पालकांनो लक्षात ठेवा! जर तुम्ही घरामध्ये मुलांच्या समोर नियमित धूम्रपान करत असाल तर तुमच्या मुलांमध्येही निकोटिनची पातळी वाढते आहे. तुमच्या हातावर असलेल्या तंबाखूमधील निकोटिनचा संपर्क घरातील सर्व वस्तूंशी येतो, त्यामुळे मुलांमध्येही त्याचे प्रमाण वाढत असल्याचा इशारा एका नव्या अभ्यासात करण्यात आला आहे.

अमेरिकेतील सिनसिनाटी या मुलांच्या आरोग्य केंद्रातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. यासाठी प्रारंभीच्या अभ्यासात २५ मुलांचा अभ्यास करण्यात आला. मात्र अधिक माहिती मिळविण्यासाठी ७०० पेक्षा अधिक मुलांची माहिती घेत विश्लेषण करण्यात आले.

धुरामुळे श्वास घेण्यात अडचण निर्माण होत असलेल्या मुलांची आपत्कालीन कक्षामध्ये तपासणी करण्यात आली. इतर व्यक्ती धूम्रपान करत असल्यामुळे सरासरी पाच वर्षांपासून पुढे वय असणारी मुले असुरक्षित दिसून आली. या सर्व मुलांचे पालक धूम्रपान करत होते.

संशोधकांनी मुलांच्या हातावरील निकोटिन तपासण्यासाठी खास हातपुसणे तयार केले होते. तसेच कोटिनिनची पातळी समजण्यासाठी लाळेचे नमुने घेतले होते.

सहभागी झालेल्या सर्व मुलांचे पालक धूम्रपान अथवा तंबाखूशी संबंधित उत्पादन वापरत असल्यामुळे या मुलांच्या हातावरही निकोटिन आढळून आले. तसेच या वेळी लाळेमध्ये कोटिनिनही आढळून आले.

याचा मुलांवर परिणाम आढळून आला असून, मुलांच्या आरोग्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. खासकरून मुलांमध्ये श्वसन आणि कान याच्याशी संबंधित आजार वाढल्याचे आणि काहींमध्ये गंभीर दमा आणि इतर आजार होत असल्याचे अभ्यासात आढळून आले.

पालकांनी आपल्या मुलाच्या समोर धूम्रपान करताना अनेक वेळा विचार करायला हवा. घरातील धूळ आणि पृष्ठभाग हे कीटकनाशके व इतर विषारी पदार्थ तरुणांमध्ये पसरण्याचे महत्त्वाचे स्रोत आहेत.

मुलांमध्ये आजारांचे प्रमाण वाढू नये यासाठी पालकांनी मुलांसोबत धूम्रपान करू नये, तसेच घरामध्ये धूम्रपानबंदी करावी, असा निष्कर्ष संशोधकांमध्ये मांडण्यात आला आहे.

हे संशोधन ‘टोबॅको कंट्रोल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.