Understanding High-Functioning Depression : ऑफिसमध्ये नेहमी व्यस्त, टीममध्ये सर्वात जास्त हसणारा, सोशल मीडियावर सतत आनंदी दिसणारा एखादा सहकारी तुम्ही पाहिला आहे का? बाहेरून सर्व काही सुरळीत असलेला हा माणूस आतून मात्र रिकामा, थकलेला आणि भावनिकदृष्ट्या झिजलेला असू शकतो. हीच ती मानसिक अवस्था ज्याला मानसशास्त्रात “हाय-फंक्शनिंग डिप्रेशन” असे म्हटले जाते.

ही अवस्था पारंपरिक डिप्रेशनसारखी उघडपणे दिसत नाही. व्यक्ती आपली जबाबदारी पार पाडत राहते, कामात प्रावीण्य राखते, सामाजिक आयुष्यतही सक्रिय दिसते; पण अंतर्मनात सतत उदासी, अपूर्णतेची भावना आणि थकवा दाटून आलेला असतो.

हाय-फंक्शनिंग डिप्रेशन म्हणजे नेमके काय? (What is High-Functioning Depression)

मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, “ही अवस्था वैद्यकीय भाषेत “डिस्थायमिया” किंवा “पर्सिस्टंट डिप्रेसिव्ह डिसऑर्डर” म्हणून ओळखली जाते. यात उदासी, कमी आत्मसन्मान, निरुत्साह आणि मानसिक थकवा दीर्घकाळ टिकून राहतो , अनेकदा दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ.

Award Banner

फरक एवढाच की, ही व्यक्ती आपल्या भावना लपवण्यात पारंगत असते. त्यामुळे बाहेरून ती यशस्वी, आत्मविश्वासपूर्ण आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय दिसते. म्हणूनच याला “स्मायली डिप्रेशन” असेही म्हटले जाते.

लक्षणे दिसत नाहीत, पण जाणवतात (Subtle Yet Persistent Symptoms)

सामान्य डिप्रेशनमध्ये व्यक्ती सामाजिक आयुष्यापासून दूर जाते; परंतु हाय-फंक्शनिंग डिप्रेशनमध्ये व्यक्ती सर्व काही सुरळीत सांभाळताना दिसते. मात्र, एकांतात ती भावनिकदृष्ट्या कोलमडलेली असते.

अशा अवस्थेत परफेक्शनिझमची अतिरेक प्रवृत्ती, सामाजिक भेटीनंतर प्रचंड थकवा, झोप व आहाराच्या सवयींमध्ये बदल, स्वतःच्या यशाबद्दल समाधान न वाटणे, सतत ‘रोबोट’प्रमाणे काम करत राहणे, ही लक्षणे दिसू शकतात. व्यक्तीला आनंदाची खरी अनुभूती होत नाही; ती केवळ ‘कार्यरत’ राहते.

कोणांना जास्त धोका? (Who Is at Higher Risk)

शहरी जीवनशैली, करिअरचा दबाव, स्वतःला सिद्ध करण्याची धडपड आणि सोशल मीडियावरील तुलना , या सगळ्यांचा तरुणांवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः काम आणि कुटुंब यांचा समतोल साधताना महिलांमध्ये हा ताण अधिक आढळतो.
नोकरीची असुरक्षितता, आर्थिक जबाबदाऱ्या, नातेसंबंधातील ताण, अपयशाची भीती , हे सर्व घटक मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. काही प्रकरणांमध्ये आनुवंशिकता, दीर्घकालीन ताण (क्रॉनिक स्ट्रेस), आघात (ट्रॉमा) आणि व्यक्तिमत्त्वातील विशिष्ट गुणधर्मही कारणीभूत ठरतात.

मेंदूतील रासायनिक बदलांची भूमिका (Role of Neurotransmitters and Hormones)

सेरोटोनिन, डोपामिन, नॉरएपिनेफ्रिन, कोर्टिसोल आणि मेलाटोनिन यांसारख्या न्यूरोट्रांसमीटर व हार्मोन्सचा असमतोल मूड, झोप, ऊर्जा आणि एकाग्रतेवर परिणाम करतो. सेरोटोनिनची पातळी घटल्यास व्यक्तीला इच्छाशक्ती असूनही आनंद जाणवत नाही. हा केवळ ‘मनाचा थकवा’ नसून जैविक बदलांशी निगडित स्थिती असते.

आत्महानीचा धोका किती? (Risk of Self-Harm)

लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. दीर्घकाळ लपलेली उदासी आत्महानीच्या विचारांना जन्म देऊ शकते. अशा वेळी तातडीने व्यावसायिक मदत घेणे आवश्यक आहे. भारत सरकारची ‘किरण’ मानसिक आरोग्य हेल्पलाईन १८००-५९९-००१९ या क्रमांकावर उपलब्ध आहे.

निदान कसे केले जाते? (How Is It Diagnosed)

मानसशास्त्रज्ञ रुग्णाच्या मूड, झोप, भूक, ऊर्जा, आत्मसन्मान आणि दैनंदिन कार्यक्षमतेबद्दल सविस्तर चर्चा करतात. दोन वर्षांहून अधिक काळ उदासी व रिकामेपणाची भावना कायम असल्यास डिस्थायमियाची शक्यता तपासली जाते. PHQ-9, HAM-D आणि BDI यांसारख्या स्क्रीनिंग चाचण्या लक्षणांची तीव्रता मोजण्यात मदत करतात.

उपचार आणि प्रतिबंध (Treatment and Prevention)

ध्यानधारणा, समुपदेशन (काउन्सेलिंग), संज्ञानात्मक वर्तणूक थेरपी (CBT) आणि आवश्यक असल्यास औषधोपचार प्रभावी ठरतात. कुटुंबीय व मित्रांचे सहकार्यही महत्त्वाचे असते. भावना नाकारणे थांबवणे, “मी ठीक आहे” हा मुखवटा काढून टाकणे, काम-वैयक्तिक आयुष्य यात संतुलन राखणे, पुरेशी झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम , या सवयी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सोशल मीडियावरील तुलना टाळणे आणि वेळोवेळी डिजिटल ब्रेक घेणेही आवश्यक आहे.

निष्कर्ष (Conclusion)

हाय-फंक्शनिंग डिप्रेशन हा शांत पण गंभीर मानसिक ताण आहे. तो व्यक्तीला कार्यक्षम ठेवतो; पण भावनिकदृष्ट्या थकवतो. चेहऱ्यावरच्या हसऱ्या भावांमागे दडलेली ही वेदना ओळखणे अवघड असते. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी मदत घेणे आणि सपोर्ट सिस्टीम मजबूत ठेवणे हेच मानसिक आरोग्य जपण्याचे खरे पाऊल आहे.