आठ वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मंकीपॉक्स हा आजार होण्याची शक्यता अधिक असल्याने या गटाला उच्च जोखीम गट मानले जावे, असे एका संशोधनाच्या अहवालात म्हटले आहे. द पेडियाट्रिक इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, आतापर्यंत या आजाराचे संक्रमण झालेल्या मुलांची संख्या कमी असली, तरीही या वयोगटातील मुलांना मंकीपॉक्स होण्याचा धोका सर्वाधिक आहे. या मुलांमध्ये मंकीपॉक्सची गुंतागुंत आणि इतर गंभीर परिणामांना घेऊन चिंता व्यक्त केली जात आहे.
स्वित्झर्लंडमधील फ्रिबोर्ग विद्यापीठातील डॉ. पेट्रा झिमरमन आणि मेलबर्न विद्यापीठातील निगेल कर्टिस सांगतात की “उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्येही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.” मुख्यतः कमी उत्त्पन्न असलेल्या देशातील माहितीच्या आधारे संशोधक म्हणतात, ८ वर्षांखालील मुलांना या गंभीर जीवाणूचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. या मुलांना जखमेच्या माध्यमातून, तसेच डोळे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो.
ऑगस्ट महिन्यापर्यंत जगभरात मंकीपॉक्सची अंदाजे ४७ हजार प्रकरणे नोंदवण्यात आली. यातील केवळ २११ प्रकरणे १८ वर्षांखालील मुले आणि किशोरवयीन मुलांची होती. या विषाणूने बाधित रुग्ण योग्य काळजी घेतल्यास बरे होतात. तथापि, गंभीर प्रकरणांमध्ये विशिष्ट उपचार आवश्यक आहे. यामध्ये ८ वर्षांखालील मुले आणि अंतर्निहित त्वचेची स्थिती असणाऱ्या रुग्णांचा विशेष समावेश असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
इतर गटांमध्ये गरोदर महिला, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण, तसेच तोंड, डोळे आणि जननेंद्रियांजवळ एक्झामा किंवा मंकीपॉक्स पुरळ असलेले लोक यांचा समावेश होतो. स्मॉलपॉक्स लसीकरण मंकीपॉक्स रोखण्यासाठी प्रभावी मानण्यात आले असले तरीही त्याच्या संरक्षणाचा कालावधी अद्याप अज्ञात आहे.