. आई किंवा बाबा जोपर्यंत रागावणार नाहीत किंवा ओरडणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला काही करायचे नाही, हे ते ओळखून असतात. ही सवय मुलांना गोष्टी टाळण्याची आणि हट्टी बनण्याची शिकवण देते. म्हणूनच नेहमी स्पष्ट शब्दांत सांगा आणि एक गोष्ट एक किंवा दोन वेळापेक्षा जास्त बोलू नका.
४. ‘नाही’ म्हटल्यानंतरही हट्ट पूर्ण करणे
ही जवळपास प्रत्येक घरातील कथा आहे. एखाद्या खेळण्यासाठी किंवा चॉकलेटसाठी पालक आधी तर स्पष्ट नकार देतात, परंतु जसे मूल रडायला लागते, पाय आपटते किंवा मॉलमध्ये सर्वांसमोर तमाशा करते, तेव्हा पालक लाज किंवा डोकेदुखी टाळण्यासाठी त्याला ती गोष्ट घेऊन देतात. यामुळे मुलाला समजते की, जर आपण जास्त जोराने रडलो किंवा हट्ट केला, तर आपले म्हणणे ऐकले जाईल. मूल यालाच आपले शस्त्र बनवते आणि स्वतःच्या सर्व गोष्टी हट्टाने मान्य करून घेते.
