Period Problems: महिलांना मासिक पाळी येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, एकाच महिन्यात दोनदा पाळी आल्यास अनेक महिला चिंतेत पडतात. असे का होते आणि ही परिस्थिती सामान्य आहे की चिंताजनक, याबाबत अपोलो क्रेडलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. मीता वर्मा यांनी माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मते, महिन्यातून दोनदा रक्तस्राव होणे नेहमीच चिंतेचे कारण नसते. मात्र, ते सामान्य मासिक पाळीचे चक्र आहे की अनियमित रक्तस्राव, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
मासिक पाळीचे चक्र अपेक्षेपेक्षा कमी कालावधीत पुन्हा सुरू होत असल्यास त्याला पॉलिमेनोरिया (Polymenorrhea) म्हणतात. दोन पाळींमधील अंतर कमी असणे किंवा पाळीच्या चक्रादरम्यान रक्तस्राव होणे, यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. दोन पाळींमधील अंतर २० दिवसांपेक्षा कमी असेल किंवा वारंवार पाळीच्या मधल्या काळात रक्तस्राव होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. पाळीच्या चक्रादरम्यान होणाऱ्या अशा रक्तस्रावाला इंटरमेनस्ट्रुअल ब्लीडिंग (Intermenstrual Bleeding) म्हणतात. यामध्ये दुसऱ्यांदा होणारा रक्तस्राव कमी प्रमाणात असू शकतो. यालाच स्पॉटिंग असेही म्हणतात. स्पॉटिंग म्हणजे अगदी कमी प्रमाणात होणारा रक्तस्राव, जो नेहमीच्या मासिक पाळीसारखा नसतो.
महिन्यातून दोनदा पाळी आल्यास कधी काळजी करण्याची गरज नसते?
डॉक्टरांच्या मते, काही परिस्थितींमध्ये मासिक पाळीच्या चक्रात तात्पुरते बदल होऊ शकतात. उदाहरणार्थ, तणाव, झोपेच्या वेळापत्रकात झालेला बदल, लांबचा प्रवास, जेट लॅग, वजनात अचानक झालेला बदल किंवा अतिव्यायाम यांचा अंडाशयातील हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होऊन अपेक्षेपेक्षा लवकर रक्तस्राव होण्याची शक्यता असते.मासिक पाळीचे चक्र साधारण २१ ते ३५ दिवसांचे असू शकते. त्यामुळे एखाद्या महिलेचे पाळीचे चक्र २१ किंवा २४ दिवसांचे असेल आणि संबंधित महिना ३१ दिवसांचा असेल, तर त्या महिन्यात दोनदा पाळी येऊ शकते. अशा वेळी केवळ महिन्यातून दोनदा पाळी आली म्हणून घाबरण्याची गरज नाही. मात्र, रक्तस्रावाचे प्रमाण, पाळीच्या चक्रातील बदल आणि इतर लक्षणे यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
महिन्यातून दोन ते तीन वेळा स्पॉटिंग का होते?
महिन्यातून दोन ते तीन वेळा स्पॉटिंग होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आपत्कालीन गर्भनिरोधक गोळ्या किंवा काही हार्मोनल औषधे घेतल्यामुळे मासिक पाळीच्या चक्रात बदल होऊन स्पॉटिंग होऊ शकते. तसेच, मासिक पाळीच्या चक्राच्या मध्यावर स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही महिलांना हलका रक्तस्राव होऊ शकतो. याला ओव्ह्युलेशन स्पॉटिंग म्हणतात.याशिवाय, ताप, हार्मोन्समधील अचानक बदल आणि थायरॉईड हार्मोन्सच्या पातळीत होणारे बदल यांचाही मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाळीच्या दरम्यान हलका रक्तस्राव होण्याची शक्यता असते. मात्र, वारंवार स्पॉटिंग होत असल्यास त्यामागील कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.
महिन्यातून दोनदा होणाऱ्या रक्तस्रावाकडे दुर्लक्ष करू नका
महिन्यातून दोनदा रक्तस्राव होत असेल आणि थायरॉईड किंवा प्रोलॅक्टिन हार्मोन्सच्या पातळीत असामान्य बदल आढळत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या हार्मोन्समधील असंतुलनामुळे मासिक पाळी अनियमित होऊ शकते.वयाच्या ४० ते ४५ वर्षांच्या आसपास काही महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रात अनियमितता येऊ लागते. रजोनिवृत्तीपूर्वीच्या या संक्रमणकालीन अवस्थेला पेरिमेनोपॉज (Perimenopause) म्हणतात. याशिवाय, पीसीओएस (PCOS) किंवा नियमितपणे स्त्रीबीज बाहेर न पडण्याच्या समस्येमुळेही मासिक पाळी अनियमित होऊ शकते.काही वेळा गर्भाशयातील फायब्रॉइड्स, पॉलिप्स किंवा ॲडेनोमायोसिस यांसारख्या समस्यांमुळेही अनियमित रक्तस्राव होऊ शकतो. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात होणारा रक्तस्राव काही महिलांना दुसरी मासिक पाळी आल्यासारखा वाटू शकतो. त्यामुळे गर्भधारणेची शक्यता असल्यास रक्तस्रावाकडे दुर्लक्ष करू नये.
दुसऱ्यांदा पाळी आल्यास कोणती लक्षणे दिसल्यावर सतर्क राहावे?
महिन्यातून दोनदा रक्तस्राव होत असल्यास काही लक्षणांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. रक्तस्राव खूप जास्त होत असेल, दर दोन तासांनी दोन पॅड वापरावे लागत असतील, रक्ताच्या गुठळ्या मोठ्या असतील किंवा रक्तस्राव सात दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू राहत असेल, तर वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.याशिवाय, सलग तीन महिने महिन्यातून दोनदा रक्तस्राव होणे, रक्तस्रावासोबत दुर्गंधीयुक्त स्राव किंवा वेदना होणे, तसेच लैंगिक संबंधांनंतर रक्तस्राव होणे हीदेखील डॉक्टरांचा सल्ला घेण्याची कारणे आहेत.
घरच्या घरी केलेली गर्भधारणा चाचणी पॉझिटिव्ह आली असेल आणि त्यानंतर रक्तस्राव होत असेल, तर तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा. रक्तस्राव खूप जास्त होत असेल, तीव्र पोटदुखी, चक्कर किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटत असेल, तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.डॉक्टरांच्या मते, दुसऱ्यांदा होणारा रक्तस्राव हलका आणि वेदनारहित असेल, तर काही काळ त्याचे निरीक्षण करता येऊ शकते. मात्र, पुढील दोन ते तीन मासिक पाळींच्या चक्रांमध्ये रक्तस्रावाची तारीख, कालावधी आणि प्रमाण यांची नोंद ठेवावी. रक्तस्राव नेहमीच्या पाळीसारखा जास्त असेल, पाळी २१ दिवसांच्या आत पुन्हा येत असेल किंवा ही समस्या वारंवार होत असेल, तर डॉक्टरांना भेटण्यास उशीर करू नये.
