Peeing Signs of Disease: लघवीशी संबंधित आरोग्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ होणे किंवा लघवीची धार कमी असणे अशा तक्रारींना बरेच जण किरकोळ समजतात किंवा वाढत्या वयाचा भाग मानतात.
पण, ही लक्षणे शरीरात सुरू असलेल्या एखाद्या गंभीर आजाराची चाहूलही असू शकते. वेळेत लक्ष दिले नाही तर छोटी समस्या पुढे मोठ्या आजारात बदलू शकते. चला तर मग, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
तज्ज्ञ काय सांगतात?
डॉ. माधव सान्जगिरी यांनी मनीकंट्रोलशी बोलताना सांगितले की, सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळेत उपचार घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज तपासणी आणि उपचारांच्या आधुनिक पद्धतींमुळे अनेक लघवीसंबंधी आजार सुरुवातीच्या टप्प्यातच नियंत्रणात ठेवता येतात.
उदाहरणार्थ, साध्या वाटणाऱ्या लघवीच्या मार्गातील इन्फेक्शन वेळेत बरे केले नाही तर ते मूत्राशयातून किडनीपर्यंत पसरू शकते, त्यामुळे किडनीमध्ये गंभीर संसर्ग होऊ शकतो आणि काही वेळा सेप्सिससारखी जीवघेणी अवस्थादेखील निर्माण होऊ शकते.
याची लक्षणे कोणती असतात?
कधी कधी किडनीचा आजार बराच काळ कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता वाढत राहतो. लघवी कमी होणे किंवा लघवीत रक्त दिसणे ही सुरुवातीची चिन्हे असू शकतात. क्रॉनिक किडनी आजार अनेकदा तेव्हा लक्षात येतो, जेव्हा किडनीचे बरेच नुकसान झालेले असते.
पुरुषांमध्ये लघवी सुरू करताना अडचण येणे, थेंबथेंब लघवी होणे किंवा रात्री वारंवार लघवीसाठी उठावे लागणे हे प्रोस्टेटशी संबंधित समस्येचे संकेत असू शकतात. अनेकदा हे वाढत्या वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष केले जाते, पण काही वेळा हे इन्फेक्शन किंवा कॅन्सरचेही लक्षण असू शकते.
महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?
महिलांमध्ये लघवी आवरता न येणे किंवा अचानक जोरात लघवी लागणे हे अनेकदा वयानुसार होते असे मानले जाते. पण, हे मूत्राशय नीट काम न करणे किंवा नसांशी संबंधित समस्येमुळेही होऊ शकते. याकडे दुर्लक्ष केल्यास रोजच्या आयुष्यावर, झोपेवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
लघवी करताना वेदना होणे किंवा लघवीत रक्त दिसणे ही लक्षणे खडे (स्टोन) असल्याचे संकेत असू शकतात. किडनी किंवा मूत्राशयातील खडे मोठे झाले तर अडथळा निर्माण होऊ शकतो, संसर्ग होऊ शकतो आणि तीव्र वेदना होऊ शकतात.
हृदयाशी संबंधित समस्या असू शकते
रात्री वारंवार लघवी लागणे हे मधुमेह किंवा हृदयाशी संबंधित आजाराचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. रक्तातील साखर वाढली की किडनीला जास्त काम करावे लागते, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.
तज्ज्ञांचे मत आहे की लघवीशी संबंधित लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत तपासणी केल्यास उपचार सोपे, कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक होऊ शकतात. शरीर देत असलेले संकेत समजून डॉक्टरांचा सल्ला घेणे हे फक्त मूत्राशयासाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

